बदतमीज़ दिल - ३६

सात वाजता अलार्म खणाणल्यावर तिला जाग आली. क्षणभरात कालची सगळी रात्र डोळ्यासमोर तरळली, स्पेशली ती वॉशरूम! ती डोळे मिटून हसली. जरा वेळाने नेहाला उठवून आंघोळीला पिटाळल्यावर तिला अनिशला प्रॉमिस केलेलं गिफ्ट आठवलं. फ्रिज उघडून तिने डब्यात ठेवलेल्या सांदणाचा वास घेतला. काल चिडल्यामुळे तिने मुद्दाम डबा बरोबर नेला नव्हता. डबा पुन्हा आत ठेऊन ती परत नेहाच्या मागे लागली. सगळं सामान, तिकिटं वगैरे चेक करून झाल्यावर त्या पिकअप पॉइंटवर जाऊन थांबल्या. बसमधून आरडाओरड करत मंडळी आल्यावर नेहा त्यांच्यात सामिल झाली आणि ती खिडकीतून हात हलवत असताना बस निघालीसुद्धा.

एव्हाना साडेबारा वाजले होते. तिने घरी जाऊन सांदण फ्रिजमधून काढून मायक्रोवेव्ह केले. कपडे बदलले. हा स्पगेटी बेल्ट आणि कंबरेला स्मॉकिंग असलेला h n m चा प्लेन ब्लॅक ड्रेस तिच्या कपाटात बरेच दिवस पडून होता. चेहरा धुवून सीसी क्रीमवर थोडी कॉम्पॅक्ट आणि न्यूड लिपस्टिक लावली. तिला त्याचं शेड्यूल पाठ होतं. आज तो घरीच असणार. हीच वेळ होती त्याला सरप्राईज करायची. मोठ्या टोट बॅगमध्ये सांदणाचा डबा ठेवला. घराला कुलूप लावताना बऱ्याच दिवसांनी ती गुणगुणत होती.

त्याच्या अपार्टमेंटखाली पोचताच तिने गार्डला अनिशसाठी सरप्राईज म्हणून फोन न करण्याची विनंती केली. गार्डने तिला ओळखून आत सोडले. लिफ्टमध्ये तिने आरशात बघून मोकळ्या केसांतून हात फिरवला. ड्रेस उगीचच जरा नीट केला. तिच्या तोंडावर एक मोठं हसू पसरलं होतं. तिने पर्समधून डबा काढून दोन्ही हातात धरला. त्याचा मजला येताच लिफ्ट थांबली. त्याच्या दरवाजासमोर थांबून तिने बेल वाजवली. दार उघडेपर्यंतची काही सेकंदही तिला धीर नव्हता.

दरवाजा उघडला आणि समोर सुनयना उभी होती. डॉ. सुनयना दास! तिने शिफॉनचा लाल पायघोळ ड्रेस घातला होता. मागे एका दोरीने बांधलेली हॉल्टर नेक आणि जस्ट अ हिंट ऑफ क्लीवेज. स्मोकी आईज, परफेक्ट बोल्ड मेकअप, लाल लिपस्टिक. सायराला बघून तिच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव होते. "सू? वूड यू लाईक अ मsलो ऑर शीराझ? आय हॅव ओन्ली टू!" अनिश किचनकडून रेड वाईनच्या दोन बाटल्या हातात धरून बाहेर आला. ब्लॅक शॉर्टस आणि व्हाईट टीशर्ट. केस नेहमीप्रमाणे विस्कटलेले. गालावर लाल लिपस्टिकचा पुसट डाग. तिने ओठ घट्ट मिटून घेतले. तिला दारात बघून त्याचे डोळे चमकले. पुढे येऊन दोन्ही बाटल्या त्याने तोंड शिवून आश्चर्याने बघणाऱ्या सुनयनाच्या हातात दिल्या. "सायरा?"

तिने त्याच्या चेहऱ्याकडे न बघता त्याच्या रिकाम्या हातात सांदणाचा डबा ठेवला आणि मागे न बघता लिफ्टकडे पळत सुटली. तो तिला हाक मारत लिफ्टपाशी पोहोचेपर्यंत लिफ्ट खाली गेली होती. ती गाडी काढून लगेच रस्त्याला लागली आणि घरी जाऊनच तिने श्वास घेतला. एव्हाना डोळ्यात जमणाऱ्या पाण्याने तिचे डोळे चुरचुरत होते. तिने आत जाऊन तोंडावर पाणी मारून खसाखसा तोंड धुतलं. फोनवर अनिशचे चौदा मिस्ड कॉल होते. तिने फोन स्विच ऑफ करून टेबलवर ठेवला. राग आणि दुःखाने तिला काय करावं सुचत नव्हतं. एकटीने ह्या घरातही राहावंसं वाटत नव्हतं. तो इथे येण्याच्या आत कुठेतरी निघून जावं. डोळे पुसतच फोन हातात घेऊन पुन्हा स्विच ऑन केला आणि चंदाला कॉल केला.

हायहलो झाल्यावर ती मुद्द्याचं बोलली.
"मै बहोत बोर हो चुकी हूं यार, नेहाभी यहां नहीं है. आय नीड अ ब्रेक. तुम्हारा वो येऊरवाला घर खाली है क्या?" चंदाच्या वडिलांचं येऊरच्या जंगलात एका पाड्यावर वीकेंड होम होतं जे ते अधूनमधून रेंट आउट करायचे.

"हां, खाली तो है. लेकीन.."

"मेरे लिए बुक कर दे प्लीज, दो दिन. आय रिअली नीड सम स्पेस. अकेले रहना है."

"ओके, कब जा रही हो?"

"आज, अभी."

चंदाने मान हलवली."कुछ सिरीयस है? आय कॅन मीट यू.."

"नो, जस्ट लेट मी गो देअर."

"ओके, चाबी एक लोकल मेड के पास रहती है, मैं उसको इन्फॉर्म कर देती हूं. लोकेशन व्हाट्सऍप करती हूं."

"थँक्स यार, आय ओ यू अ लॉट! अमाउंट भी लिख, मैं जीपे करती हूं."

"चिल! जो भी दिमाग मे चल रहा है, सॉर्ट आउट करके आना." चंदा काळजीने म्हणाली.

"आय विल!" म्हणून तिने फोन ठेवला. पटापट एका जिम बॅगमध्ये चार कपडे आणि टूथपेस्ट ब्रश, बॉडी वॉश वगैरे भरले आणि उबर बोलावली. जाताजाता थांबून एटीएमवर थोडी कॅश काढली.

शहरातल्या रणरणत्या उन्हातून येउरला पोचताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला घनदाट झाडी आणि सावल्यानी तिचं स्वागत केलं. जीपीएसवरून मार्ग काढत कॅब घरासमोर येऊन थांबली. चहूकडे कंपाउंड वॉल आणि मध्ये मोठ्या अंगणात तांबडे चिऱ्याचे दगड आणि काँक्रीटमध्ये बांधलेलं कौलारू घर होतं. गेटजवळ पाड्यावरची मल्ली नावाची आदिवासी बाई उभी होती. तिने घर उघडून ठेवलं होतं. साफसफाई करून फ्रिजमध्ये खाण्याचं थोडं सामानही भरून ठेवलं होतं. काही लागलं तर फोन करा म्हणून तिने नंबर दिला आणि किल्ली हातात देऊन ती निघून गेली.

आतल्या भिंती पांढऱ्याशूभ्र होत्या, वर गडद सागवानी छत होतं. दारं, खिडक्या निळ्या रंगाने रंगवल्या होत्या. बाहेरच्या खोलीत लाकडी झोपाळा आणि दोन खुर्च्या होत्या. बेडरूममध्ये स्वच्छ पांढरी बेडशीट घातलेला एक मोठा बेड आणि कपाटात उशा, ब्लॅंकेट्स वगैरे होती. ते सगळं बेडवर टाकून तिने कपडे कपाटात ठेवले आणि बेडवर आडवी झाली. तिला पुन्हा पुन्हा सुनयना दिसल्याने प्रसंग आठवत होते. ओटी, बरिस्टा ते अनिशचं घर. ती दिवाळीला स्वतःच्या घरी न जाता थांबली म्हणजे नक्कीच काहीतरी प्लॅन होता. तिने ज्या पझेसिव्हपणे त्याच्या मांडीवर हात ठेवला होता ते तिच्या डोळ्यासमोर आलं. आणि अनिशच्या एका कॉलवर ती सगळं सोडून लगेच आली होती, बाकीचे सर्जन तयार नसतानाही. पण अनिश? तो का असं वागतोय आणि काल जे झालं ते काय होतं!

तिच्या डोळ्यातून अजून पाणी वहात राहिलं. एव्हाना काळोख पडू लागला होता. ती उठून बाहेर गेली. अंगणात एक राऊट आयर्नचे टेबल आणि दोन नक्षीदार खुर्च्यांचा सेट होता. ती खुर्ची ओढून मान मागे टाकून वर बघत बसली. उंच झाडांची महिरप दिसणाऱ्या काळ्याभोर आकाशात आता एक एक चांदणी उठून दिसायला लागत होती. थोड्याच वेळात आकाश ताऱ्यांनी भरून गेलं. तिला तहान भुकेची जाणीव नव्हती. राग, वैफल्य, दुःख, त्रास अश्या सगळ्या भावना मनात फेर धरून नाचत होत्या. थोडी थंडी वाजू लागल्यावर ती जरावेळ हाताची घडी घालून उभी राहिली आणि शेवटी रागाने खुर्ची ढकलून आत निघून गेली. खुर्ची वाकडी तिकडी होत बाजूला कलंडली.

बेसिनसमोर उभी राहत तिने तोंडावर पाणी मारलं, पुसताना आरशात पाहिलं तर रडके डोळे सुजून लालसर झाले होते. सगळा चेहराच किंचित सुजून लाललाल झाला होता. फ्रिजजवळ जाऊन तिने घटाघट एका बाटलीतले पाणी प्यायले. काचेच्या डायनिंग टेबलवर एका परडीत सफरचंद रचून ठेवली होती. "गुड! कीप द डॉक्टर अवे!" ती तोंड वाकडं करत म्हणाली.

ती जाऊन मोठ्या खिडकीतल्या सेटीवर बसली. काचेतून बाहेर अंधाराचं साम्राज्य होतं. तिने जरा घाबरत तिथून नजर हटवून मोबाईल हातात घेतला. नेहाचा ट्रेन खेडला पोचल्याचा मेसेज होता. ट्रेनमध्ये उनो खेळताना ग्रुपचे दोन तीन फोटो होते. तिने दोन चार थंब्सचे इमोजी टाकून व्हॉट्सऍप बंद केले. मधेच कंटाळा म्हणून तिने खूप दिवसांनी फेसबुक उघडलं.

स्क्रोल करताकरता न राहवून तिने सर्चमध्ये अनिशचं नाव टाकलं. त्याची वॉल बर्थडे विशेसनी भरली होती. आ वासून तिचं तोंड उघडंच राहिलं. आज त्याचा बर्थडे होता! दहा नव्हेंबर.. तिने तारीख लक्षात ठेवली. डॉ. शेंडेनी त्याला टॅग केलेला एक फोटो दिसत होता. What an amazing time with college buddies, Happy birthday Anish! फोटोत तिने बघितलेले सुनयना, अनिश त्यांच्याबरोबर शेंडे आणि अजून आठ दहा लोक अनिशच्या लिव्हिंग रूममध्ये तो केक कापताना टाळ्या वाजवत होते. टेबलावर केकशेजारी बरेच बुके आणि तिने दिलेला डबा होता. तिने कपाळावर हात मारत स्वतःला येत असतील तेवढ्या सगळ्या शिव्या घातल्या आणि तिला स्वतःच्या मुर्खपणावर पुन्हा जोरदार रडू आलं. अनिश किती किती चिडला असेल.. आता तो माझ्याकडे पुन्हा ढुंकूनही बघणार नाही. तिने ओठ चावून रक्त काढलं.

क्रमश:

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle