बदतमीज़ दिल - २२

पावणेसहाचा अलार्म खणाणला आणि तत्क्षणी ती ताडकन उठून बसली. मोबाईल चार्जिंगला लावलेला होता. तिने पटकन उचलून अलार्म बंद केला. स्वप्नातला शेवटचा भाग तिला आठवत होता. तिने आजूबाजूला पाहिले तर ती अजूनही मस्की, वूडी सुगंध येणाऱ्या खोलीत, पांढऱ्याशुभ्र मऊ बेडवर झोपली होती. अचानक तिला जाणीव झाली की आपण अजूनही डॉ. पैंच्या घरात आहोत आणि त्याहून वाईट म्हणजे हा त्याचा बेड आहे.

ओह नो, म्हणजे पहाटे कधीतरी त्यानेच तिला उचलून वर ठेवले आणि ती त्याच्याकडे किसची भीक मागत होती.. ओ नो नो नो.. तिने कपाळावर हात मारला. तिने ताठ बसून पटकन शेजारी पाहिले, नशीब! तो तिथे नव्हता. पटकन तिने आपले कपडे पाहिले, अस्ताव्यस्त असले तरी सगळे अंगावर होते. मोबाईल चार्जर? ओह, त्यानेच दुसरा चार्जर लावलेला दिसतोय.  हुश्श! तिने पटकन मोबाईल उचलला. नेहाचे बावन्न मिस्ड कॉल्स होते. तिने लगेच कॉल केला.

"दीss द, कुठे आहेस तू, बरी आहेस ना?" नेहा पॅनिक होत फोनमधून ओरडली.

तिने फोनवर हात ठेवून आवाज न करता कानोसा घेतला, जास्त आवाज करून चालणार नाही. डॉ. पै उठायच्या आत तिला तिथून पळायचं होतं.
"ऐक, ऐक. मी ठीक आहे. काहीही प्रॉब्लेम नाहीये. मोठी स्टोरी आहे, पण मी थोड्या वेळात घरी येतेय. आल्यावर बोलू."

"हुश्श, मला केवढी भीती वाटत होती. नको नको ते विचार डोक्यात येत होते. मला रात्रभर झोप लागली नाही. पावणे सहा झालेत, आता मी झोपते." सांगून नेहाने कॉल कट केला.

तिने कम्फर्टर झटकून बेडवर पुन्हा पहिल्यासारखा खोचून ठेवला. खाली उतरून दबक्या पावलांनी तिने टेबलावरची पर्स उचलून त्यात मोबाईल टाकला, टेबलाच्या पायाशी नीट ठेवलेले तिचे सँडल्स.. ओह, हे नक्की डॉ. पैंनी काढून ठेवले असणार. तिच्या घोट्याभोवतीचा सँडल स्ट्रॅप काढताना त्याला इमॅजिन करून तिने ओठ चावला. तिने त्याचे कसेतरी काढून खाली टाकलेले शूज आठवून ती जरा शरमली.

तिच्या सगळ्या वस्तू गोळा केल्यावर ती दबक्या पावलांनी बेडरूमच्या दारापर्यंत गेली. त्याच्या नजरेस न पडता ती जर बाहेर पडू शकली तर रस्त्यावर जाऊन लगेच कॅब मिळेल. तेवढ्यात मागे जरासं काही खुट्ट वाजलं. ती घाबरून स्तब्ध झाली. ती किंचाळणार इतक्यात बाथरुमच्या दारातून अनिश डोकावला.  त्याच्या हातात टूथब्रश होता. अंगात ग्रे जॉगर्स आणि बाकी काहीच नव्हतं. तिने इतक्या वेळा पापण्यांची पिटपिट केली जसं काही ती ह्या सिच्युएशनमधून उडून जाणार आहे.

"गुड!"तो मान हलवून म्हणाला. "उठलीस!" आणि परत वळून तोंड धुवायला गेला. तिने तो बाहेर यायच्या आत कुठून पटकन सटकता येईल म्हणून खिडकी, दरवाजा सगळीकडे पाहिलं. पण काही सेकंदात तो बाहेर आला आणि तिच्या शेजारून लिव्हिंग रूममध्ये गेला. आता तो ब्रशशिवाय आणि शर्टशिवाय होता. तिने त्याचे ब्रॉड खांदे आणि पाठीच्या पिळदार मसल्सवरून नजर फिरवली. ती बघत असतानाच त्याने मान वळवून पाहिलं आणि तिने पटकन नजर खिडकीकडे वळवली. "बाथरुमच्या कॅबिनेटमध्ये नवा ब्रश आहे."

थँक्स म्हणून ती पटकन ब्रश करून आली.

" बाहेर ये, मी ब्रेकफास्ट बनवतोय." त्याचा आवाज आला.

ती बाहेर येत हसली. "मला ब्रेकफास्ट शब्द ऐकू आला. इज इट रिअल?"

त्याच्या कपाळाला आठी पडली. "का? तुला भूक नाही लागली?"

तिने भुवया उंचावल्या. ही काय खाणंपिणं डिस्कस करायची वेळ आहे? किती महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या राहिल्यात. जसं की आपण शत्रूपासून एकदम शर्टलेस ब्रेकफास्ट बडीज् कसे झालो वगैरे?

"एक मिनिट! मला सांगा, मी रात्री बेडला टेकून खाली झोपले होते की नाही?"

आता तो पूर्ण वळून सोफ्याला टेकून उभा राहिला.
त्याचे ऍब्ज कातीव आणि कातील आहेत.

"हो."

"मग तुम्ही मला उचलून वर ठेवलं आणि पांघरूण घातलं."

"हम्म."

तिचे गाल आता तापले होते पण तरीही एक कन्फर्मेशन करायचंच होतं. " ओके. आणि मी स्वप्नात बघितलं की.. आय आस्क्ड फॉर अ किस! असं काही झालं नाही. हो ना?" तिने एका श्वासात धडाधड बोलून टाकलं.

अचानक त्याचा चेहराभर मिश्किल हसू पसरलं. "ते नक्कीच झालं! इट वॉज क्यूट!"

हम्म, विचार केला होता तसंच. तिने हाताची घडी घातली आणि खालमानेने भराभर त्याला पास करून मुख्य दरवाजाकडे निघाली. तेवढ्यात त्याने तिचे खांदे धरून तिला मागे ओढलं. "थांब, थांब. मी ते क्यूट होतं असं म्हटलं. इतकं एम्ब्रास व्हायची गरज नाही."

"एम्ब्रास नाही ट्रॉमा म्हणा. मला थेरपीची गरज आहे!"

"डोन्ट वरी, मी सोफ्यावर झोपलो होतो." तो अर्धवट हसला आणि तिचं लक्ष त्याच्या झोपून विस्कटलेल्या केसांवर खिळून राहिलं.
"बघ, कालच्या माझ्या वागण्यासमोर हे काहीच वाईट नव्हतं. पिऊन इतका हाय होणं मग तुला मला घरी सोडायला लावणं आणि झोपून जाणं! इतका हाय मी कॉलेजच्या फेअरवेल पार्टीनंतर पहिल्यांदा होतो. आय नेव्हर गो बियॉन्ड टू ड्रिंक्स"

त्या फेअरवेल पार्टीतही तो इतका हाय नसेल, आय डाऊट.

"तुम्ही मला तुमच्या एक्स वाईफबद्दल सांगितलं." ती भराभर गोष्टी बोलून टाकायच्या इराद्याने म्हणाली.

हम्म. त्याने फार उत्साह दाखवला नाही.

"आणि तुम्ही सांगितलं की हॉस्पिटल मला एक मोठा हाईक देणार आहे." ती हसू दाबत म्हणाली.

"स्ट्रेंज! हे सांगितल्याचं काही मला आठवत नाहीये." तो हसून मान हलवत म्हणाला. त्याने तसेच तिचे खांदे धरून तिला पुढे नेत डायनिंग टेबलच्या खुर्चीत बसवलं. ओट्यावर ब्लॅक कॉफी आधीच तयार होती. "दूध? की ब्लॅक?"

"ब्लॅक चालेल."

"शुगर?"

"मला लेक्चर देणार नाही ना?" तिने भुवया उंचावून विचारलं.

"चिल! हे हॉस्पिटल नाहीये."

"दीड चमचा!"

त्याला मगमध्ये कॉफी ढवळताना बघणं जगातली सेक्सीएस्ट गोष्ट होती. तिने स्वतःला जरा कंट्रोल केलं. ह्या महागड्या टेबलावर लाळ गाळणं बरोबर नाही, माझी अक्खी सॅलरी जाईल. त्याने काळा मग आणून तिच्या हातात दिला. "वॉव, लूक ऍट यू बिकमिंग अ डॉक्टर अँड शिट!" तिने मगवर लिहिलेलं मोठ्याने वाचलं.

"शर्विल! दुसरं कोण!" तो ओठ वाकडा करत म्हणाला. "डॉक्टर्स कान्ट फिक्स स्टूपिड, बट वी कॅन सिडेट इट!" त्याने त्याचा मग वाचला.

" मॅडे तो!" ती हसतच होती. तिने मग उचलून कॉफीचा घोट घेतला.

"गुड?" तिची प्रतिक्रिया बघत त्याने विचारले.

आह, ते कातील ऍब्ज तिच्यापासून फूटभर अंतरावर होते. तिने काही न बोलता दोन्ही अंगठे उचलून दाखवले. तो मान हलवून फ्रिजकडे गेला आणि एकेक वस्तू काढून शेजारी ओट्यावर ठेवायला लागला. अंडी, कांदा, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, चीज.

हा इतकं नॉर्मल वागतोय, जसं काय आम्ही रोजच इथे बसून नाश्ता करतो. तिला आणखी अस्वस्थ वाटलं. तो डोक्यावरच्या कॅबिनेटमधून तेलाची बाटली काढत होता. "तुम्ही प्लीज एक मिनिट थांबाल का?" ती ताठ होत म्हणाली.

तिचा बदललेला आवाज जाणवून तो वळला आणि ओट्याला टेकून उभा राहिला.

"तुम्ही काल रिसेप्शनमध्ये मला काही गोष्टी सांगितल्या. आता नाही म्हणू नका." आवाज शक्य तितका शांत ठेवत ती बोलू लागली. "तुम्ही म्हणालात शर्विलचा प्रयोग यशस्वी झाला असेल. म्हणजे नक्की काय?"

त्याने एक लांब श्वास सोडला." आय थिंक, हे सगळं आपण पोटात काहीतरी गेल्यावर बोलूया.

"नाही. आत्ताच बोलायचं आहे. आपण इथे आल्यावर तुम्ही अजून कायकाय बोललात. कदाचित ते नशेत बोलणं असेल, पण मला वाटलं तुम्ही माझ्याकडे स्वतःबद्दल थोडे ओपन अप होताय."

झालं, सगळं खरं खरं तिने बोलून बाहेर टाकलं होतं. आता त्याने ते हवं तसं वळवून मी नशेत होतो म्हणण्याची ती वाट बघत होती. म्हणजे सगळ्या गोष्टी कार्पेटखाली सारून त्यांची वर्किंग रिलेशनशिप नीट सुरू राहील.

त्याने हाताची घडी घातली."मी सांगितलेलं सगळं माझ्या लक्षात आहे." त्याची नजर तिच्या डोळ्यात खोल जात होती.

तिला नजर वळवायची होती पण हा पुढचा प्रश्न खूपच महत्त्वाचा होता. "आणि त्याचा तुम्हाला पश्चात्ताप होतोय?"

तो जराही हलला किंवा बावचळला नाही. "नाही. इन फॅक्ट मी तेच सगळं पुन्हा सांगेन. काल रात्री मी कबूल केलंय की तुला शर्विलबरोबर बघून मी खूप जेलस होतो. ते खरं आहे."

तिचे डोळे मोठे होऊन बाहेर पडायचेच बाकी होते.
"ओह.." तिला काय बोलावं सुचलंच नाही. त्याच्याबरोबर नॉर्मल वागावं की काय, पळून जावं? ऑम्लेट पार्सल करा प्लीज. TYSM.

त्याने सुस्कारा सोडून तिच्याकडे पाठ केली आणि बोलमध्ये अंडी फोडू लागला. "कोथिंबीर चिरशील का? पुढे बोलण्याआधी मला काहीतरी खायचंय."

अश्यावेळी कोथिंबिरीबद्दल कोण बोलतं?!

तरीही तिने सांगितल्याप्रमाणे केलं. ओट्यापाशी त्याच्या शेजारी उभी राहून त्याला ऑम्लेट बनवायला मदत करू लागली. चिराचीर संपवून तिने उरलेल्या कॉफीचा घोट घेतला. ती अजूनही कालच्या ड्रेस आणि मेकअपमध्ये होती, तरी बाथरूममध्ये तिने बराचसा मेकअप धुवून पुसला होता. त्याला त्याचा फार फरक पडलेला दिसत नव्हता. कॉफी संपवताच तिने त्याला तिच्याकडे बघताना पकडलं.

"काय?" तिने चेहरा चाचपून पाहिला.

"काही नाही. ऑम्लेट खाऊया." तो किंचित हसत होता.

"ओके, पण कृपा करून तुम्ही आधी काहीतरी कपडे घाला." ती ओठ चावत म्हणाली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle