बदतमीज़ दिल - ३८

दिवाळीचे दिवस असूनही खिडकीबाहेरच्या उन्हात पाऊस झिमझिमत होता. पावसामुळे अंगणात बकुळीच्या ओल्या फुलांचा सडा पडला होता. गॅसवर वाफाळणारी कॉफी मगमध्ये ओतली जाण्याची वाट बघत होती. कुकरची चौथी शिट्टी होताच त्याने गॅस बंद केला. तिने ओट्यावरून खाली उतरून मोठा चमचा उचलताच त्याने तो तिच्या हातातून ओढून घेतला.

"अनिशss प्लीज दे ना, मी पटकन करते."

त्याला हसू आलं. ती एवढीशी दिसत होती की तो एका हाताने तिला उचलून बाजूला ठेऊ शकत होता. त्याने चमचा उचलून एका हाताने उंचावर धरला. तिला पाय उंचावूनही तो मिळणं शक्य नव्हतं.

"तू बाहेर जाऊन मस्त कॉफी पी, जा!" तो तिचा हात धरून कॉफीकडे ढकलत म्हणाला. किचनमधल्या डब्यात फक्त डाळ, तांदूळ होते आणि काल मल्लीने थोडे कांदे, बटाटे, टोमॅटो वगैरे बेसिक गोष्टी आणून ठेवल्या होत्या. त्याने डाळ तांदूळ कुकरला लावले आणि भाज्या चिरल्या तरीही तो स्वयंपाक करतो आहे हे सायराच्या पचनी पडत नव्हतं. एकतर तो यूट्यूब बघून हळूहळू एकेक गोष्ट करत होता आणि तिला हसू येत होतं. तिने पंधरा मिनिटात हे करून संपवलं असतं पण त्याला तिची लुडबूड नको होती.

"सायरा, प्लीज!" त्याने तिचे दोन्ही खांदे धरून तिला लिव्हिंग रूममध्ये नेऊन बसवलं. "तुझ्यासाठी शेवटचा स्वयंपाक कुणी केला होता?"

तिने त्याच्याकडे बघून विचार केला, उत्तर द्यायला जरा वेळच लागला. "हम्म नेहाने काहीतरी केलं होतं, पास्ता वगैरे." तो हसला. प्लीज मला हेल्प करू दे, ती डोळ्यांनी आर्जव करत होती पण तो बधला नाही. त्याने पटकन तिची हनुवटी धरून ओठांवर ओठ टेकले आणि उठून उभा राहिला. "नाऊ सिट!"

तरी ती उठून उभी राहिली. "स्टे देअर!" तो उलट पावली मागे जात म्हणाला.

"हे! आय एम नॉट युअर डॉग!" ती ओठांचा चंबू करत ओरडली.

"हम्म, असायला हवी होतीस - म्हणजे माझं ऐकलं तरी असतंस!" तो चेहरा गंभीर करून किचनकडे जात म्हणाला. ती वाकडं तोंड करून सोफ्यावर मांडी घालून बसली आणि कॉफीचा मग उचलून तोंडाला लावला. पंधरा वीस मिनिटात तो दोन प्लेट्समध्ये गरमागरम दाल खिचडी घेऊन आला. शेजारी कैरीचं लोणचं आणि दुसऱ्या प्लेटमध्ये काकडी टोमॅटोचं सॅलड होतं. 

तिचं हृदय पूर्णपणे वितळलं. तिने खिचडीवर तोंड नेऊन, डोळे मिटून खोल श्वास घेतला. "धिस इज टू मच! मला एवढं पॅम्पर करायची गरज नव्हती." ती हसत म्हणाली. त्याने शेजारी बसून तिला जवळ घेत तिच्या दंडावरून हात फिरवला. "इट्स नथिंग! हॅपी दिवाली!"

"अरे हो, हॅपी दिवाली" ती त्याच्या गालावर ओठ टेकत म्हणाली.

---

चारच्या सुमारास जरा जवळपास हिंडू म्हणून ते बाहेर पडले. सायरा चंदाबरोबर एकदा इथे आली असताना धबधब्यावर गेली होती ते आठवून तिने अनिशला त्या पाऊलवाटेवर वळवले. दोन्ही बाजूला वाऱ्याच्या झोताने हलणारे उंच गवत आता वाळून सोनेरी झाले होते. थोड्या पावसाने रपरप झालेला चिखल तुडवत ते धबधब्याजवळ पोचले तर तिथे कड्यावरून जेमतेम मनगटाएवढी धार पडत होती. शिट! सायराने घामेजल्या कपाळावर हात मारला. अनिश तो 'धबधबा' बघून हसत सुटला. सायराचं पडलेलं तोंड बघून 'इट्स ओके बेब' म्हणत तो जवळ जातच होता, तेवढ्यात त्याच्यामागून लहान मुलाची किंकाळी आणि पाठोपाठ रडं ऐकू आलं. त्यांनी पटकन तिकडे धाव घेतली.

पाड्यावरचा एक तीन चार वर्षाचा मुलगा कातळावर बसून रडत होता, त्याचा दोन चार वर्षांनी मोठा भाऊ पाय हातात धरून काटा काढायचा प्रयत्न करत होता. थांब! अनिश जोरात ओरडला. तो मुलगा घाबरून त्याच्या तोंडाकडे बघत राहिला. लहानग्याच्या रबरी स्लीपरमधून आरपार जाऊन तळपायात मोठा काटा रूतला होता. सायराने मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला जरा शांत केले आणि अनिशने हलक्या हाताने काटा मोडू न देता अलगद बाहेर काढला. पण आता तिथून रक्त यायला लागले होते. जखम हाताने दाबून धरत त्याने मुलाला उचलले आणि मोठा भाऊ दाखवेल त्या पायवाटेने त्याला घरी घेऊन गेला.

पाड्यावर पत्रे आणि गवताने शाकारलेली जेमतेम वीस घरं होती, समोर स्वच्छ सारवलेली अंगणं आणि मधून मळलेली पायवाट. पाड्यावरचे बहुतेक सगळे टणके लोक कामावर बाहेर गेले होते. डॉक्टर आले म्हटल्यावर तिथल्या घरात शिल्लक असणाऱ्या म्हाताऱ्या आणि लहानलहान पोरं गोळा झाली. पाड्यावरच्या आशा वर्करने त्याला मेडिकल किट आणून दिलं. जखम धुवून बेसिक ड्रेसिंग करून होईतो त्या मुलाच्या आजीने जरा बऱ्यापैकी 'कोप' शोधून त्यांना गुळाचा कोरा चहा आणून दिला. तेवढ्यात समोर एक साठीची बाई डोक्यावर धुण्याचं गाठोडं घेऊन जाताजाता थांबली. तिने डोळे बारीक करून अनिशकडे बघितले आणि एकदम गाठोडं खाली टाकून त्याच्याकडे आली. "अरे माज्या पोरा!" म्हणत तिने कडाकडा त्याच्या तोंडाभोवती बोटं मोडली. "तू हिकडं कुठं आला डॉक्टर?"

"अरे! सरूबाई तुम्ही इथे राहता होय! आम्ही असंच फिरायला आलो होतो." तो ओळखीचं हसला. "ह्या सरुबाई. नवघरच्या PHC मध्ये आया म्हणून काम करायच्या, मी तिथे रूरल इंटर्न असताना!" तो सायराकडे बघून म्हणाला. ओह, ती सरुबाईकडे बघून हसली.

"हाव, आता रिटायर झाली मी." कपाळाला काळी टिकली आणि गळ्यात पोवळ्याचा सर घातलेली सरुबाई समोरचे पडलेले दात दाखवत हसली. "ही तुजी मिशेश काय?" तिने उत्सुकतेने विचारलं.

सायराने ओठ दाबून हसत त्याच्याकडे बघितलं. त्याने मान हलवली. "कसा जोडा शोभतो माssय." म्हणत तिने पुन्हा एकदा दोघांची दृष्ट काढली. "आता मी जेवल्याबिगर जाऊ देयची नाय." म्हणत तिने त्यांना सोडलंच नाही. घरात तिचा मुलगा, सून आणि लहान नातवाबरोबर बसून तिने त्या लहानश्या गावातल्या सरकारी हेल्थ सेंटरचे, त्याच्या इंटर्नशिपचे किस्से रंगवून रंगवून सांगितले. तिच्या वाक्यावाक्यातून अनिशचं कौतुक ओसंडून वहात होतं. सायरा अभिमानाने त्याच्याकडे बघत बसली होती. अनायासे डॉक्टर आलाय तर दाखवून घेऊ म्हणून लहान मुलांची रीघ लागली, अनिशनेही त्यांना बघून काहींना प्रिस्क्रिप्शन लिहून दिली, काही बायकांना मुलांच्या आहाराबद्दल सल्ले दिले.

संध्याकाळ होताच पाड्यावरचा अंधार उजळून टाकत सगळ्या घरांच्या दाराबाहेर मातीच्या दोन दोन पणत्या लागल्या. कसलेही फटाके फोडून धूर न करता लोक देवीची पूजा झाल्यावर फेर धरून ढोलक वाजवत तारपा नाचले. अनिशला तिथे मनापासून सगळ्यांमध्ये मिसळून एन्जॉय करताना बघून तिला नवल आणि आतून तेवढंच छान वाटत होतं.

आज गावदेवीला सगळ्यांनी चवळीच्या शेंगा, काकडी, गूळ आणि तांदळाच्या भाकरीचा नैवेद्य दाखवून झेंडूच्या फुलांनी पूजा बांधली होती. सरूबाईच्या सुनेने एकीकडे चुलीत भाजलेले करांदे, कोनफळाचे मीठ लावून परतलेले काप, चवळीच्या शेंगांची भाजी, नव्या तांदळाची भाकरी आणि बरोबर काकडीच्या रसातले वडे असा स्वयंपाक केला. तिच्या म्हणण्यानुसार चवळी, नवा तांदूळ, काकडी, कोनफळ आणि करांदे ह्या पाच गोष्टी आदिवासी दिवाळीत पुजून मगच खायला सुरुवात करतात. जेवण आणि भरपूर गप्पा मारून झाल्यावर अनिशने सरुबाईच्या नातवाच्या हातात ती नको म्हणत असतानाही थोडे पैसे दिले.

जेवण झाल्यावर सरूबाईचा मुलगा टॉर्च घेऊन त्यांना घरापर्यंत सोडायला आला.

---

"अनिश, इट्स लाईक आय नेव्हर न्यू यू!" हातपाय धुतल्यावर कपडे बदलून ती त्याच्याशेजारी बसत म्हणाली. तो मान हलवून हसला.

"मी खरंच बाकी सगळ्यांप्रमाणे तुला एक कोरडा, खडूस सर्जन समजत होते. आय वॉज टोटली रॉन्ग. तू तिथे त्या साध्या माणसांच्यात जितकं मनापासून प्रेमाने आणि त्यांच्यातलाच एक असल्यासारखं वागत होतास तसा तू असशील, असा मी आधी कधी विचारही केला नव्हता. आय एम रिअली प्राउड ऑफ यू.. आणि तू रूरल इंटर्नशिप पण केली होती? मला वाटलं बाकी श्रीमंत मुलांसारखा पेनल्टी भरून सुटला असशील." ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली.

"अम्मा! ती दर रविवारी गावात जाऊन फ्री कॅम्प घ्यायची. त्यामुळे रूरल इंटर्नशिप चुकवायचा प्रश्नच नव्हता." आता विषय निघालाच होता तर त्याला तिला बरंच काही सांगायचं होतं पण ते दोघेही खूप दमले होते. त्याने तिच्याकडे वाकून बघितलं तर तिच्या पापण्या जडावल्या होत्या. ओके, सम अदर टाईम.. म्हणत तो गप्प राहिला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle