बदतमीज़ दिल - २३

माझा स्वतःवर विश्वास बसत नाहीये, एवढी मी माती खाल्लीय. ती मला घाबरतेय. खुर्चीच्या टोकाला बसून ऑम्लेटचे लहानसे घास कसेबसे खातेय. टेबलाखाली तिचे पाय सलग हलत आहेत. तिच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलंय. साहजिक आहे, काल संध्याकाळपासून इतक्या सगळ्या गोष्टी झाल्यात... तो खाताखाता तिचं निरीक्षण करत होता.

काल सकाळी तो उठला तेव्हा त्याच्या मनात ती फक्त त्याची कलीग होती आणि आज सकाळी अचानक फ्यूचर लव्ह इंटरेस्ट! अजून त्याच्या मेंदूला हे नीट प्रोसेस करता येत नव्हतं, पण दोघे मिळून काहीतरी ठरवता येईल, जर तिने आत्ता धीर करून त्याच्या नजरेला नजर दिली तर!

जेव्हा त्याने तो जेलस असल्याचे सांगितले तेव्हा ती घाबरलेली स्पष्ट दिसत होती. तिचे डोळे मोठे झाले, चेहऱ्याचा रंग उडाला आणि तोंडून फक्त ओह! बाहेर पडलं होतं. तेव्हा पटकन त्याच्या मनात 'ओह आय वॉज जस्ट जोकिंग, हाहा' असं ओरडावं का असं येऊन गेलं.

आताही ती नीट खात नाहीये. चुळबुळ सुरू आहे.

"आवडलं नाही?" शेवटी त्याने विचारलं.

"हो, आवडलं ना. म्हणजे छान झालंय." ती गडबडून एक मोठा घास घेत म्हणाली.

ओके. परत शांत बसूया.

अजून थोड्या अस्वस्थ, शांत मिनिटांनंतर त्यांचं खाणं झालं आणि त्याने ताटल्या डिशवॉशरला लावल्या. त्याचं काम झाल्यावर त्याने मागे पाहिलं तो ती हातात पर्स आणि शूज घेऊन जाण्याच्या तयारीत होती. "अं, मी निघते. नेहा वाट बघत असेल."

"कॅब वगैरे नको, मी सोडतो. फक्त मला शूज घालू दे." त्याने केसांतून हात फिरवत ते जरा नीट केले. अंगात एक नेव्ही ब्लू टीशर्ट त्याने मगाशीच तिने सांगितल्यावर अडकवला होता.

तो जरा गोंधळला. तिला लगेच जाऊ द्यायचं नव्हतं पण थांबवून ठेवणंही योग्य दिसलं नसतं. कालपासूनच्या सगळ्या टाईमलाईनचा विचार केला तर ती पळ काढायला बघतेय, ते योग्यच होतं. त्याने तिला तो जेलस असल्याचे सांगणे, पिऊन घरी येऊन मूर्खासारखी आपली डिप्रेसिंग दुःखी कहाणी ऐकवणे असं सगळं केल्यावर नो वंडर, ती इथे त्याच्याबरोबर थांबायचे मिनिट्स मोजत असेल.

तिच्याबरोबर पार्किंगमध्ये पोचल्यावर त्याने तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडला. ती किंचित हसली. पलिकडे जाऊन आत बसताच त्याचे गुढघे स्टीअरिंगवर आपटले.

"सॉरी, मी केलंय ते! माझे पाय पोचत नव्हते." ती जरा शरमून हसत म्हणाली.

तिच्या हसण्याच्या आवाजाने त्याच्या पोटात आलेली टेन्शनची गाठ सुटून मोकळी झाली. सीट  मागे करून त्याने गाडी सुरू केली. हे अजिबात कठीण नाहीये. पुढच्या सिग्नलला थांब आणि म्हण, सायरा तू मला आवडतेस. आय वॉन्ट टू आस्क यू आउट! त्याचं मन त्याला सांगत होतं. इतकं सिम्पल आहे, पण दुर्दैवाने त्याला कुठेतरी ती नाही म्हणण्याची भीती वाटत होती.

त्याने डोळ्यांच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहिलं. ती खिडकीतून बाहेर बघत नखं चावत होती की कुठल्याही क्षणी बाहेर उडी मारून पळून जाईल. अति हळू चालवूनसुद्धा वीस मिनिटात तिच्या घरासमोर येऊन त्याने कार थांबवली. सकाळी  रस्ता नेमका बऱ्यापैकी रिकामा होता.

"थँक् यू सो मच." ती त्याच्याकडे वळून म्हणाली.

"तू काल माझी इतकी काळजी घेतल्यावर एवढं तरी मी करायलाच हवं."

"ओह प्लीज, मी इतकी काही काळजी वगैरे घेतली नाही. उलट किस मागत होते, आठवतंय!" ती शरमून म्हणाली.

त्याने हसणं टाळलं."आय सेड इट वॉज क्यूट. इतकं मनाला लावून घेऊ नको."

"हम्म." तिचं लक्ष त्याच्या ओठांकडे गेलं. एव्हाना तिने दार उघडून घराकडे चालायला हवं होतं. त्यांच्यात बोलायला आता काही उरलं नव्हतं. तरीही ती बसून राहिली. तिने त्याच्याकडे बघितल्यावर त्याचा चेहरा प्रश्नार्थक झाला. त्या सीटवर ती एवढीशी असून तिचा प्रेझेन्स गाडीभर होता. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने तिच्या मोकळ्या केसांच्या बटा सगळीकडे पसरल्या होत्या, गाल लालसर झाले होते. तिच्या पाणीदार डोळ्यात खूपश्या अव्यक्त भावना तरळत होत्या. तो तिला बोलायला सांगता सांगता थांबला कारण ती ओठ चावत होती आणि त्याला ते थांबवायचं नव्हतं.

तिने दाराकडे वळून दार उघडायला हँडल पकडलं आणि पुन्हा वळून बघितलं.

पुढचे काही क्षण त्याला युगांसारखे भासले. त्याचं हृदय दुखायला लागेपर्यंत धडधडत होतं. त्याने स्टीअरिंग सोडलं आणि ती इंचभर त्याच्याकडे सरकली. अगदी जराशीच. तिच्या ते लक्षातही आलं नसेल, पण ते जरासं अंतर त्याच्यासाठी पुरेसं होतं. होय नाहीचा प्रश्नच नव्हता. त्याने बोटं तिच्या मोकळ्या केसात खुपसली आणि तिला पुढे ओढलं.

धिस इज इनसेssन!

तिला सोडून जाऊ द्यायला हवं. मी अति करतोय.. त्याचं मन सांगत होतं.

"अनिश..." ती त्याच्या कानापाशी कुजबुजली.

बस! देअर्स नो होप नाऊ! त्याच्या डोळ्यातला मध आता उकळत होता.

"आय एम गोइंग टू... " त्याचा आवाज बदलला होता. "किस यू." आणि त्याने केलं. सुरुवातीला हळुवारपणे तिच्या ओठांवर ओठ टेकताना, तिने त्याच्या छातीवर हात ठेवून ढकलण्याची किंवा चेहरा वळवून गाल पुढे करण्याची त्याच्या मनाने तयारी केली होती. पण तिने हलकेच श्वास सोडला आणि त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला. त्याला आत्ताच्या आत्ता हीच सायरा हवी होती. त्याच्या गाडीत बसून, त्याचा टीशर्ट मुठीत धरून, त्याला स्वतःकडे ओढणारी. त्याने मान किंचित तिरकी करत झुकवली आणि तिच्या ओठांचा पूर्ण ताबा घेतला. त्याची दोन दिवसांची किंचित वाढलेली दाढी तिच्या हनुवटीला घासली आणि तिचा मेंदू पूर्ण बंद पडला.

तिने गळ्यात टाकलेले दोन्ही हात मानेवरून हळूच त्याच्या केसात शिरले आणि रेशमी केसांमधून बोटं फिरवताना तिने डोळे मिटले जसं काही ती कित्येक दिवसांपासून हे करायचीच वाट बघत होती.

इनोसंट किस वाढत वाढत बॉर्डर क्रॉस करून जायला लागला. त्याला तिला स्वतःजवळ अजून ओढून घ्यायचं होतं पण अश्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीसाठी कारमधली जागा अपूरी होती. इन्व्हायरमेन्ट गेलं चुलीत, मी आता हमरच घेतोय!

ती मध्येच काहीतरी बोलू पहात होती पण तिचे शब्द त्याच्या ओठांमध्ये बुडून गेले. त्याचा एक हात तिच्या विस्कटलेल्या रेशमी केसांत होता आणि दुसऱ्या हाताचं बोट त्याने तिच्या गळ्यावरून कॉलर बोनपर्यंत ट्रेस केलं. तिच्या अंगावर शिरशिरी उमटली. ही सकाळ त्या दोघांसाठी अविस्मरणीय होत होती. हळूच स्वतःला सोडवून ती किंचित मागे सरकली.

तिचे ओठ लालेलाल झाले होते. तिने ओठ जागेवर आहेत ना बघितल्यासारखा तोंडावर हात ठेवला. त्याने पुढे होत तिचा हात बाजूला केला आणि जवळ जाऊन ओठ न टेकता तिथेच थांबला. तो सुचवत होता की आपण हे पुन्हा करू शकतो, तू फक्त हो म्हण..

अचानक तिचे डोळे मोठे झाले आणि तोंडावर हात घेऊन ती झटक्यात मागे सरकली. ओ माय गॉड!!

ती एवढंच म्हणाली पण तेवढ्या शब्दांनी ते करंट लागल्यासारखे धाडकन वास्तवात आले. ते दोघे कारमध्ये होते, लवकरच ती बाहेर पडेल, तिच्या घरात जाईल. आज त्याचा ऑफ होता आणि तिची सिक लीव्ह त्याने शुभदाला कळवली होती. पण उद्या? उद्या सकाळी ती हॉस्पिटलमध्ये येईल आणि त्याची असिस्टंट म्हणून ऑपरेशन टेबलसमोर उभी राहील. सगळ्या मार्गांनी ऑफ लिमिट्स!

तिने तोंडावरचा हात बाजूला केला तेव्हा त्याला दिसलं की ती त्याच्या डोक्यापलिकडे खिडकीतून बाहेर बघतेय. ओह, ते 'ओ माय गॉड' किसची प्रतिक्रिया नव्हती तर! त्याला जरा हलकं वाटलं.

"वी हॅव ऑडियन्स!" ती हसत म्हणाली.

त्याने वळून पाहिलं तर खरंच तिच्या घराच्या मोठ्या खिडकीत एक चेहरा दिसत होता.

"माझी बहीण. तिने बघितलं बहुतेक आपल्याला." तिने जीभ चावली.

त्याने नेहाकडे हसून बघत हात हलवला. नेहाचे डोळे विस्फारले आणि पटकन ती खिडकीतून बाजूला पळाली.

"गेली."

"हम्म, बहुतेक अजून चांगला स्पॉट शोधत असेल. तिने दुर्बीण वगैरे शोधायच्या आत मला पळायला हवं!"

आह! तिला एवढी अविस्मरणीय सकाळ दिल्यावरही हे असं!!

तिला दारापर्यंत सोडायच्या बहाण्याने तो तिच्याबरोबर गेला. खरं तर त्याला तिच्याबरोबर अजून थोडा वेळ हवा होता. आता बाहेर आल्यावर तिचा हात हातात घेणं किंवा तिला ओढून किस करणं शक्य नव्हतं. कारमधली जादू एव्हाना विरली होती. तिच्यापासून लांब ठेवायचे म्हणून त्याने दोन्ही हात जॉगर्सच्या खिशात कोंबले. तेवढ्यात ते तिच्या दरवाज्यापाशी पोचले.

आता काही सेकंदात ती घरात नाहीशी होईल. मग नेहमीप्रमाणे अक्खा एकाकी दिवस त्याला स्वतःबरोबरच काढायचा होता. रूटीन सुरू: वर्कआउट, स्टडीमध्ये जाऊन उद्याच्या केसचा अभ्यास. भरपूर काम फुगवून आयुष्याच्या प्रत्येक फटीत भरून टाकायचं की बाकी काही विचार करायला जागाच उरली नाही पाहिजे.

"होम स्वीट होम!" ती खोटा उत्साह दाखवत हसली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle