बदतमीज़ दिल - ४०

"सगळं ठीक आहे ग. मला अर्ध्या तासात सर्जरी आहे म्हणून थोडी टेन्स झालेय. बाय, मी पळते." म्हणून ती निघाली. लिफ्टबाहेर पाऊल ठेवताच सर्जिकल फ्लोर रिकामा दिसला. बरोबर, सगळे अनिशच्या केबिनबाहेर आहेत. तिने सर्जरी बोर्डवर त्यांना असाईन केलेली रूम बघितली आणि स्क्रब झाल्यावर आत जाऊन कामाला सुरुवात केली. मान खाली करून तिने कामावर लक्ष एकवटले. एकामागोमाग एक मेथॉडीकली तिचे हात एका लयीत चालू लागले. तिला हेच जमत होतं आणि हे करण्यावरच तिचं प्रेम होतं.

अनिशने तिच्या हृदयाच्या अपेक्षा दहापट वाढवण्यापूर्वी तिच्यासाठी एवढंच पुरेसं होतं. तिची तयारी संपताना बाकी लोक हळूहळू आत येऊ लागले. प्रत्येकाकडून अनिशच्या प्रोजेक्टबद्दल आणि लहान मुलांना त्याचा किती उपयोग होईल ते ऐकताना ती फक्त मान हलवून हसत होती. आज ओटीच्या हवेत एक उत्साह पसरला होता. प्रत्येकाला आज अनिशबरोबर काम करण्याची उत्सुकता होती. ती सोडून.

सगळ्यांना तिच्यापेक्षा जास्त माहिती आहे या गोष्टीचा तिला राग येत होता. आणि तिला राग येतोय ह्या गोष्टीचा अजून राग येत होता. कारण हे हॉस्पिटल खूप मुलांना जीवदान देणार होतं, चांगलं आयुष्य जगण्याची एक संधी देणार होतं. अनिश त्यांच्यासाठी खराखुरा सुपरहिरो ठरणार होता. त्यासाठी त्याच्यावर रागावणं योग्य नाही हे कळत होतं पण तरीही खूप आतून ती चिडली होती.

तो आत आला तेव्हा ती इन्स्ट्रुमेंट ट्रे तयार ठेऊन टेबलाशेजारी उभी होती. त्याचं लक्ष फक्त तिच्यावर होतं. तो सरळ तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. पलीकडून काँग्रॅटस म्हणणाऱ्या ऍनेस्थिओलॉजिस्टकडे त्याने फक्त एक नजर टाकून मान हलवली. "सायरा, मी तुला दुपारपासून कॉल करायला बघत होतो."

"नाही."

"काय?"

"माझ्या फोनवर एकही मिस्ड कॉल नाहीये." आता ओटीमधले बाकी लोक तिच्याकडे पाहू लागले.

"सगळं रेडी आहे, लेट मी टाय युअर एप्रन!" म्हणत ती पुढे झाली. ती तिच्या पद्धतीने सांगू पहात होती की स्टॉप. आत्ता नको. सगळ्यांसमोर नको. तो चिखलदऱ्याला कायमचा जाणार हे ऐकून मुसमुसत तिला सगळ्यांसमोर हसं करून घ्यायचं नव्हतं. माझी थोडी तरी डिग्निटी राहू दे. TYSM.

सर्जिकल गॉगलमधून त्याचे डोळे अजूनही तिला सोडत नव्हते. तो तिला काहीतरी सांगू पहात होता.
काय? मी काय करू अनिश?

तिने वळून त्याचा एप्रन उचलला आणि बांधायला सुरुवात केली. दोघांनीही पुढे एक शब्द बोलला नाही. ती स्क्रब होऊन टेबलापलीकडे जाऊन आपल्या जागेवर उभी राहिली आणि रोल कॉल सुरू झाला.

"सायरा, यू आर अप." त्याचा थंड आवाज आला. सर्जनचा आवाज. तिने स्वतःला शांत करत सांगितलं. "सायरा देशमुख, सर्जिकल असिस्टंट." सवयीने शब्द बाहेर पडले. तिची त्याच्याशी नजरानजर झाली तेव्हा त्याच्या नजरेत कुठलेच भाव नव्हते.

मी सकाळचीच सायरा आहे, अनिश.

तू बदलला आहेस.

आजची साधी स्टेंट बसवण्याची प्रोसिजर लवकर संपली. ती स्क्रब आउट होऊन बाहेर आली तेव्हा तो पोस्ट ऑप रूममधून बाहेर तिच्या दिशेने येत होता. त्याचा प्रेझेंस त्या पॅसेजमध्ये सगळीकडे जाणवत होता. तो लोकांपेक्षा अर्धा फूट उंच होता आणि त्याच्या डोक्यावरचे चमकणारे दाट केस दहा शेड जास्त गडद होते. त्याने काहीही प्रयत्न न करता लोक वळून त्याच्याकडे बघत होते.

तिला त्याच्या शेजारून जायचं नव्हतं, बरीच कामं बाकी आहेत. पण तो तिचा रस्ता अडवून पुढ्यात उभा राहिला आणि खाली तिच्या डोळ्यात पाहिलं.

"तुझ्याशी एक मिनिट बोलू शकतो का?"

त्याला नक्की मी त्याच्याशी भांडेन असं वाटतंय पण मी इतकी बालिश नाहीये. ओठ दाबत हसून तिने मान हलवली.

"ऑफ कोर्स. कुठे जाऊन बोलायचंय?"

त्याने तिचं कोपर घट्ट धरलं आणि शेजारच्या ऑन कॉल रूममध्ये घेऊन गेला. भिंतीलगत स्टीलचे सिंगल बेड्स एकावर एक रचून ठेवले होते. उरलेली जागा एका लाकडी डेस्कने व्यापली होती. आतले दिवे बंद असल्यामुळे बऱ्यापैकी अंधार होता. "काँग्रॅट्स ऑन द ग्रँट, अनिश! आय एम रिअली हॅपी फॉर यू." तीच आधी बोलली. कारण ते खरंच होतं. ती हर्ट झाली असली तरी त्याच्यासाठी खरंच खुश होती. त्याच्याइतका डिझर्विंग अजून कोणी डॉक्टर तिला माहीत नव्हता.

"मी तुला ग्रँटबद्दल सगळं सांगणार होतो." तो तिच्याजवळ येत म्हणाला. त्याने तिचे दोन्ही दंड धरून ठेवले आणि घडाघडा बोलत सुटला. "फक्त हा डिसीजन कळेपर्यंत मला उगीच राळ उडवायची नव्हती. तो दुसरा डॉक्टर जिंकण्याची पूर्ण शक्यता होती."

तिने मान हलवली. हम्म, बेनिफिट ऑफ डाउट.

"आणि ते कसं सांगायचं तेही कळत नव्हतं, की ओह बाय द वे, मी चिखलदऱ्याला शिफ्ट होणार आहे!"

"हम्म, म्हणून त्याऐवजी मला अंधारात ठेवणं उत्तम!" ती तिरकस हसली.

तिच्या शब्दांचा डंख लागल्यासारखा तो मागे झाला. "नो सायरा. नो. मला आपल्यात जे काही सुरू होतं ते टिकवायचं होतं, कशात काही नसताना हे सांगून गोष्टी कॉम्प्लिकेट करायच्या नव्हत्या."

तिने मान हलवून सुस्कारा सोडला. तिला दोघांसाठी वाईट वाटत होतं. "सॉरी, माझा तो अर्थ नव्हता. मला एवढंच म्हणायचंय की मला हे सगळं आधीच माहीत असतं तर बरं झालं असतं."

"आय एम सॉरी. आय रिअली ऍम. मी स्वार्थीपणा केला..."

तो एकूण एक बरोबर गोष्टी बोलतोय पण माझे म्हणणेही बरोबर आहे. त्याच्याकडे सगळ्या गोष्टींची उत्तरं आहेत पण तो इथून निघून जाणार हेही तेवढंच खरं आहे.

"तुला कधी जायचंय?" तिने आवाजात कुठल्याही भावना न येऊ देता विचारले.

"अजून साधारण सहा महिने." त्याचा आवाज गंभीर होता.

हम्म. हीच आमची टाइमलाईन आहे. साधारण सहा महिने. मेबी वी कॅन मेक देम काऊंट. कदाचित तो जाण्यापूर्वी मी त्याच्याबरोबर आयुष्यभराच्या आठवणी गोळा करून ठेवीन.

"सायरा, चिडू नकोस. एवढं दुःखी व्हायचीही गरज नाहीये. इन फॅक्ट, मी विचार करत होतो, तू माझ्याबरोबर येशील का?" त्याने वाकून तिच्या चेहऱ्यासमोर येत विचारले.

"तुझ्याबरोबर?" ती गोंधळून गेली.

"सिरियसली. मी गेले कित्येक दिवस हा विचार करतोय. मला सर्जरीमध्ये, हॉस्पिटल चालवण्यात, टीम तयार करण्यात तुझी मदत लागेल. मला तू माझ्या शेजारी हवी आहेस."

ती त्याचं म्हणणं समजून घ्यायचा खूप प्रयत्न करत होती. पण अजूनही सगळं तिच्या पचनी पडत नव्हतं. "माझं सगळं आयुष्य इथे आहे. मुंबई सोडून मी कधीही कुठे गेले नाहीये. आणि नेहा आहे. असं अचानक सामान बांधून मी कुठे निघून नाही जाऊ शकत."

"नेहासाठी आपण करू काहीतरी.."

"प्लीज स्टॉप. जस्ट स्टॉप. एवढे सगळे प्लॅन्स करताना मला त्यात इंक्लूड करावंसं का वाटलं नाही? मी तिला एकटं सोडून इतक्या लांब राहू शकणार नाही. ना ती आपल्याबरोबर येऊ शकणार." ती मोठ्याने म्हणाली. "आपण फक्त गेले काही आठवडेच एकत्र आहोत अनिश! स्वतःला माझ्या शूजमध्ये ठेवून बघ. विचार करून पहा!"

तेवढ्यात एक रेसिडन्ट दार उघडून डोळे चोळत आत आली. काळोखात त्यांच्याकडे लक्ष जाताच ती स्तब्ध झाली आणि ओह क्रॅप! सॉरी सॉरी...  म्हणत बाहेर पळाली. सायराला तिच्या मागोमाग बाहेर पडावंसं वाटलं पण तिने खोल श्वास घेतला आणि शब्दांची जुळवाजुळव केली. "तुला ग्रँट मिळाली म्हणून मला खूप, खरंच खूप आनंद झालाय. तुझ्याहून जास्त हे कोणीच डिझर्व करत नाही. आय विश, तू हे सगळं मला आधी सांगायला हवं होतं, पण का नाही सांगितलं तेही पटतंय. आपलं नातं अजून नवंनवं आहे तोच गढूळ करायला नको असं वाटणं साहजिक आहे. आय गेट दॅट. माझ्या मनात आता राग नाहीये. मला फक्त... हे सगळं पचवायला, विचार करायला थोडा वेळ हवाय. बस!"

त्याने मान हलवली आणि तिला अलगद मिठीत घेतली. त्याची मिठी पहिल्यांदाच तिला नको वाटत होती. याआधी इतकं ऑकवर्ड आणि टेन्स कधी वाटलं नव्हतं. अव्यक्त विरोध म्हणून तिने हात खालीच ठेवले आणि त्याच्यामागच्या पांढऱ्या भिंतीकडे बघत राहिली. तिचं एक मन त्याच्यापासून लांब व्हायला सांगत होतं तेवढ्यात त्याने मिठी थोडी घट्ट केली आणि तिने मेंदूचं न ऐकता कपाळ त्याच्या छातीवर टेकलं. श्वास मंदावला आणि राग हळूहळू वितळला. हा लहानसा कम्फर्ट हवाहवासा वाटत होता.

त्याने वाकून हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवली. एकमेकांच्या इतक्या जवळ असण्याचा खूप थोडा वेळ आता शिल्लक असल्याची जाणीव झाली आणि तिच्या हृदयाचे पुन्हा थोडे तुकडे झाले.

"इट डझन्ट हॅव टू एन्ड." तो तिच्या कानाजवळ पुटपुटला. "ही ग्रँट आपल्या दोघांच्या गोष्टीची चांगली सुरुवात ठरू शकते. प्लीज थिंक अबाउट इट."

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle