नभ उतरू आलं - ४

शॉवर सुरू करून मी नेहमीचा ब्लॅक रिझर्व्ह बॉडी वॉश उचलला. त्यातला वेलचीचा सटल सुगंध मला नेहमी आईच्या किचनमध्ये उकळणाऱ्या चहापासून खपली गव्हाच्या गोड हुग्गीपर्यंत घेऊन जायचा. पण आज अंगावर त्याचा फेस होऊन पाण्यात विरून जाताना, तो वास जाणवलाही नाही. पलोमाची जखम खोलवर झाली होती आणि इतक्या वर्षांनी तिला जवळ बघून त्या भरलेल्या जखमेची खूण पुन्हा हळवी होत होती. मी थंडगार पाणी जोरात डोक्यावर आदळू दिलं आणि त्या टोचणाऱ्या थेंबांच्या माऱ्यात खालमानेने उभा राहिलो. डोळ्यासमोरून पलोमा बरोबर घालवलेले सगळे क्षण फेर धरून जात होते. ऑफकोर्स, मी वीक झालोय. सगळं काय चाललंय कळत नाही. माझं करियर कुठे जातंय समजत नाहीय. सगळं भविष्य टांगणीला लागलंय आणि भूतकाळ भुतासारखा डोक्यावर येऊन बसलाय. ज्याचा कधी त्रास होईल असं वाटलं नव्हतं, मला वाटत होतं मी ते सगळं मागे टाकून आलोय ते सगळं डाचतंय.

पलोमासुध्दा खूप कठीण काळातून गेली होती. आम्ही बारावीत असताना खूप वर्षांच्या आजारपणानंतर तिची आई वारली. त्यानंतर ती हळूहळू माझ्यापासून लांब जाऊ लागली. मी अभ्यास आणि क्रिकेटमध्ये बिझी होतो. फर्स्ट यर सुरू होतानाच माझं टीम सिलेक्शन झालं. त्याच काळात तिला दिल्ली युनिव्हर्सिटीत सायकॉलॉजीसाठी एडमिशन मिळाली. कुठलीतरी स्कॉलरशिप पण मिळाली होती ज्यातून शिक्षणाचा सगळा खर्च मिळत होता. ती दिल्लीला गेली आणि मला लाँग डिस्टन्स रिलेशनशिप शक्य नाही सांगून बाजूला केलं. आमच्यात जो काही प्रेमाचा बंध होता त्याने कितीही डिस्टन्स सहन केलं असतं. अंतराचा प्रश्नच नव्हता पण दुःख? ती वेगळी गोष्ट होती. आई गेल्यापासून तिचं गप्प होत जाणं, सगळ्यांपासून लांब जाणं मी अनुभवत होतो. ती त्या दुःखाला आउटलेट देत नव्हती आणि नंतर तर निघूनच गेली. मी बरेच महिने तिला बोलतं करायचा प्रयत्न केला पण ती मूव्ह ऑन झाली होती. शेवटी मी नाद सोडून दिला.

मी टॉवेलने डोकं पुसत बेडरूममध्ये आलो. शॉर्ट्स आणि एक टीशर्ट चढवला. फार काही केलं नाही कारण काही तासात पुन्हा वर्कआऊट करायचा होता. संध्याकाळी मी मोस्टली सोलो करतो. पळायला जातो नाहीतर आता आठवड्यातले काही दिवस तलावावर पोहायला जाता येईल. लहानपणापासून आम्ही दोघे कायमच जायचो, पुन्हा ते करून मजा येईल. दार उघडून बाहेर आलो आणि एकदम पोह्यांचा खमंग वास नाकात शिरला. पलोमा ओपन किचनमधल्या गॅसजवळ उभी राहून ढवळत होती. परत जुन्या आठवणी वर आल्या. आई आजारी असल्यामुळे ती आणि दीदी कायमच काही ना काही स्वयंपाक करत असायच्या. रोजच्या प्रॅक्टीसने दोघीही चांगल्याच सुगरण झाल्या होत्या.

"काय चाललंय?" मी तिच्याकडे जात म्हणालो.

"कांदेपोहे. मला बाकी काही सापडलं नाही." ती माझ्याकडे मान वळवून हसली. "पोटात कावळे कोकलायलेत ना? इतका वर्कआऊट इज नो जोक! तोपण दिवसातून दोन वेळा!"

मी भल्यामोठ्या डायनिंग टेबलाची खुर्ची ओढून बसलो. "माझ्या डाएट फूडचे डबे रोज बाहेरून येतात. त्यामुळे घरात फार काही सामान नाही."

"ओह! मग पोहे चालतील ना तुला?"

"पळतील! तसंही मध्येच चीट करून चालतंय की. आण इकडं." तिच्या हातातली प्लेट घेऊन मी टेबलावर ठेवली. त्या वासानेच भूक खवळली होती. तिच्या प्लेटमध्ये माझ्या अर्ध्याहून कमी पोहे होते. "एवढेच? घे अजून.." मी डाव कढईत घालणार तोच तिने हात धरून थांबवलं. "मी एवढाच पोर्शन खाते. माझा पण डाएट आहे!" आणि आम्ही दोघेही खळखळून हसलो.

"संध्याकाळी वर्कआऊट म्हणजे मी फक्त रनिंग करतो. तेही घरात, ट्रेडमिलवर. पण इथं आता इतकी मस्त हवा आहे तर बाहेर पळायचा विचार आहे. पाच सहा किमी तरी बाहेर पळायला पाहिजे. हे, तू अजून पळतेस का? एकत्र पळायला जाऊ. म्हणजे मला धापा टाकताना बघून तुला जास्त इझीली सायको - ॲनालाईज करायला येईल!" मी पोहे भरलेला चमचा तोंडात खुपसत म्हणालो.

ती ओठ दाबून हसली. "तुला कोणी सायको - ॲनालाईज करत नाहीये, समर. पण, हो. मी अजूनही रनिंग करते आणि तुला कंपनी द्यायला आवडेल. माझ्या स्पीडशी मॅच करू शकलास तss र!"

मी मान हलवली. आमच्यात कायम कॉम्पिटिशन असायची. ती माझ्याहून हाईटने थोडी कमी असली तरी एकदम बॅडॲस रनर होती. कायमच. "कूल! आता मला सांग, मला फिक्स करायचा तुझा काय प्लॅन आहे. माझ्या मते तू तुझ्या कामात परफेक्ट असणार कारण तू कुठलीही गोष्ट जीव ओतून करतेस."

"टेकस् वन टू नो वन!" तिने अजून एक घास घेतला. "ऐक, तुला 'फिक्स' करायची गरज नाहीय. मी त्यासाठी इथे आले नाहीये. तू तुझ्या पूर्ण पोटेन्शियलपर्यंत पोचावं म्हणून तुला मदत करायला आले आहे. जे तू याआधी खूपदा पोचला होतास. घोरपडे म्हणतात तू सध्या जरा स्लंपमध्ये गेला आहेस. आणि आम्ही प्रयत्न करून तुला पुन्हा बरोबर मार्ग दाखवणार आहोत."

"स्लंप? असं नाव ठरवलं का याला?" मी जरा रागात म्हणालो.

"असं घोरपडे म्हणतात. मी अजून म्हटलं नाहीये." तिने पाण्याचा ग्लास तोंडाला लावला.

"तुला काय वाटतं? काय होतंय मला?" तोंडात बकाणा भरलेले खूप दिवसातले चविष्ट पोहे संपवत मी विचारलं.

"ओके. लेट्स रिव्ह्यू! तू मागच्या सीझनमध्ये चार सेंच्युरीज केल्या. टीम सेमी फायनलपर्यंत गेली. पण बऱ्याच मॅचेसमध्ये तू पन्नासच्या आत आउट झालास. न्युझीलंड दौऱ्यात तुम्ही दोन मॅच जिंकलात पण सीरीज हरलात. तेव्हाही तुझी कामगिरी फार चमकदार नव्हती. आपण जुने स्टॅट्स बघितले तर दर सीझनमध्ये तुझा गेम इम्प्रूव्ह होत गेलेला दिसतो. मागचा सिझन सोडता. कोचच्या मते तुझा गेम थोडा ऑफ झालाय पण सुधारू शकतो. पण मला हा काही स्लंप वगैरे वाटत नाही." तिने काळजीपूर्वक उत्तर दिले.

मला थोडं हसू आलं. ऑफ कोर्स, तिने होमवर्क केलाय. "मग तुझा डायग्नॉसीस काय आहे?"

"ते जे म्हणतायत की तुझा गेम थोडा ऑफ आहे त्यावर सगळं डिपेंड आहे."

"हम्म... मी मागच्या सीझनमध्ये पारच माती खाल्ली. घोरपडेना हे बघायची सवय नाही. पण मला त्याची शिट्टी उडालेली बघून लय बरं वाटलं! तो माणूस पक्का वायझेड आहे. त्याच्यासाठी खेळायचे असेल तर मी न खेळणं पसंत करेन."

"सो, कोचला शिक्षा म्हणून तू मुद्दाम वाईट खेळलास?"

"नाही, नाही. असं काही मी करणारच नाही. फक्त त्याची होपलेस रिॲक्शन बघून मला मजा आली."

"तू इंज्युअर्ड होतास?" तिने चमचा प्लेटमध्ये ठेवला.

"हा तर! इंज्युअर्ड मी कायमच असतो. माझ्या हातात रॉड आहे, पाठीची एक सर्जरी झालीय, बाकी बारीकसारीक जखमा होतच असतात. दरवेळी वेगळ्या कुठेतरी. पण ह्यातलं काहीच मला फिजिकली थांबवू शकलं नाही. सो, तुम्हाला काय वाटतं डॉ. फुलसुंदर?" मी भुवई उंचावून किंचित हसलो.

"मला तरी थोडा डोक्याचा प्रॉब्लेम वाटतोय!"

मी डोळे फिरवले. पण तिचं बरोबर आहे. प्रॉब्लेम माझ्या डोक्यातच आहे, पण तो फिक्स होण्यातला वाटत नाही.

पलोमा

समरच्या मते मागच्या काही मॅचेसमधला त्याचा परफॉर्मन्स इतका विचार करण्यासारखा नाही. पण त्याची टीम आयपीएल जिंकेल असा होरा असताना ते हरले आणि पराभवाची सगळी जबाबदारी कॅप्टन म्हणून त्याच्यावरच आली. असं का झालं तेच शोधायला मी आले आहे. त्या सगळ्या मॅचेस मी खूपदा रिवाइंड करून करून बघितल्या. त्याच्या गेममध्ये खरंच नेहमीचा स्पार्क नव्हता. ते त्याच्या दुखावलेल्या डोळ्यात दिसत होतं. फील्डवरच्या त्याच्या चालण्यात दिसत होतं.

"मला सांग, त्या मॅचेस खेळताना तुझ्या डोक्यात काय विचार होते?"

त्याने पोहे संपवून चमचा प्लेटमध्ये ठेवला आणि हाताची घडी घालून खुर्चीत मागे टेकला. हिला कितपत सांगू शकतो असा विचार करत तो माझं निरीक्षण करत होता.

"आम्ही खूप मॅचेस खेळतो, पलो. प्रत्येकवेळी फॉर्म नाही टिकू शकत."

"हेंनतेन करू नको. इतक्या वर्षात तू जेवढ्या मॅच खेळलास त्यात तुझा फॉर्म एकदम चांगला ठेवला होतास की."

"खरं? की लोकांच्या अपेक्षा बदलल्या?" तो हाताची घडी तशीच ठेऊन म्हणाला.

"म्हणजे?" मी पुन्हा पाणी प्यायले.

"म्हणजे मी आधीपण वाईट खेळलोय, आधीही कधीतरी माझा फॉर्म खराब झालाय पण तेव्हाच काय अगदी आता-आता पर्यंत या गोष्टी माफ केल्या जायच्या. मी करिअरमध्ये जितका पुढे जातो तेवढ्या अपेक्षा अजून वाढतात. खरं सांगतो, मला ते मान्य आहे. माझ्यावर प्रचंड पैसा लावला जातो मी त्या खेळावर प्रेम करावं, खेळत रहावं म्हणून."

"आता खेळावर प्रेम उरलं नाही का?" मी विचारलं. मी लहानपणापासून त्याला खेळताना बघत होते. कॉलेजमध्ये गेल्यावर तो नुसत्या बेस्ट फ्रेंडवरून माझा बॉयफ्रेंड कधी झाला ते कळलंही नाही. तेव्हा मी त्याच्या प्रत्येक मॅचला हजर असायचे. त्याला सोडून दिल्लीला गेले आणि त्याचं सिलेक्शन झालं. त्यानंतर त्याला फिल्डवर खेळताना, चमकताना बघून मी थोडी जेलससुद्धा व्हायचे. त्याचं खेळावर किती प्रेम आहे हे कोणीच मिस करू शकायचं नाही. ही वॉज टोटली डिवोटेड टू द गेम.

"आय डोन्ट नो, पलो." त्याने श्वास सोडून चेहऱ्यावरून हात फिरवला. "माझी सुरुवात झाली तेव्हाच मला मॅन ऑफ द सीरिज मिळाला होता. तीन सेंच्युरी मारल्या होत्या मी. लोक हुकले होते एकदम. या वर्षी मी चार मारल्या, पण त्या पुरेश्या नाहीत. टीममध्ये अर्ध्यापेक्षा जास्त नवे लोक आहेत कारण जसा कुणाचा फॉर्म कमी होईल कोच त्याला टीममधून काढून टाकतो, जरी ते त्याच्यासाठी वर्षानुवर्ष चांगले खेळत आलेत. आत्ताच्या टीममध्ये मी सगळ्यात सिनियर आहे, वय एकतीस वर्ष! पण तरीही हे इनफ नाहीये. तुम्ही रन काढताना समोरचा पुरेसा पळाला नाही, तर तुम्ही आउट. सिक्स जाण्यासारखा बॉल टोलवला आणि कोणीतरी कॅच घेतला, आउट. हे आधीही व्हायचं पण आता तेवढी ग्रेस मिळत नाही. मीनिंग आयाम इन अ स्लंप." त्याने दोन्ही हात टेबलावर आपटले.

त्याच्या शब्दांनी माझ्या छातीत कुठेतरी दुखलं. रोजच्या रोज तो किती दडपणाखाली असतो या विचाराने. प्रोफेशनल ॲथलिट म्हटल्यावर हे होणारच. हायेस्ट पेड क्रिकेटर म्हणजे तर अजूनच जास्त प्रेशर. पण त्याचा अर्थ असा नाही की त्याचा तुम्हाला कधी त्रास होणार नाही.

"तू स्लंपमध्ये आहेस असं तुला नाही वाटत?" मी टेबलावर ठेवलेल्या त्याच्या हाताजवळ हात नेऊन करंगळीने हलकेच स्पर्श केला.

"म्हाइत नाई. मी जाम थकलोय, पलो. कोचची अपेक्षा होती मी टीम फायनलला तरी सहज घेऊन जाईन. पण आमच्याकडे अनुभवी प्लेअर्स नव्हते. सगळे महत्त्वाचे लोक काढून नवे भरून ठेवले. त्यांच्यात तितकं को-ऑर्डीनेशनच झालं नव्हतं. मी जे काय करू शकतो ते सगळं केलं. मेबी माझं वय वाढतय, आता पूर्वीचा मी राहिलो नाही. आय फ** डोन्ट नो!" त्याने त्याच्या केसांमधून हात फिरवला आणि तेवढ्यात जोरात वाजलेल्या डोअर बेलने दोघेही दचकलो.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle