बदतमीज़ दिल - २९

शुभदा तिच्या डेस्कमागे उभी राहून कानाला रिसीव्हर लावून हाताने भराभर नोटपॅडवर लिहीत होती. त्यांना येताना बघताच तिने फोन होल्डवर टाकला आणि डॉ. पैना भराभर अपडेट दिले. "डॉ. गांधी सर्जरीमे हैं, वो कॉल बॅक करेंगे. डॉ. कनसेका लंच ब्रेक है, उनको बादमे कॉल करती हूं, अभी लाईन पर डॉ. डिसूझा है. पेशंट को सुबह की फ्लाईट मिली है, दे विल रीच हिअर अराउंड इलेव्हन. मैने सामनेवाला हॉटेल ट्राय किया लेकिन वो फुल्ली बुक्ड है."

काळजीपूर्वक ऐकत त्याने मान हलवली. "तुम डॉक्टर्स हँडल करो, हॉटेल बुकिंग सायरा कर लेगी. मेरा शेड्यूल क्लिअर करो, सर्जरीज पुश करो." केबिनकडे जाताना त्याने मागे सायराकडे वळून बघितले. "सायरा, हॉटेल बुक झाल्यावर माझे पेशंट रीशेड्यूल करायला शुभदाला मदत करशील का?" तिने मान डोलावली आणि डेस्कवरचा दुसरा फोन उचलला.

ती काय करतेय तिला समजत नव्हतं. नॉर्मली पेशंटच्या नातेवाइकांची सोय हॉस्पिटल थोडंच करतं? "ते किती दिवस इथे असतील?"

"सुरुवात तीन दिवसांपासून कर." तो केबिनकडे गेला.

दुपारची हळूहळू संध्याकाळ झाली. तिला जेवायला पोचू शकणार नाही एवढं नेहाला कळवण्याइतकाही वेळ मिळाला नव्हता. दिवाळीमुळे सगळी हॉटेल्स फुल्ल होती, जिथे जागा होती तिथे कायच्या काय टॅरीफस् होती. शेवटी एकदाची हॉस्पिटलपासून थोडं दूर एका हॉटेलमध्ये तिने गोड बोलून रूम मिळवली, टॅरीफ तरीही जास्तच होतं. तिच्या पोटात गोळा आला पण शुभदाने तेवढं चालेल म्हणून धीर देत डॉ. पैंचं क्रेडिट कार्ड पुढे केलं. तिने पेमेंट करून बूकिंग केलं आणि पेशंटस् रीशेड्यूल करण्याकडे वळली.

अनिशच्या कामातही भरपूर अडथळे होते. त्याचे ओळखीच्या सर्जन्सना कॉल सुरूच होते. मधेच शुभदाने तिला खुसखुस करत सांगितले की सर्जरीसाठी अजून दोन सर्जनची गरज होती, त्याला या केसमध्ये कुठलेही चान्सेस घ्यायचे नव्हते. पण आत्ता सगळ्यांचंच टाईमटेबल पॅक असतं. दिवाळी आणि सुट्ट्यांच्या प्लॅनिंगमुळे  ऐनवेळेला स्वतःच्या सर्जरीज पोस्टपोन, रीशेड्यूल करून कोणी मिळणं फारच कठीण होतं.

ती लिस्टमधल्या पेशंटना कॉल करून त्यांच्या कन्सल्टेशन आणि प्री ऑप अपॉइंटमेंट्स री-शेड्यूल करून एकेका नावावर काट मारत होती. तेवढ्यात केबिनमधून त्याची जोरात हाक आली. हातातलं पेन टाकून ती पटकन आत पळाली.

तो खिडकीजवळ येरझाऱ्या घालत होता. पांढरा कोट खुर्चीच्या पाठीवर टाकलेला होता. निळ्या शर्टाच्या बाह्या दुमडलेल्या, शर्टचं वरचं बटन उघडं आणि केस पुनःपुन्हा विस्कटल्यासारखे होते. तो डोकं दुखत असल्यासारखं कपाळ दाबत होता. इतका स्ट्रेस्ड तो याआधी कधीच दिसला नव्हता. "प्लीज खाली जाऊन डॉ. गांधींना असतील तिथून घेऊन ये. त्यांचा फोन कोणी उचलत नाहीये. त्यांना सांग, मला आत्ताच्या आत्ता त्यांच्याशी बोलायचं आहे."

मान हलवून ती भराभर लिफ्टकडे गेली. तिसऱ्या मजल्यावर डॉक्टरांच्या सगळ्या केबिन्स बंदच दिसत होत्या. डॉ. गांधींच्या केबिनचेही दिवे बंद होते. तिने पटकन बाहेरच्या रिसेप्शनवर चौकशी केली. "डॉ. गांधी.. ते एक तासापूर्वीच गेले. आज त्यांच्या मुलीचा फर्स्ट बर्थडे आहे ना!" रिसेप्शनिस्ट म्हणाली. सायराने डोळे घट्ट मिटले. तिने घड्याळात बघितलं तर आठ वाजत आले होते.

ती परत वर गेली. ही खबर देणारी व्यक्ती तिला व्हायचं नव्हतं. काय माहीत हा माणूस गोळीबिळी घालेल!

"फ*ग हेल!!" तिने सांगितल्यावर खुर्चीवर एक गुद्दा मारून त्याने खिडकीतून बाहेर बघितले. बाहेर अंधार पडून ट्रॅफिकच्या दिव्यांची रांग लागली होती. तिला काय करावं समजत नव्हतं. त्याला एकांत द्यावा की प्रोत्साहन द्यायला काही बोलावं. दुपारपासून न थकता तो फोनवरच बोलत होता. अजून बोलायला त्याचा आवाज शिल्लक आहे ही कमाल म्हणायची!

त्याचं डोकं शांत व्हायची वाट बघत ती डेस्कसमोर उभी होती. काय बोलावं याचा विचार डोक्यात सुरू होता. तिला 'शांत व्हा, सगळं छान होईल' वगैरे काहीतरी बिनबुडाचं बोलायचं नव्हतं. कारण तिलाही माहिती होतं की सगळं छान होण्याचे चान्सेस खूप कमी होते. "डॉ. पै.." दारातून शुभदाचा आवाज आला. "ट्रॅफिक और बढनेसे पहले मुझे निकलना होगा. आय'ल कम अर्ली टुमॉरो."

"येस, तुम जाओ. काम सुबह खतम करते है." तो डोकं न वळवता म्हणाला. तिने शुभदाकडे बघून किंचित हसत हात हलवला.

शुभदा गेल्यावर ते दोघे बराच वेळ शांततेत उभे होते, ती शांतता अंगावर येईपर्यंत. डेस्कपलिकडे जाऊन त्याच्या पाठीवर हात टाकून घट्ट मिठी मारण्याची तीव्र इच्छा तिने कशीबशी दाबून टाकली. शेवटी तो खिडकीतून डेस्ककडे वळला.

"उशीर झालाय, तू पण निघ." पुन्हा कामाला लागण्यापूर्वी तिच्याकडे बघून तो म्हणाला. त्याचा आवाज इतका निराश आणि रिकामा होता की ती कळवळली. "आणि तुम्ही काय करणार?"

त्याने फायलींकडे हात केला."हे."

ऑफ कोर्स, उशीर वगैरे आमच्यासाठी. तो त्याचं काम संपेपर्यंत कुठेही जाणार नाही.

"मी पण थांबते मदतीला." तो काय म्हणणार याचा अंदाज होता तरीही ती मान ताठ करून म्हणाली.

"नको. बराच उशीर झालाय. नेहा एकटी असेल, जा तू."

अंदाज होताच, त्यामुळे तिला तो नाही म्हणाल्याचं तिला वाईट वाटलं नाही. ती त्याच्या समोरच्या खुर्चीत जाऊन बसली. तो वर न बघता फाईल वाचत होता. त्याचं पूर्ण लक्ष खालच्या कार्डीऍक MRI आणि ECG रिपोर्टमध्ये होतं. त्याच्या दबलेल्या खांद्यावरचं ओझं तिला अक्षरशः दिसत होतं. ती त्याच्यामागे खिडकीबाहेर झगमगणारे दिवे बघत शांत बसून राहिली. "मी हे करू शकतो सांगून मी वेडेपणा केलाय." त्याचा बारीक आवाज आला. "मी त्या लोकांना सांगितलं, शेड्यूल ऍडजस्ट केलं पण आता मला खात्री वाटत नाहीये."

"आय एम शुअर, तुम्ही अश्या बऱ्याच केसेस हँडल केल्या असतील." तिने धीर द्यायचा प्रयत्न केला.

त्याने केसांतून हात फिरवत केस मुळापासून खेचले. तो स्वतःवरच चिडला होता.

ती त्याला हार मानू देणार नव्हती. हे कोणी करू शकत असेल तर फक्त तोच करू शकतो. "हाऊ कॅन आय हेल्प?" तिने खंबीर होत विचारले.

"मी तो फाईल्सचा गठ्ठा काढलाय. त्यात आपल्या केसशी मॅच होणारे कार्डीऍक MRI आणि ECG रिपोर्ट शोध." तो मुद्दाम तिरकस बोलत होता. ती ते ऐकण्याचा वेडेपणा करणार नाही असं त्याला वाटलं. पण ती खुर्ची सरकवून उठली आणि भिंतीकडे गेली. तो ढिगारा जवळपास तिच्या कंबरेइतका होता.

"सायरा, मी जोक करत होतो. तू घरी जा, मी बघेन ते." तो हातातलं पेन खाली ठेवत म्हणाला.

टू लेट. तिने शूज काढून बाजूला ठेवले, पोनीटेल घट्ट केली आणि खालच्या कार्पेटवर मांडी घालून बसली. तिचे स्क्रब्ज तसेही लूज असल्यामुळे पजामा घातल्यासारखेच वाटत होते. "फक्त MRI आणि ECG बघायचे ना?"

"सायरा, तुला हे करायची खरंच गरज नाही." तो खुर्चीतूनच म्हणाला. तिने काहीच उत्तर दिले नाही. शेजारच्या सोफ्यावर तिने फायलींचा एक गठ्ठा ठेवला आणि मांडी घालून बसली. तो तिचा नाद सोडून परत कामाला लागला, फक्त तेवढ्यात डोकं चालवून त्याने पिझ्झा ऑर्डर केला.

तिच्याकडे एक्स्पर्ट नॉलेज नव्हतं पण त्याने तिला एक्झॅक्टली काय बघायचं ते सांगितल्यामुळे तिला ते शोधणं सोपं होतं. तो त्याच्या खुर्चीतच काम करत होता, तो काय करतोय विचारायचं धाडस तिच्यात नव्हतं. शेवटी ती त्याच्या मदतीला थांबली होती, तिला त्याचं लक्ष विचलित करायचं नव्हतं. पिझ्झा आल्यावर तिने नेहाला कॉल करून इमर्जन्सीमुळे थांबावं लागतंय म्हणून सांगितलं. त्यांनी काम करता करताच पिझ्झा खाल्ला आणि तिने एक जांभई दिली. तिने डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे नजर टाकली. तो खालच्या ओठावर अंगठा फिरवत डोळे बारीक करून एक रिपोर्ट वाचत होता. मधेच त्याने डोकं हलवलं आणि तो कागद मुठीत चुरगळून खाली बिनमध्ये फेकला. पान उलटून तो पुढे वाचत राहिला. तिने पुन्हा आपल्या फायलीत डोकं घातलं.

परत तिने घड्याळात बघितलं तेव्हा दीड वाजला होता. ऐशी टक्के गठ्ठा संपला होता. रिपोर्टमधल्या इमेजेस बघून बघून तिच्या शिणलेल्या डोळ्यांना ब्रेक हवा होता. तिला डोळ्यांच्या डॉक्टरांनी सांगितलेला २०:२०:२० नियम आठवला.

अनिशच तिचा वीस सेकंदाचा ब्रेक होता.

तो अचानक हलला आणि त्याने समोर पाहिलं. तिने पटकन नजर मांडीवरच्या फाईलमध्ये हलवली.

"काय झालं?"

तिचे गाल किंचित लाल झाले, काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून तिने विचारलं."बाय एनी चान्स, इथे एखादं ब्लॅंकेट, शाल वगैरे काही आहे?"

त्याने उठून हात वर करून आळस दिला आणि पलीकडच्या कपाटातून एक पातळ ब्लॅंकेट काढून तिला दिलं. तो परत जाऊन लॅपटॉपसमोर बसणार तोच त्याने लॅपटॉप उचलला आणि सोफ्यावर दुसऱ्या टोकाला येऊन बसला. "खुर्चीत बसून बसून पाठ दुखायला लागली."

तिने मान हलवली. हे एकाच सोफ्यावर बसणं जरा इंटिमेट वाटू शकतं पण निदान त्यांचा एकमेकांना स्पर्श होण्याची भीती नव्हती. सोफा बराच मोठा होता. तिने स्वतःला ब्लॅंकेटमध्ये गुरगुटायला सुरुवात केली. अर्ध ब्लॅंकेट अंगावर लपेटल्यावर तिला तो बघत असल्याचं जाणवलं.

"ओह, सॉरी! तुम्हालापण हवंय का?" तिने एक कोपरा पुढे करत विचारलं. तो त्याच्या तळहातालाही पुरला नसता! तिची ऑफर त्याला विनोदी वाटली असणार कारण त्याने गालात हसत मान हलवली.

"नको. आय एम गुड!"

तिला पुन्हा सांगण्याची गरज नव्हतीच. तिने ते मऊ, उबदार ब्लॅंकेट स्वतःभोवती गुरगुटून घेतले. हम्म, त्याचा मस्की सुगंध.. तिने फाईल उचलून वाचायला सुरुवात केली. किती वेळ गेला कुणास ठाऊक, पोटभर पिझ्झा आणि उबदार ब्लॅंकेटमुळे झोप मी म्हणायला लागली. तिने कितीतरी वेळा डुलकीतून खाडकन डोळे उघडले, पण झोप अनावर होती. फक्त थोडाच वेळ... म्हणत शेवटी तिने डोळे मिटले.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle