बदतमीज़ दिल - ३९

पहाटे जाग आली तीच इमर्जन्सी कॉलने! पटापट आवरून निघताना, तो नको म्हणत असतानाही सायराने तिची सुट्टी आवरती घेतली आणि दोघांनी हॉस्पिटल गाठलं. जाता जाता कारमध्ये अनिशने सर्जरीबद्दल बोलताना 'इन यूटरो' म्हणताच तिचे डोळे विस्फारले.

पेशंट होती रेशम सिंघल, नवउद्योगपती आणि शार्क टॅंकचा जज गौतम सिंघलची बायको. सायराच्या भुवया उंचावल्या. दहा दिवसापूर्वीच इंस्टावर रेशमच्या बेबी बम्प शूटचे फुलांचा मुकुट घालून, गाऊन लहरणारे फोटो नेहाने तिला दाखवले होते. ही तिची दुसरी प्रेग्नसी होती. मोठी मुलगी चार वर्षांची होती. रेशमचे सव्वीस आठवडे उलटून गेले आणि अचानक लेटेस्ट स्कॅनमध्ये गर्भाच्या हृदयावर लहानसा ट्यूमर वाढताना दिसला होता. ही लाखात एक केस होती. पुढच्या एखाद दोन आठवड्यात पोटातच गर्भाचे हृदय बंद पडू शकत होते.

तिचे ओबी सर्जन आणि फीटल ऍनेस्थिओलॉजिस्ट ओटीमध्ये अनिशची वाट बघत थांबले होते. अनिशबरोबर अजून एक जनरल सर्जन, रेसिडेंट डॉक्टर्स, असिस्टंटस्, नर्सेस अशी भलीमोठी टीम काम करणार होती. गौतम सिंघल बाहेर फोनवर कुणाशी तरी जोरजोरात वाद घालत होता. अनिश पॅसेजमध्ये येताना दिसताच तो जवळ जाऊन, "डॉक्टर, मेरे बेबीको बचाईये. उसे कुछ नही होना चाहीये. पहले ही हमारे बहोत सारे ivf फेल हुए है. ये वाला बचना चाहीये. मैं पानी की तरह पैसा बहा दूंगा. मुझे तो उसको सर्जरी के लिये यूएस ले जाना था, लेकीन टाइम नही है!" अनिशने वैताग चेहऱ्यावर न दाखवता फक्त मान हलवली आणि आत गेला.

टीम तयार होती. रेशमला टेबलवर ठेऊन वर चार भलेमोठे लाईट्स सोडले होते. सगळे रिपोर्ट्स बघून झाल्यावर ऍनेस्थेशीया दिला गेला. गर्भातल्या बाळाला झेपेल इतकीच भूल दिली होती. रेशम आणि गर्भातील बाळ दोघेही आता पूर्णपणे भुलीच्या अमलाखाली होते. रेशमच्या ओटीपोटावर कट देऊन ओबी सर्जनने गर्भाशय उघडला. बाळाचं वजन जास्त होतं. घडी घातलेल्या हातातून छाती दिसत नव्हती.

दुसऱ्या सर्जनने अलगद बाळाचे डोके आतच ठेवून खांदे धरले आणि दोन्ही हात आईच्या पोटातून बाहेर काढले. आता हृदयाचा ऍक्सेस मिळाला. अनिशने सफाईदारपणे बारीक कट घेत, हृदयावरची ट्युमरची ग्रोथ पूर्ण कापून काढली आणि जखम बंद केली. ओबी सर्जनने गर्भाशय पुन्हा शिवून बंद केला. या सगळ्यात काही तास निघून गेले. आता अजून दहा-अकरा आठवडे तरी बाळ पोटात राहून नैसर्गिकरित्या त्याची वाढ होणे गरजेचे होते. तोपर्यंत रेशमला हॉस्पिटलमध्येच अंडर ऑब्झर्वेशन रहावे लागणार होते. 

सगळे पॅरामीटर्स ओके करून ओटीचं दार उघडताच बाहेरून गौतमच्या ओरडण्याचा आवाज आला. बाहेर नर्सेस, रिसेप्शनिस्ट वगैरे वैतागून डोक्याला हात लावून बसल्या होत्या. अनिश त्याच्याशी एक अक्षरही न बोलता स्क्रब करायला निघून गेला. ओबी सर्जनने थांबून बाळ व्यवस्थित असल्याचं सांगितल्यावरही तो आक्रस्ताळा माणूस शांत बसत नव्हता, त्याची प्रतिक्रिया होती "मेरा बेबी लाखोंमे एक है, उसका डिसीज भी लाखोंमे एक ही होगा ना!"

---

"वॉव! दॅट वॉज अमेझिंग! आपल्या हॉस्पिटलमधली ही अशी पहिलीच केस आहे ना?" काही वेळाने हातात दोन मग घेऊन त्याच्या केबिनमध्ये येत सायरा उद्गारली.

त्याने फाईलमधून डोकं वर केलं. तो हसला तरी कपाळाची आठी कायम होती. "हम्म, पहिलीच." त्याने पटकन कॉफीचा एक घोट घेतला. "ह्याला म्हणतात एनटायटल्ड! इथे ह्या मुलाला जगात येण्यापूर्वीच सगळ्या सेवा मिळत आहेत, आय मीन ठीक आहे त्यात त्या बाळाची काही चूक नाही पण त्याचवेळी आपल्या देशात अशी कित्येक बाळं मरतायत ज्यांना जन्म झाल्यावरसुद्धा पैशाअभावी, फॅसिलिटीजअभावी मदत मिळत नाही. मला हेच बदलायचं आहे."

तिने ऐकताना मान हलवली. तो अजून काही बोलणार इतक्यात पोस्ट ऑप व्हिजीटसाठी डॉ. निलेश त्याला बोलवायला आला. नंतर शिफ्ट संपेपर्यंत तिला तो दिसलाच नाही. शिफ्ट संपून घरी गेल्यावर तिला एकटेपणा खायला उठला. अनिश आज हॉस्पिटलमध्येच थांबणार होता. सोनलच्या केसमुळे पुढे ढकललेलं शेड्यूल आता संपवायचं होतं. पुढचे तीन चार दिवस असेच कामाच्या रेट्यात गेले.

अनिशबरोबर धड बोलायलाही वेळ नव्हता. दोन दिवस अनिशही थोडा अलिप्त, कसल्यातरी विचारात दिसत होता. शनिवारी सकाळी हॉस्पिटलकडे निघतानाच तिच्या डोक्यात विचार सुरू होते. हुश्श, उद्या रविवार आणि तिने जुळवून आणलेला दोघांचा ऑफ. दोन दिवसांनी नेहा येण्यापूर्वी हा एकच दिवस सुट्टीचा होता. लेट्स मेक इट इव्हेंटफुल! तिने जीभ चावली.

ती पार्किंगमधून लिफ्टकडे वळली. आज तिने स्किनी फिट ब्लॅक ट्रेगिंग्ज आणि सुळसुळीत बटन डाऊन फ्लोरल टॉप घातला होता. लिफ्ट खाली आली आणि तिच्यासमोरच अनिश आत शिरला. एकटाच दिसतोय म्हणून हसत त्याच्यामागोमाग ती आत गेली. त्याने तिच्याकडे बघून भुवया उंचावल्या, तो पुढे काही बोलणार इतक्यात लोकांचा लोंढा आत घुसला. तो मागे भिंतीला टेकला आणि दार बंद होताना लोकांच्या गर्दीमुळे ती त्याच्यावर ढकलली गेली. तिला पाठीमागे त्याची जाणीव होत होती, त्याच्यामधून येणारी उष्णता तिचं डोकं हलकं करायला पुरेशी होती. तिचा त्याला किंचित स्पर्श झाला, लिफ्टमध्ये हलायलाही जागा नव्हती. तिच्या मानेवर त्याचा उबदार श्वास फुंकर मारल्यासारखा जाणवला.

तिसऱ्या मजल्यावर अजून कोणीतरी लिफ्टमध्ये शिरलं आणि मागे सरकताना ती पूर्णच त्याला टेकली. तिच्या नसानसांमधून उष्णतेची लहर झुपकन वहात गेली. तिला आता त्याच्या अंगाचे सगळे चढ उतार जाणवत होते आणि प्रत्येक श्वासाबरोबर खालीवर होणारी त्याची छाती. तिचा श्वास रोखला गेला, इतक्या जवळून त्याचा हलका मस्की सुगंध तिच्या नाकातून डोक्यात शिरत होता. तिच्या मणक्यातून ठिणग्यांची ओळ सरकत होती आणि त्वचेच्या प्रत्येक जराश्या स्पर्शाने चटका बसत होता.

शिट! त्याचे जुने स्पर्श आठवून तिच्या अंगाचा कण न कण पेटण्याच्या बेतात होता. समोर दारावरच्या डिजिटल डिस्प्लेवर मजल्यांचे नंबर्स काकवी ओघळल्यासारखे हळूss सरकत होते. सातव्या मजल्यावर लिफ्ट थांबताच ती ताडकन गर्दीतून बाहेर पडली. तो तिच्या शेजारून शुभदाला गुड मॉर्निंग म्हणून केबिनकडे निघून गेला. शुभदा भुवया उंचावून तिच्याकडे बघत होती. ती शांतपणे त्याच्या मागोमाग चालत दार ढकलून आत गेली आणि दार आतून लॉक केलं. त्याने खिडकीचे ब्लाइंडस् खाली करेपर्यंत ती त्याच्याजवळ पोचली होती. इट्स गोइंग टू बी अ गुड मॉर्निंग!

---

लंच ब्रेकनंतर ती सोनलला बघायला निघाली होती. आज पहिल्यांदा सोनल स्वतःच्या पायावर उभी राहून चालली होती. ती पॅसेजमध्ये गेली तर थोडी गर्दी, डॉ. पैंच्या नावाची कुजबुज आणि कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्सची आरडाओरड ऐकू आली. तिला वाटलं सोनलमुळेच हे सुरू आहे. शुभदाच्या डेस्कवर दोन तीन मोठे बुके ठेवले होते. त्याच्या केबिनच्या दारासमोर गर्दीमागून पूर्वा टाचा उंचावून बघत होती. सायरा तिच्याशेजारी जाऊन उभी राहिली. "ओह माय गॉड! ही गॉट इट!!" पूर्वा तिचे खांदे घट्ट धरून ओरडली.

"व्हॉट?" तिने अजाणतेपणी विचारलं.

"गेट्स फाउंडेशनची फुल ग्रँट!"

ओह माय गॉड! तिने तोंडावर हात ठेवला. तिचा विश्वासच बसत नव्हता. ह्या रिझल्टच्याच तो तणावात असणार. ही मस्ट बी फ्रीकिंग आउट! केवढे लोक जमलेत सेलिब्रेट करायला. वॉव!

"दॅट्स अमेझिंग!!" तिच्या चेहऱ्यावर मोठं हसू पसरलं.

"आय नोss रूरल मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी फुल फंडिंग आणि गव्हर्नमेन्ट सबसिडी! चिखलदरा की कायतरी जागा आहे ना, तिथे होणार आहे हे हॉस्पिटल. अरर, मी तुला कश्याला सांगतेय, तुला माहितीच असेल!" पूर्वा उत्साहात बोलत होती.

एक मिनिट, काय?!

रूरल हॉस्पिटल?

चिखलदरा?

तिने डोळे मिटून सगळ्याची संगती लावायचा प्रयत्न केला. चिखलदरा? म्हणजे ते विदर्भातलं गाव? मुंबईपासून पाचशे सहाशे किमी, की वेगळं काही?

"ओह, हे तुझ्यापासून पण सिक्रेट ठेवलं होतं का? लंचपर्यंत कुणालाच काही कळलं नव्हतं. बहुतेक डॉ. पैनाही माहीत नव्हतं. लंचनंतर इमेल आली आणि सगळ्यांना कळलं. डॉ. पै कसले सुपर नर्व्हस असतील.. त्यांनी ग्रँट मिळाल्याचं सांगितलं का तुला?" पूर्वाने मान वाकडी करून विचारले.

"हम्म, नाही. म्हणजे लंचपासून आम्ही भेटलोच नाही." ती जरा पडलेल्या चेहऱ्याने म्हणाली.

त्याने तिला जिंकल्याचं सांगितलं नव्हतं. त्याचा प्रोजेक्ट म्हणजे एक अख्खं हॉस्पिटल असेल आणि ते चिखलदऱ्याला असेल वगैरे तिला काहीच सांगितलं नव्हतं. तो ग्रँट मिळण्याची वाट बघतोय एवढंच तिला माहिती होतं पण ग्रँट म्हणजे काहीतरी पैशांची मदत किंवा सध्याच्या हॉस्पिटलच्या ट्रस्टला मदत एवढंच वाटत होतं. आता कळल्यावर तिच्या पायाखालची जमीन निसटून चालली होती.

हे स्वप्न आहे की सत्य? मी लंच टाईममध्ये एवढी चॉकलेट्स उगाच खाल्ली, हे नक्की शुगर इंड्यूस्ड नाइटमेर आहे. तिने पोटावर हात ठेवून सुस्कारा सोडला. पूर्वाने काळजीने तिच्याकडे पाहिलं. "सायरा, आरन्ट यू टू टूगेदर? म्हणजे दिवाळी पार्टीनंतर आम्हाला असंच वाटत होतं."

तिने हो नाहीच्या उंबरठ्यावर अर्धवट मान हलवली. हम्म, मलाही असंच वाटत होतं. पार्टीत, येऊरच्या घरी, सकाळी त्याच्या केबिनमध्ये.. तिने नकळत गळ्यापाशी त्याच्या लव्ह बाईटला स्पर्श केला. आत्तापर्यंत मला वाटत होतं आमचं एक छान भविष्य आहे. पण हे वेगळंच काहीतरी सुरू झालंय. हे समोर एवढे लोक का आहेत, मला प्रयत्न करूनही त्याच्यापर्यंत पोचता येणार नाही.

"हेय सॉरी, तुला अपसेट करायचं नव्हतं." पूर्वा तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.

ती किंचित हसली. तुझी काही चूक नाही ग पूर्वा.

चूक असलीच तर अनिशची आहे.

आणि त्याच्या मोठ्या स्वप्नांची.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle