बदतमीज़ दिल - ४३

तिने दारात उभी राहून सोफा ते डेस्क ते त्याची खुर्ची आणि मोठया खिडकीपर्यंत पूर्ण केबीनभर नजर फिरवली. इथल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांच्या आठवणी होत्या. तिला तन्वीचे शब्द आठवले.

तुम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहात.

इट मेक्स परफेक्ट सेन्स फॉर हिम टू फॉल फॉर समवन लाईक यू.

ऑलमोस्ट ऍज इफ यू वर वन पर्सन इनस्टीड ऑफ टू.

अनिश कधीही बदलणार नाही. काम हाच नेहमी त्याचा फर्स्ट प्रेफरन्स राहील.

हो, त्याचं करियर ही त्याची पॅशन आहे आणि त्यात शंभर गोष्टी त्याला एकदम कराव्या लागतात. तो माझ्या प्रत्येक कॉलला उत्तर देणार नाही किंवा रोज रात्री घरी जेवायला येऊ शकणार नाही. मला कधीच त्याचं अनडिव्हायडेड अटेन्शन मिळणार नाही. काहींना हे वाईट वाटू शकतं पण माझं त्याच्यावरचं प्रेम याच गोष्टींनी अजून घट्ट होतं.

मी त्याला लोकांपेक्षा वेगळ्या प्रकारे समजून घेते. मी त्याला कधीच त्याच्या करियरपेक्षा मला महत्त्व द्यायला सांगणार नाही, ते त्याच्या हृदयाचे दोन तुकडे करण्यासारखं होईल. मेडिसिन हा त्याचा श्वास आहे आणि मला ते बदलायचं नाहीये. इन फॅक्ट मला फक्त त्याच्या आयुष्याचा एक भाग होऊन रहायला आवडेल. त्याला लोकांची आयुष्य वाचवताना बघणं, तो आजूबाजूच्या जगात बदल घडवताना त्याच्याबरोबर त्याची साथ देणं हेच मला हवंय. मला त्याचं थोडं ओझं शेअर करायचं आहे. आम्ही हे हॉस्पिटल एकत्र उभं करू शकतो. ओटीमधल्यासारखीच मी खऱ्या आयुष्यातही त्याची राईट हँड बनू शकते.

आम्ही एकमेकांसाठी परफेक्ट आहोत हे कळणारी मी बहुतेक शेवटची व्यक्ती असेन.

कदाचित हीच वेळ आहे, त्याला हे सगळं सांगण्याची.

काही वेळाने तो जोरात दार ढकलून आत आला, तिला शोधणारी त्याची नजर तिच्यावर स्थिरावली. त्याला बघून ती सोफ्यावरून उठून उभी राहिली. तिने वाट बघण्याचं प्रॉमिस पाळल्यामुळे त्याने श्वास सोडला. त्याने दार बंद केलं आणि त्या जड लाकडाबरोबर तिच्या मेंदूतला सगळा सेन्स, सगळा कंट्रोल खोलीबाहेर निघून गेला. शिल्लक होतं ते फक्त जोरजोरात धडधडणारं हृदय. ती पटापट पावलं उचलत त्याच्याजवळ पोचली आणि त्याच्या मिठीत स्वतःला झोकून दिले.

तिने चेहरा त्याच्या छातीवर स्क्रब्जमध्ये लपवला होता. तिच्या केसांमधून त्याची बोटं फिरत असताना ती त्याच्या कलोनचा हलका मस्की सुगंध नाकात भरून घेत होती. त्याचे हात तिच्या कंबरेभोवती होते आणि ते फक्त एकमेकांबरोबर श्वास घेत होते. त्याने तिला जमिनीपासून काही इंच वर उचलले. तो बहुतेक घाईत जिना चढून आला असावा कारण तो जोरजोरात श्वास घेत होता आणि तिच्या हाताखाली त्याचं हृदय धडधडत होतं. ती हवेत होती आणि तो पुनःपुन्हा प्रोजेक्ट सिक्रेट ठेवल्याबद्दल सॉरी म्हणत होता.

तिने डोळे मिटून हात त्याच्या गळ्यात टाकले आणि त्याला घट्ट धरून उभी राहिली जोपर्यंत डोक्यात निर्णय पक्का होत नाही. केबिनबाहेर नेहमीसारखी येजा सुरू होती पण आत त्यांच्या घट्ट मिठीत काळ थांबून राहिला होता. दोघांनाही धड श्वास घ्यायला अडचण झाली तेव्हा त्याने अलगद तिला खाली ठेवले आणि तिचा चेहरा तळहातांवर धरला. त्याने तिचा चेहरा वर करताच तिने आपोआप खालच्या ओठावरून जीभ फिरवली.

"सायरा.." त्याचा आवाज किंचित घोगरा झाला होता आणि दोन्ही भुवयांमध्ये एक खोल आठी होती.

ती मुठीत त्याचा शर्ट पकडून चवड्यांवर उभी राहिली आणि त्याचे ओठ येऊन तिला भिडताना तिच्या पापण्या बंद झाल्या. आधी तो गोष्टी हळुवार आणि नाजूक ठेवायचा प्रयत्न करत होता पण तिने टेम्पो वाढवला. "आय नीड धिस.." ती त्याच्या ओठांत कुजबुजल्यावर तो थांबला नाही. बऱ्याच वेळानंतर आपण कुठे आहोत ते लक्षात येऊन तो थांबला आणि तिला उचलून सोफ्याकडे घेऊन गेला. शेजारी बसून तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. "मला तुझ्याबरोबर यायचं आहे."

त्याला धक्काच बसला, बसणारच होता. म्हणून त्याने पुन्हा विचारले.

तिने हसून पुन्हा सांगितले. "मी चिखलदऱ्याला येणार आहे. मी हे सांगतेय हे मला अजूनही पटत नाहीये, पण मी येतेय. नेहा हॉस्टेलला रहायला तयार आहे, पण माझाच तिला सोडून पाय निघत नाही. सो कदाचित मी एखादं वर्ष इथे थांबूही शकते."

"तू थांबलीस, तर मीही थांबेन. ग्रँट नंतरही घेता येईल." तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला.

"अनिश!" ती त्याला दटावत ओरडली.

"सायरा!" त्याने तिची नक्कल केली.

"यू हॅव टू गो!" ती गंभीर होत म्हणाली. "हे सगळं अजून खूप नवीन आहे. कदाचित आपण काही वेळाने एकमेकांना कंटाळून जाऊ." त्याचं बोट तिच्या गालावरून फिरताना ती म्हणाली.

त्याच्या ओठाचा एक कोपरा वर उचलला गेला. "मेबी. मी ऐकलंय की मला टॉलरेट करणं खूप कठीण आहे. तूच माझ्यामुळे बोर होण्याचे चान्सेस जास्त आहेत."

"अ.. अनिश!" तिने त्याला ओरडायला उघडलेलं तोंड तिच्या गळ्यापाशी आलेल्या त्याच्या ओठांमुळे बंद झालं.

"काय?" तो भुवई उचलून तिला बोलत रहायचं आव्हान देत होता. व्यवस्थित नाम, सर्वनाम, क्रियापद वापरून वाक्य तयार करायचं आव्हान. पण ती फक्त डोळे मिटून त्याच्या पिळदार खांद्यात बोटं रुतवायचं कामच करू शकली. शेवटी त्याने तिच्या खांद्यावर डोकं टेकलं, त्याच्या पापण्या मिटलेल्या होत्या.

त्याला जगात परत यायचं नव्हतं. तिने त्याच्या छातीत बोट खुपसलं. "मला श्वास घेता येत नाहीये."
तो किंचित बाजूला झाल्यावर ती हसली. आम्ही दोघेही वेडे झालोय. कोणी काही आठवड्यात प्रेमात पडू शकतं का? की काही दिवस? काही मिनिटं? तिला हे कोडं सुटत नव्हतं म्हणून तिने सरळ त्यालाच विचारलं.

"मला प्लीज तुझ्या सगळ्या खऱ्या खऱ्या फिलिंग्ज पटापट सांगून टाक."

"आत्ता?" त्याने तिच्या खांद्यावरून चेहरा उचलत विचारले.

"हम्म.. आयडियल टायमिंग नाहीये पण मी निदान विषय तरी काढलाय." ती मागे होऊन त्याचे हात हातात घेत म्हणाली.

त्याने तिच्या स्क्रब्जमुळे निळसर दिसणाऱ्या डोळ्यात खोलवर पाहिले. "आय सी अ फ्यूचर विथ यू. म्हणजे अगदी चल उद्याच लग्न करू टाईप नाही पण एक व्यक्ती म्हणून तू मला खूप आवडतेस आणि मी तुझ्या प्रेमात पडलोय. यू आर ब्यूटीफुल, इनसाईड अँड आऊट. तू म्हणजे माझं ह्या सगळ्या धावपळीतून विसाव्याचं ठिकाण आहेस. यू मेक मी स्माईल!"

तिने हसून त्याच्या गालावर ओठ टेकले. पुन्हा त्याचे हात हातात घेऊन ती बोलू लागली. "मला खूप दिवस प्रेमात पडायची भीती वाटत होती, भविष्य कसं असेल याची भीती वाटत होती. तुझ्याबरोबर असतानाही मी खूपदा पळ काढायला बघत होते कारण माझी फॅमिली हिस्ट्रीच तशी आहे, प्रेमात वाहून जाण्याची. आता सांगायला हरकत नाही."

त्याने उत्सुकतेने भुवया वर केल्या.

"माझे पपा कस्टम्समध्ये ऑफिसर होते. नोकरीच्या सुरुवातीला त्यांची बदली काही काळ रत्नागिरीला झाली होती. तेव्हा माझी मम्मी कॉलेजला होती आणि तिच्या जाण्या येण्याच्या रस्त्यातच पपांचे ऑफिस होते. त्यांची कुठेतरी ओळख झाली आणि ते एकमेकांच्या हेड ओव्हर हील्स प्रेमात पडले. माझ्या मम्मीचं नाव आयशा सुर्वे, रत्नागिरीची कोंकणी मुस्लिम."

ओह! तो आश्चर्याने उद्गारला.

"हम्म, आमची नावं मम्मीने तिच्या आवडीची ठेवली आहेत. सायरा आणि नेहा!" ती जराशी हसली. "इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण नंतर मम्मीच्या घरी हे प्रकरण कळलं, तिचं कॉलेजला जाणं बंद झालं. मग एक दिवस पपा तिला पळवून मुंबईला घेऊन आले आणि लग्न झालं. त्यांच्या घरीही पूर्ण विरोध होता. लग्नाला कोणीच आलं नाही. दोघांच्याही घरच्यांनी त्यांना तुम्ही आम्हाला मेलात म्हणून सांगितलं होतं. पण तरीही अधूनमधून दोन्हीकडचे लोक येऊन धमक्या देऊन जात होते. पण पपा ठाम होते, त्यांनी मम्मीची खूप काळजी घेतली.

घर तर सुटलंच होतं, ते चाळीत भाड्याने जागा घेऊन रहात होते. पपांचा म्हातारा पारशी बॉस होता ज्याच्याशी त्यांची एकदम जानी दोस्ती होती. पपांनी त्याच्या आजारपणात वगैरे त्याची बरीच काळजी घेतली होती. तो रिटायर झाल्यावर एक दिवस चमत्कार झाल्यासारखं त्याने त्याचं घर पपांना गिफ्ट डीड करून दिलं आणि स्वतः नवसारीला एका आश्रमात रहायला गेला. तोपर्यंत नेहाचा जन्म झाला होता. काही वर्ष छान गेली पण एकदा पपाना स्मगलिंगची टीप मिळून त्यांनी मोठा छापा मारला. त्यानंतर धमक्यांचे फोन येऊ लागले आणि एकदा ऑफिसला जाताना रस्त्यात त्यांना ट्रकने धडक दिली. ते बराच वेळ रस्त्यात पडून होते, नंतर लोकांनी एका हॉस्पिटलमध्ये नेलं पण तिथे मदत मिळेपर्यंत ते गेलेच. तो खूनच होता पण वरून ते प्रकरण अपघात म्हणून दडपलं गेलं. नेहा तेव्हा फक्त दहा वर्षांची होती आणि मी एकोणीस." त्याने तिच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतली.

"ते गेल्यापासून मम्मी खचून गेली. तिच्या दोन्ही किडन्या हळूहळू फेल होत गेल्या. तीन वर्षे ती डायलिसिसवर होती. तेव्हा पपांची थोडी पेन्शन, पीएफ, इन्शुरन्सचे पैसे होते पण तिचं आजारपण आणि आमच्या शाळा कॉलेजच्या खर्चात ते कुठेच संपून गेले. त्यात पपांनी आम्हाला हौसेने कॉन्व्हेंटला घातलं होतं, त्यामुळे जास्तच खर्च. पपा गेले तेव्हाच मी मेडिकलला जायचं ठरवलं होतं पण मम्मी आजारी पडली आणि ते शक्य झालं नाही.  नंतर खूप वाईट दिवस बघितले, कॉलेज संपताच जॉब करायला लागले. नेहाला नीट मोठं करायचं होतं. पण मी कसंतरी नेलं निभावून. ह्या सगळ्या पडत्या काळात धर्माचा डांगोरा पिटणारे दोन्ही बाजूचे नातेवाईक आमच्या कधीच उपयोगी पडले नाहीत, मदत झाली ती फक्त माणूसकी समजणाऱ्या मित्रमंडळींची. त्यामुळे आम्ही दोघीही कुठलाच धर्म फॉलो करत नाही."

"मला नमाज पढता येतो आणि रामरक्षा, अथर्वशीर्षसुद्धा पाठ आहे कारण लहानपणी आम्हाला दोन्ही शिकवलं होतं, तरीही आय बिलीव्ह इन सायन्स! पण सगळे सण मात्र आम्ही खाऊन पिऊन सेलिब्रेट करतो, ईदला बिर्यानी आणि गणपतीला उकडीचे मोदक! पपा वॉज अ बिग फूडी! बहूतेक मम्मीच्या हातची बिर्यानी खाऊनच ते तिच्या प्रेमात पडले असतील. मी त्यांच्यावरच गेलेय!" ती थोडी हसली. "आईवडिलांच्या प्रेमामुळे पुढे जे सगळं झालं त्यामुळेच कुठलाही विचार न करता फक्त मनाचं ऐकून प्रेमात पडायला मी घाबरत होते. हे सगळं ऐकून, म्हणजे मी हाफ मुस्लिम आहे म्हणून तुला काही प्रॉब्लेम आहे का? "

"प्लीज.. मी असा विचार करेन असं वाटू कसं शकतं तुला? आय डोन्ट केअर!!" त्याने तिला स्वतःकडे ओढून तिच्या कपाळावर ओठ टेकले आणि हसत खाली तिच्या चमकत्या डोळ्यांत पाहिले, "आय बिलीव्ह इन सायन्स टू!"

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle