नभ उतरू आलं - ३

समर

पलोमाला घेऊन मी पहाटे शार्प साडेपाच वाजता सरनोबतवाडी ग्राऊंडवर पोचलो. रोज सकाळी नऊ वाजेपर्यंत हे ग्राउंड मला प्रायव्हेट प्रॅक्टिससाठी दिले आहे. इथल्या सिक्युरिटीमुळे कोणालाही माझ्याबद्दल पत्ता लागू दिला नाहीय, नाहीतर पोरं जाम गर्दी करतील. कुठेही मोकळेपणाने हिंडता, खेळता येत नाही हा सेलिब्रिटी होण्याचा तोटाय राव! तिला दिलेलं घर माझ्या मागच्याच गल्लीत आहे त्यामुळे पटकन पिक करून निघता आलं.

बऱ्याच वर्षांनी असं रिलॅक्स रहायला कोल्हापुरात येऊन एकदम झकास वाटतंय. इथली ताजी करकरीत हवा, पावसाळा संपत आल्यावरचा ओलसर मातीचा वास, आजूबाजूला पसरलेली हिरवाई. उगवतीला तांबडं फुटून डोंगरावर पसरणारे लाल केशरी रंग. ह्या टेंपररी घराच्या खिडक्यातून दूरवर राजाराम तलावाचे पाणीसुद्धा चमकताना दिसते. सध्या आई-पप्पा ताराबाई पार्कातल्या घरी आहेत. नाहीतर ते इथे आणि मी मुंबईत असेन तेव्हा माझ्या घरी येऊन जाऊन असतात.

ऑफ सीझनमध्ये मी इथे एकटा राहून स्वत:वर मेंटल, फिजिकल काम करण्याची आयडिया घोरपडेनी जेव्हा काढली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर मी मदत घेऊ शकतो अशी एकच व्यक्ती होती. जी मला इतर कोणाहीपेक्षा जास्त आतून बाहेरून ओळखते. हा खरं डोक्यावर पडल्यासारखा विचार होता! आम्ही कितीतरी वर्षात भेटलो नाही, बोललो नाही तरी मला नीट समजू शकेल अशी पलोमाच वाटते. तसं मला बाकी कोणाच्याच बरोबर वाटलं नाही. जेव्हा ती मला सोडून पळून गेली होती तेव्हा सुरवातीला अगदी मी मरतो का काय अशी माझ्या मनाची अवस्था होती. पण तेव्हाच मला रणजी टीममध्ये घेतलं होतं आणि त्याची हाडंतोड, जबरी प्रॅक्टिस सुरू झाली. रागात मी गेमवर फोकस केला आणि खरंच चांगला खेळलो. मग पहिल्या वर्षाचे काँट्रॅक्ट साईन झाले आणि मी मोकळ्या वेळात स्वत:ला क्लबिंग, पार्ट्या, दारू, मुली यात बुडवून बधीर ठेवले. ऑफ कोर्स, हे काही महान काम नाहीय पण मी त्या वेळच्या मानसिक गुंत्यातून ह्या गोष्टींमुळे तरून गेलो.

शेवटी या सगळ्यातून बाहेर येऊन जरा शरीरावर मेहनत घेतली आणि फायनल मध्ये शेवटचा बिग शॉट सिक्सर मारुन क्राउड फेवरीट झालो. तेव्हा जे फास्ट लाईफचं चक्र सुरू झालं ते आता दहा वर्षांनी थोडं मंदावलंय. वर्कआऊट, प्रॅक्टिस, मॅच, विन, सेलिब्रेट हे सुरूच होतं. एकही सेकंद रिकामा नव्हता. झोपायला पाठ टेकल्यावरसुद्धा डोक्यात मॅच रेकॉर्डसची गणितं सुरू असायची. नुसतं पळत रहा.

इतक्या वर्षात मी बऱ्यापैकी डेटिंग केलं. पण मी प्लेअर नाही, बऱ्यापैकी रिलेशनशिपवाला माणूस आहे. दोन चार सिरीयस गर्लफ्रेंडस झाल्या पण त्या वर्ष दोन वर्षाहून टिकल्या नाहीत. माझं बिझी शेड्यूल आणि सारखे प्रवास हे रिलेशनशिपसाठी कठीण असतातच पण मी अगदी खरं कारण मान्य करतो. बहुतेकश्या रिलेशनशिप संपल्या कारण मी प्रत्येकीची तुलना पलोमाशी करत होतो आणि कोणीच तिच्या हाईपला पुरून उरली नाही. मेबी माझ्या डोक्यानेच तिची अशी मोठी प्रतिमा बनवून ठेवली असेल, आम्ही एकत्र असतानाचा काळ कसला भारी होता असं उगीच वाढवून डोक्यात राहिलं असेल.

असो, योग्य वेळी कोणीतरी येईल आणि माझा टांगा पलटी होईल तेव्हा मला कळेलच! पण सध्या मला हे समजायला हवंय की हल्ली पीचवर जाऊन नेहमीप्रमाणे मजा येण्याऐवजी कुणीतरी लादून दिलेलं काम केल्यासारखे का वाटत आहे. प्रत्येक मॅचमध्ये मी मॅच संपायची वाट का बघतो आणि त्या शिटी कोचला बघावासा पण का वाटत नाही. मागचे काही महिने माझं लाईफ म्हणजे नरक झालाय.

सगळ्यांच्या न संपणाऱ्या अपेक्षा.

आता ह्या सगळ्याच अपेक्षांचं मला ओझं झालंय.

म्हणूनच जेव्हा पलो जॉब शोधत असल्याचं माझ्या कानावर आलं तेव्हा लगेच मी कोचबरोबर डिस्कस केलं. त्या माणसाला मी फक्त बैलासारखा झापड बांधून खेळत रहायला हवंय, स्पेशली मी एकदोन वेळा अर्ली रिटायरमेंटबद्दल बोललो तेव्हापासून. त्यासाठी तो काहीही करू शकतो, फक्त रिझल्ट मिळायला हवा. सो फायनली, मी मुंबईतून निघून हे सगळं जिथे सुरू झालं त्या ठिकाणी परत आलो.
कोल्हापूर!
माझं गाव, पलोमाचंही गाव.

अवघ्या पंधरा मिनिटात आम्ही ग्राऊंडवर पोचलो त्यामुळे गाडीत विशेष बोलणं झालं नाही. आम्हाला पार्किंगमध्येच वेंडी भेटला. वेंडीने ग्राउंडशेजारी एका मोठ्या हॉल मध्येच सगळं जिम इक्विपमेंट सेट करून घेतलं होतं. आधी ग्राऊंडवर जाऊन मोकळ्या हवेत रोजच्या ड्रिलला सुरुवात झाली. वॉर्म अप झाल्यावर काफ रेजेस, हॅमस्ट्रिंग किक्स, लंजेस, स्क्वॉट्स  आणि वेगवेगळे स्ट्रेचेस असं ओळीने वीस वीसचे सेट करून झाल्यावर आम्ही जिमकडे मोर्चा वळवला.

कार्डिओचा मला कधीच प्रॉब्लेम नव्हता. मी ओपनिंग बॅटसमन असल्यामुळे मला प्रचंड वर्कआऊट गरजेचा होता, त्याशिवाय तुम्ही इतके तास फिल्डवर टिकूच शकत नाही. त्यामुळे रोजचा कार्डिओ माझ्या हातचा मळ होता. वेण्डी माझ्याकडून रूटीन करून घेताना पलोमा निरीक्षण करत होती. तिचे लांब रेशमी केस आज उंच पोनीटेलमध्ये बांधले होते. ग्रे जिम लेगिंग्ज आणि निटेड पांढरा टॉप घातला होता. पायात लाल निळे गोंडे लावलेल्या कोल्हापुरी चपला होत्या. ती कोपऱ्यातल्या प्लास्टिक चेअरवर बसून मध्येच आयपॅडवर काहीतरी लिहीत होती. लूकींग सेक्सी ॲज हेल! मी जबरदस्तीने तिच्यावरून नजर हटवली. पुशअप साठी खाली बघताच तिच्या नितळ पावलांची बेबी पिंक नेलपेंट लावलेली नखं समोर आली. माझ्या कपाळावरून घाम ओघळत होता. पुढच्या बर्पीच्या वेळी पुन्हा वर पाहिलं तर ती माझ्याकडे लक्ष देऊन पहात होती. जणूकाही तिला माझ्या फोकस आणि वर्क एथिकबद्दल आश्चर्य वाटतंय.

मी या सगळ्या रूटीनमुळे उबलोय, डिप्रेस झालोय आणि कंटाळून स्वत:च्या शरीरावर मेहनत घेणे सोडून देईन असं काहीसं तिला वाटत असावं. हम्म.. आम्हाला अजून बरंच काही खणून काढायचं आहे. तेवढ्यात तिने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि तिचे घट्ट काकवीच्या रंगाचे डोळे माझ्यात अडकून राहिले. एव्हाना उगवतीची किरणं गोळा होऊन खिडकीतून सरळ तिच्या तोंडावर आली होती आणि तिचे डोळे त्या सोनेरी रंगात वितळत होते. च्यायला, हे डोळे म्हणजे गुऱ्हाळ आहेत गुऱ्हाळ. हॉट आणि तेवढेच गोड! यिऊन फिरून गंगावेश!! परत एकदा जुने दिवस आठवून काळजात कळ आली.

तिने पुन्हा काहीतरी टाईप केलं. मला काही फरक पडत नाही कारण हे माझं पब्लिक लाईफ आहे. मी टॉप ऑफ द गेम रहायला काय मेहनत करतो ते जगाला सांगायचा मला कधीच प्रॉब्लेम नव्हता.

बर्पीज संपल्यावर वेंडिने पुढे येत मला फिस्ट पंच दिला. "गुड जॉब ब्रो! आय स्वेअर, तुम्हारे जितना स्ट्रिक्ट वर्कआऊट हमारी आधी टीमने भी किया ना, तो नो वन कॅन बीट अस इन कमिंग ऑस्ट्रेलियन सिरीज."

हेच. कायम कुठेतरी पोहचायचे आहे. हा गोल, तो गोल. बीन देर, डन दॅट. स्टिल, इट वॉजंट इनफ.

नेव्हर वॉज.

वेंडीने पुढे केलेली बॉटल घेतली आणि दोन घोट पाणी पिऊन, खिडकीबाहेर डोकं काढून उरलेलं पाणी डोक्यावर ओतलं.

"बॅक टू स्क्वेअर वन येऊन मजा येतेय!" मी पलोकडे बघून डोळा मारत म्हणालो. 

"हम्म.. अपने हायफाय एसी जिमसे अलग.." वेंडी जरा तोंड पाडून नंतर हसला. वेंडी माझ्याबरोबर पाच वर्ष तरी होता. एकदम लॉयल माणूस. नशिबाने घोरपडेनी त्याला इथे पाठवायला परमिशन दिली. वेंडीला घोरपडे आणि त्याचं एकूण वागणं अजिबात आवडत नाही. ही गोष्ट आमच्यात अगदी कॉमन आहे. त्यामुळेच मी टीममध्ये असेपर्यंत तो आम्हाला सोडून जाणार नाही याची खात्री आहे.

"आपण एखाद्या चांगल्या जिमचा स्लॉट तुझ्यासाठी घेऊ शकतो. ते लोक तर वेडे होऊन देतील तुला." पलोमा म्हणाली. वेंडी हो म्हणणारच होता की मी लगेच त्याला थांबवत ओरडलोच. "प्लीज.. मला स्वतःचा तमाशा करून घ्यायचा नाही. ते नको म्हणूनच मी इथे आलो, लोकांच्या नजरेत न येता स्वतःवर काम करायला. प्रेसवाल्यांना जराशी खबर मिळाली तरी ते येऊन गोंधळ घालतील. हल्ली ते पॅप्सतर जागोजागी घुसतात, कोणीही उठून फोन वर करून सsssर सssर करत शूट करतो. मला माझ्या मुळांपर्यंत जायचंय, भले त्यासाठी उन्हात घाम गाळावा लागला तरी चालेल."

वेंडीने थोडं शरमून मान हलवली. मी त्याला हे सगळं आधीही सांगितलं होतं. पण पलोमा माझ्याकडे बघता बघता माझ्या मनाचा एकेक थर सोलून काढायच्या तयारीत दिसत होती.

गुड लक विथ दॅट!

माझ्यावर आता गेल्या दहा बारा वर्षांचे थर चढलेत. काय काय स्वच्छ करणार...

"राईट! आखीर वर्कआऊट तूमको करना है. लेट्स स्टिक टू द प्लॅन." वेंडीने माझ्या पाठीवर थाप मारली. मी टेबलावरच्या किल्ल्या उचलल्या. "निघूया?" मी तिच्याकडे पाहिलं. ती मान हलवून माझ्यामागे पार्किंगमध्ये आली.

रस्त्यात दोघेही शांत होतो. दहा मिनिटात घर आलंच. "आज सेशन इथे करणार आहोत?" गेट उघडून गाडी आत घेत असताना तिने विचारलं.

"आय नीड अ शॉवर! तुझ्या घरापेक्षा इथे आंघोळ केलेली बरी ना?" मी दार उघडुन उतरताना म्हणालो. तिचे डोळे मोठे झाले. "रिलॅक्स! दहा मिनिट लागतील. मग आपण सेशन सुरू करू." मी तिला घराचा दरवाजा उघडून दिला. ती आत शिरली, तिच्या मागोमाग आत जाताना तिची परफेक्टली मेंटेन्ड बांधेसूद फिगर आपोआप दिसलीच. मनोमन स्वतःला झापून मी आत गेलो. पलोमाला विसरणे टेस्ट मॅच खेळण्यापेक्षाही कठीण होते. जे मी कष्टाने मिळवले होते. आता मी धडा शिकलोय. पुन्हा हार्टब्रेकचा राऊंड टू व्हायला नकोय.

"वॉव! नाइस प्लेस! इंटिरिअर किती छान आहे.." ती आजूबाजूला बघत म्हणाली.

"हम्म, मी दोन महिन्यासाठी घेतलंय हे घर."

"काय? मला तीन महिन्यांसाठी दिलंय.." ती डोळे बारीक करून बघत होती.

मी फक्त मान डोलावली. मी घोरपडेना तिचं तीन महिन्यांचं कॉन्ट्रॅक्ट सांगितलं होतं कारण जर आमचं हे काम वर्कआऊट नाही झालं (जे बहुतेक होणार नाहीच) तर तिला नवीन जॉब मिळेपर्यंत सिक्युरिटी राहील. टीमला फुल टाईम सायकॉलॉजीस्ट नको आहे. मला माहिती आहे पण त्यांनी तिला हे नक्कीच सांगितलं नसेल. त्यांना मला फिक्स करणारं कोणीतरी हवं होतं, बस. तेवढं झालं की फिनिश.

घोरपडे फक्त त्याच्या कामापुरते बघतो. त्याला हवं ते मिळालं, त्याचा फायदा संपला की त्या व्यक्तीला तोडून टाकणार. असाच मला टीममधून काढायची मजा त्याला मिळू न देता आधीच मला बाहेर पडायचं आहे. "त्यांनी बहुतेक तुझा होकार मिळवायला एवढे पर्क्स ऑफर केले असतील. काही करून त्यांना हे डील करायचं होतं. पण मला ऑक्टोबर एंडला ट्रेनिंगसाठी जावं लागेल. बरोबर दोन महिने आहेत."

तिने मान हलवली. कदाचित तिने फुल टाईम जॉब मिळेल असं गणित केलं असणार. अगदी मिळाला तरीही तिला कोल्हापूर सोडावंच लागेल.

"मला आश्चर्यच वाटलं होतं रहायला बंगला आणि बाकी सगळे पर्क्स बघून. एनी वे, जाईला आवडलं घर आणि जुई पण मध्येच येते म्हणाली अभ्यासाला. जुई डेंटिस्ट होईल आता आणि जाईचं थिएटरमध्ये काहीतरी लुडबुड काम सुरू आहे. तुला भेटतील त्या अधेमधे."

मी मोकळेपणाने हसलो. ह्या फुलसुंदर मुली एकेकाळी माझ्या सगळ्यात आवडत्या व्यक्ती होत्या. मोठी कार्तिकी मग पलोमा आणि ह्या बारक्या जाई - जुई. अर्थात दोन नंबरची बहीण ह्या लिस्टमध्ये टॉप ला होती. पण ती कश्ती डूबून जमाना झाला. अर्थात मला अजूनही तिची आणि तिच्या फॅमिलीची काळजी आहेच. "आजीच्या शिस्तीतसुद्धा थिएटर? भारी मॅनेज करते जाई! दिदीची बेकरी काय म्हणतेय?

"आता कोणी कोणावर डोळा ठेवलाय?" तिची एक भुवई वर झाली आणि ती हातात आयपॅड घट्ट धरून खाली भल्यामोठ्या सोफ्यावर बसली.

"मी नाही ठेवला कधी म्हणालो? मी इथे येऊन कुणाला टाळत नव्हतो. मी काही कुणाला माझ्यापासून तोडलं नाही. ते तू करतेस, पलो.." वळून आंघोळीला जाण्यापूर्वी मी म्हणालो. तिचा रंग उडालेला चेहरा बघून छातीत कालवाकालव झालीच. तिने मला का दूर केलं ते मी ओळखून होतो. तेव्हाही आणि आत्ताही. पण तरी मी तिला चार गोष्टी ऐकवणारच होतो. ती माझी फक्त गर्लफ्रेंड नव्हती तर इतक्या वर्षांची बेस्ट फ्रेंड होती.

ती माझ्यापासुन लांब जाणं हे शरीराचा एखादा अवयव कापून टाकण्यासारखं होतं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle