नभ उतरू आलं - ५

समर उठून दरवाजा उघडायला गेला आणि लगेच ओळखीचे चित्कार माझ्या कानावर आले. उठून पुढे जाऊन पाहिलं तर माझी लहान बहीण समरला मिठी मारुन समरभैयाss म्हणून ओरडत होती. मला माहित होतं, ही काय घरी थांबून वाट बघण्यातली नाही. आमची जाई म्हणजे अगदी बडबडी, वांड कॅटेगरी आणि तिच्या उलट जुई! गोड, शांत, जेवढ्यास तेवढी बोलणार आणि बाकी वेळ पुस्तकात डोकं खुपसून बसणार.

"मी तुला सांगितलं होतं ना, रविवारी तुम्हाला भेटायला त्याला घरी घेऊन येते म्हणून.." ती त्याला सोडून माझ्याजवळ आल्यावर मी रागाने खुसफुसत म्हणाले. समर कायम माझ्या फॅमिलीशी क्लोज होता. आम्ही कायम एकमेकांच्या घरी पडीक असायचो. आम्ही एकत्र असताना जाईजुई जेमतेम पाचवीत वगैरे होत्या, त्यांना खेळायला जाम हवा असायचा समरभैया! तोही त्यांचे वाटेल ते लाड, म्हणजे उन्हाळ्यात रोज बाहेर घंटी वाजली की उन्हातून पळत जाऊन फेमिलावाल्याकडून कुल्फी आणणे, त्यांना भवानी मंडपात, रंकाळ्यावर फिरायला नेणे, मधेच राजाभाऊची भेळ आणून देणे वगैरे करायचा. आई शेवटच्या महिन्यांत कॅन्सरशी लढत असताना तो सतत माझ्याबरोबर होता. माझा एकमेव सपोर्ट होता. लहानपणापासून सगळ्या बहिणीत मी आईला जास्त चिकटलेली असायचे. बाकी सगळ्यांची नावं पप्पांनी ठेवली, फक्त माझं एकटीचं नाव आईने ठेवलं होतं. तिने कुठेतरी वाचलं होतं पलोमा म्हणजे कबुतर- शांतीचं प्रतीक. मी दुसरी मुलगी झाले म्हणून आजीनी इतकी कचकच केली, त्रास दिला त्याला उत्तर म्हणून. आईचं बाकी बहिणींपेक्षा माझ्याशी वेगळंच, जास्त क्लोज नातं होतं. कदाचित मलाही तिच्यासारखी खेळांची आवड असल्यामुळे असेल. पण आईची कॅन्सरशी लढाई अचानक संपली आणि मी कोसळून गेले. मला वाटतं, माझा एक हिस्सा तिच्याबरोबर मरूनच गेला. नंतर मी कधीच पहिल्यासारखी नव्हते आणि समर त्यात काही करू शकत नव्हता.

"आणि मी तुला म्हणले होते की मी वाट बघणार नाही. तायडे, ज्यास्त नाटकं नको. आता पटपट त्याच्याशी कॉम्प्रो करून टाक." जाई बिनधास्त मोठ्याने म्हणाली. "आम्ही लै मिस केलं तुला, बॅटमॅन!"

समर डोकं मागे टाकून जोराने हसला. जाईजुईने दिलेलं हे निकनेम त्याला तेव्हाही आवडायचं. "सध्या बॅटमॅनचं डोकं सरकलंय आणि एक मोठ्या स्पोर्ट्स सायकॉलॉजीस्ट ते ठीक करायला आल्यात." तो म्हणाला.

जाई जाऊन माझ्या खुर्चीत बसली आणि चमचाभर पोहे तोंडात टाकले. "ज ह ब ह री! तायडे आता रोज जेवायला तुझ्याकडेच येत जाते."

"का? तिथे घरी किचन आहे ते वापरा आणि बनवायला शिका काहीतरी. नुसतं खायचं माहितीये. आज तुमची काय रिहर्सल नाही का?" मी मान हलवली आणि तिच्या शेजारची खुर्ची ओढून बसले.

"च्यक, आज सुट्टी आहे. मी दोन चार कामं करायला बाहेर पडले आणि म्हटलं तुझ्याकडे फेरी मारावी. तिथे गेले तर कुलूप, मग म्हटलं तू इथेच असणार. म्हणून इकडे आले आणि बाहेरच्या पांढऱ्या स्कॉर्पिओवरून लगेच ओळखलं. भैया, माझा विश्वासच बसत नाहीये, तू येवढे पैसे कमावतो तरी अजून ही काकांची जुनी गाडी वापरतोय?" तिने हसत समोरच्या छोट्या बाटलीतून थोडं मीठ पोह्यांवर शिंपडलं आणि परत बकाणा भरला. अनबिलीव्हेबल!!

"माझं प्रेम आहे त्या गाडीवर आणि गाडीतल्या बऱ्याच लाडक्या, लक्षात राहिलेल्या आठवणी आहेत!" त्याने माझ्याकडे बघून किंचीत डोळा मारला आणि माझे गाल गरम झाले.

"थोडी अंधश्रद्धा म्हण, पण माझ्यासाठी ती गाडी लकी आहे. मी त्याच गाडीतून मीटिंगला गेलो, माझं पहिलं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं. मुंबईत माझ्याकडे दोन चार महागड्या स्पोर्ट्स कार पार्क करून ठेवलेल्या आहेत. पण ही स्कॉर्पिओ कायम माझी नंबर वन आहे."

मी हर्ट करूनही समर माझ्याशी ज्या हळुवारपणे वागत होता त्याने मला खरंच आश्चर्य वाटलं. त्याने मला जराही त्रास होऊ दिला नव्हता. पैसा किंवा प्रसिद्धीने तो थोडासासुद्धा बदलला नव्हता. आत्ता कोणी म्हणलं की तो क्रिकेट खेळत नसून कोपऱ्यावर वडे विकतो तरी मी विश्वास ठेवला असता. तो जसाच्या तसा, खूप ग्राऊंडेड माणूस आहे, लहानपणीसारखाच. ह्या माणसाला फॅन्स जरी GOAT म्हणत असले तरीही तो जुनाच डाऊन टू अर्थ मुलगा असणं ही फार मोठी गोष्ट आहे.

"अच्छा, ही गोष्ट मला आवडली, पण तरी मला त्या फरारीत बसून एका बुंगाट ड्राइव्हवर जायला जास्त आवडेल!" जाई खाताखाता म्हणाली. "बाकी मी तुला पहिली भेटले कळल्यावर आता घरी सगळे येडे होणार!" तिने समरकडे मोर्चा वळवला.

"असं काय! कसे आहेत सगळे? गेल्यावर्षी दीदी आणि अजयच्या लग्नाला मला येता आलं नाही. मी फिल्डवर माती खाण्यात बिझी होतो! " त्याने श्वास सोडला.

"हम्म. त्यांची गाडी तर पुढच्या स्टेशनात पण पोचली!" जाई तोंडावर हात घेऊन हसत हसत उद्गारली.

समरने प्रश्नार्थक चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं. 

"दीदी प्रेग्नंट आहे. पाच महिने झाले." मी हसून सांगितलं.

"एक नंबर!!" तो ओरडला. "तू मला शंभर रुपये देणं लागतेस, बेट आठवली? मी दहा वर्षांपूर्वीच सांगितलं होतं हे सगळं!"

"आणि मी पण!" जाई त्याला हाय फाईव्ह देत म्हणाली. त्याच्या चेहऱ्यावर मोठ्ठं हसू होतं.

"ओके ss" जाई आळस देत उभी राहिली. "तर मी निघते मुलांनो. मला कामं आहेत आणि आज संध्याकाळसाठी ड्रेस शोधायचा आहे. मी एका मुलाबरोबर डिनरला चाललेय." ती दात दाखवत म्हणाली.

"कोण तो तुझ्या वर्गातला शेमडा अवी काय?" मी तिची नेहमीची नाटकं ओळखून होते.

"तोच! आता शेमडा नाही ऱ्हायला तो. पण तरी त्याने बोर केलं तर तुम्ही बार्बेक्यू नेशनमधून मला घ्यायला या. कावळा नाक्यात, माहिताय ना? बाss य"

आम्ही दोघेही हसायला लागलो. "तिथल्या मालकाशी माझी चांगली ओळख आहे, डोन्ट वरी!" म्हणत समरने हात हलवला.

मी तिच्या मागोमाग दाराकडे गेले. "ड्रेस कुठे, केतीच्या बुटिकमधनं घेणारेस काय?"

"काहीपण काय? मी सध्या बॅकस्टेजला फुकट काम करणारी नाट्यकर्मी आहे! मी तुझं कपाट उघडायला चाल्लेय, शिरीमंत मुली!!"

तिची ॲक्टिंग बघून मी फुटलेच. एक लांब सुस्कारा सोडून मी किल्ली तिच्या हातात ठेवली. "जाताना वॉचमनकडे दे. आणि कुठला ड्रेस घेतला ते मला मेसेज करss"

जाईने पाठ फिरवून चालताचालता स्टायलीत हात वर केला आणि गेटबाहेर पडली.

दार लावून मी पुन्हा टेबलपाशी येऊन बसले. "डॅम! तुझ्या फॅमिलीला मी किती मिस करत होतो ते कळलंच नाही!" तो माझ्याकडे बघून म्हणाला. माझा एकदम घसा दाटून आला. तो कितीतरी वर्ष आमच्या फॅमिलीचा हिस्सा असल्यासारखा होता. लहानपणी कायमच आमच्यात असायचा. तो एकटा असल्यामुळे बहुतेक आमच्या घरचा आवाज, मस्ती, गडबडगुंडा त्याला आवडायचा.

"हो, त्यांना सगळ्यांना खूप उत्सुकता आहे तुला भेटायची. काका-काकी कसे आहेत? ते आता इकडे फार कमी असतात ना?"

"निवांss त! सध्या इथेच आहेत. मी मुंबईत असेन तेव्हा ते तिकडे येतील. आई माहितीये ना, तिच्या बाळाला सोडून ती राहू नाही शकत." तो मिश्कीलपणे म्हणाला तरी ते खरं होतं. सगळ्या सावंत फॅमिलीचं त्याच्यावर फारच प्रेम होतं. त्यांचं मस्त छोटंसं कुटुंब होतं. लहानपणी तर त्याचे पप्पा आर्मीत असल्यामुळे बदली होत होत वेगवेगळ्या ठिकाणी असायचे. तेव्हा आई आणि तो दोघेच. त्याला जसं आमच्या घरी आवडायचं तसच मला त्याचं घर आवडायचं. व्यवस्थित आवरून ठेवलेला मोठा फ्लॅट. तिथली सजावट, तिथली शांतता. हे आमच्या घराच्या सतत कचकच आणि पसाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जास्तच उठून दिसायचं. त्याची आई माझ्या आवडीचे पदार्थ करून, जेवायला बोलावून माझे खूप लाड करायची. त्यांना मुलीची आवड होती पण झाला मुलगा म्हणून किंवा माझी आई आजारी होती म्हणून...

त्यांच्याकडे जेवताना कश्या मस्त गप्पा व्हायच्या, नाहीतर आमच्याकडे सगळ्यांची एकदम बडबड, आजीची आरडाओरड, टोमणे, जाम वैताग! आम्ही एकमेकांकडे इतका वेळ घालवला होता! इतक्या वर्षात मी काका काकीनासुद्धा भेटले नाही ह्या विचाराने अचानक मला वाईट वाटलं. गेल्या काही वर्षात इथे आल्यावरसुद्धा मी त्यांना टाळत होते, समरच्या उल्लेखाने मला त्रास होईल म्हणून. मी खूप मतलबी वागले याचं जास्त वाईट वाटलं.

"मी कॉलेजमधल्या तुझ्या सगळ्या मॅचेस काका काकींबरोबर बसून बघितल्या आहेत. तू नॅशनल टीममध्ये खेळताना बघून त्यांना कसलं भारी वाटलं असेल ना? किती कमी जणांना प्रोफेशनली खेळायची संधी मिळते, तुला मिळाली आणि त्या संधीचं तू चीज करून दाखवलस."

त्याने एक सुस्कारा सोडला. "माझी खूप इच्छा होती की तू मला प्रो मॅच खेळताना बघावं. कदाचित एखादी मॅच टीव्हीवर बघितली असशील."

"ॲक्च्युली, दोन सीझनपूर्वी फिरोजशाला तुमच्या दोन मॅचेस झाल्या होत्या. तेव्हा मी तिकीट काढून बघायला आले होते." मी त्याच्याकडे न बघता कबूल केलं.

त्याने अंगठा आणि तर्जनीने माझी हनुवटी धरून माझा चेहरा उचलला आणि समोर बघायला लावलं.

"खरंच?"

त्याला इतक्या जवळ बघून माझा श्वास घश्यात अडकला. मी मान हलवली. "त्यात एवढं शॉकिंग काय आहे? मला तुला खेळताना बघायचं होतं."

"कोणाबरोबर आली होतीस? बॉयफ्रेंड?" तो मिश्कीलपणे म्हणाला. पण त्याचे टेन्स झालेले खांदे माझ्या नजरेतून सुटले नाहीत.

"नाही. मी दोन मॅच बघितल्या आणि दोन्हीवेळा एकटी आले होते." मी खांदे उडवत म्हणाले. ते खरंच होतं. मी पिचला डेड स्ट्रेट असणाऱ्या बॉलरची पाठ दिसेल अश्या स्टँडचे, पुढच्या रांगेतले महागडे तिकीट काढले होते. मी ज्याच्याबरोबर मोठी झाले त्या मुलाला सगळ्यात मोठ्या मॅचमध्ये, नॅशनल टीममध्ये चमकताना मला पहायचं होतं. मी एखाद्या मित्र मैत्रिणीला सोबतीला नेऊ शकले असते पण तिथे मी कशी अफेक्ट होईन ते मला कोणाला दिसू द्यायचे नव्हते. स्पेशली द वे समर अफेक्टेड मी...

त्याने हात काढून घेतला आणि हसला. "मला सांगायचं ना, मी तुला VIP बॉक्समधली चांगली सीट दिली असती."

"तो इश्यूच नव्हता. मला फक्त तुला चमकताना पहायचं होतं." माझे डोळे भरून आले आणि मी दुसरीकडे बघितलं. अचानक घसा दुखायला लागला.

"मला खेळताना तू स्टँडस् मध्ये दिसलीस की खूप मस्त वाटायचं." तो हसऱ्या आवाजात म्हणाला.

"एक आयडिया आहे." मी प्लेट्स उचलून सिंककडे निघाले. तो माझ्याशेजारी येऊन थांबला. "एक मिनिट, तू पोहे केलेस आता मी प्लेट्स घासून टाकतो. इथे घासायला भांडीच नसतात त्यामुळे मेड वगैरे कोणी नाहीये."

"ओके." मी बाजूला सरकून त्याला जागा दिली.

"हम्म, कसली आयडिया?"

"हे सगळं जिथून सुरू झालं, फुटबॉल खेळता खेळता तू क्रिकेटकडे वळलास ते शाहू स्टेडियम आणि मग शिवाजी स्टेडियम! आपण जायचं का तिथे?" तिथेच वेगवेगळे कोच सिलेक्शनसाठी येत. आम्ही उन्हातान्हात मॅच बघत बसायचो. त्याला खेळताना बघून इतका आनंद व्हायचा की त्या उन्हाची काहीच फिकीर वाटायची नाही.

"पलो, आर यू शुअर अबाऊट अ ट्रीप डाऊन मेमरी लेन?" प्लेटला साबण लावता लावता वाकून तो माझ्या कानात कुजबुजला. मी थरथरले.

"ओके, हे झालं की आपण निघूया. मला वाटतं हा तुझा प्लॅन आहे. मला पुन्हा क्रिकेटकडे वळवायचा." तो प्लेट नळाखाली धरून विसळत म्हणाला.

मी हसले.
पण प्लॅन फक्त तेवढाच नव्हता.
मी आयुष्यभर ज्याच्यावर प्रेम केलं त्या मुलाबरोबर घालवलेले काही खास क्षण मला पुन्हा जगायचे होते.

जर त्यामुळे त्याची खेळासाठी पॅशन पुन्हा जागृत झाली तर दुधात साखर! पण आत्ता तो मुख्य प्लॅन नव्हता.

असं वाटतंय की आम्हा दोघांनाही डोकं परत खेळाकडे वळवायची गरज आहे.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle