नभ उतरू आलं - ६

समर

पावसाळा अजून संपला नसल्याने नऊ वाजताच्या सुमारास तसं कवळंच ऊन होते. गाडी पार्क करून आम्ही शाहू स्टेडियममध्ये गेलो. मैदानात पातळ चिखलाचा थर आणि कडेकडेने खेळल्या न जाणाऱ्या भागात हिरव्यागार गवताचे पुंजके उगवले होते. इथनंच तर सगळं सुरू झालं होतं. लिटरली!

मी तिसरीत असताना माझ्या मस्ती आणि वांडपणाला कट्टाळून पप्पा इथे पाटील सरांचा क्लास बघायला मला घेऊन आले होते. "पलो, तुला माहिती आहे, तुझ्यामुळं मी पाटील सरांकडे खेळायला लागलो."

"खरं? कस काय?" तिने शेजारी चालताना आश्चर्याने माझ्याकडे बघितले.

आम्ही वर चढून एका पायरीवर बसलो. मी हात मागे टेकून ती स्वच्छ हवा नाकात भरून घेतली.
आताही समोर काही लहान मुलं फुटबॉल खेळत होती. "पप्पा क्लासची चौकशी करायला मला घिऊन आले होते. बाकी सगळ्या पोरांच्यात दोन चारच पोरी होत्या आणि त्यातही तूच एकदम फास्ट बॉल पास करत होतीस आणि तोंडाने त्यांना ओरडत पण होतीस. एवढी क्यूट बारकीशी मुलगी एवढ्या जोरात खेळताना बघून आम्ही बघतच राहिलो."

"अरे!! आठवलं मला, तेव्हा मलाही मस्ती करते, अंगातली रग जरा जिरावी म्हणूनच क्लासला पाठवत होते." ती समोर पहात हसली.

आणि मी पप्पांना म्हणालो, "ती पोरगी काय भारी आहे ना? भावलीच एकदम आणि कसली भारी खेळते!"

"काका काय म्हणाले असतील ते इमॅजिन करू शकते मी!" ती खळखळून हसली.

"तर काय! मला म्हणाले गप खेळायचं, नाहीतर कानाखाली जाळ काढीन! नशीब फक्त म्हणाले! पण तेव्हापासून ते स्वतःच तुझे फॅन झाले. त्यांच्यालेखी तू कधीच काही चुकीचं करणार नाही. गुणी पोरगी वगैरे." मी हसत तिच्याकडे पाहिलं तर तिचे डोळे पुन्हा पाण्याने भरत होते. अरे यार, आम्ही काहीही बोलायला लागलो तर ह्या सगळ्या आठवणीच बाहेर पडतात. मी कित्येक वर्ष बोचक्यात बांधून मागे टाकून दिलेल्या... मला कोल्हापुरात येऊन चार दिवसही झाले नाहीत आणि इथे आम्ही भूतकाळ खोल खणायला लागलोय.

"मी तुला सोडून गेल्यावर नक्कीच त्यांचं मत बदललं असेल." तिच्या तोंडून आवाज जेमतेम फुटत होता.

मी तिच्याकडे सरकून खांद्यावर हात ठेवला. "त्यासाठी तुला कोणी ब्लेम नाही केलं. मीसुद्धा नाही. तू ज्या प्रकारे काही न सांगता निघून गेलीस, ते मला काही कळलं नाही. पण मी तुला ओळखतो. आई गेल्यावर तुझी झालेली हालत मी बघितली आहे. आय नो, दुःख ही सगळ्यात वाय झेड इमोशन आहे. जितका विचार कराल तितकी तुम्हाला अजून खोल गाळात ओढत नेते. तेव्हा मलाच इतकं वाईट वाटत होतं, तर तुझी अवस्था काय असेल ते जाणवत होतं. तुला शक्य तेवढं तू चांगलंच हॅण्डल केलं, तरीही तू मला मदत करू द्यायला हवी होती. पण आता बघ स्वतः कडे!" मी तिचा खांदा घट्ट धरला आणि ती पटकन उठून उभी राहिली.

"आपण काय बोलतोय हे? हे सगळं माझ्यासाठी नाहीये. आपण ट्रॅक सोडून खूप भरकटतोय." ती अजूनही ते दुःख कवटाळून बसलीय हे तर क्लिअर आहे. त्याबद्दल बोलताच तिच्या वागण्याला धार आली होती.

"आपण माझ्या सुरुवातीबद्दल बोलत होतो, ज्यात तुझा उल्लेख येणारच आहे!"

"हम्म, राईट... सॉरी. मग पुढे?" ती थोडं अंतर ठेवून खाली बसली.

"मग काय, क्लासला घाला म्हणलं पप्पांना. मग आपण दोन तीन वर्ष एकत्र खेळत होतो. पाचवीचा माझा रिझल्ट असला भारी की मला प्रमोट केलेलं होतं ! पप्पा तडक सुट्टी घेऊन आले आणि मला समोर बसवून भरपूर प्रश्न विचारले. मला पुढे खूप शिकण्यात किंवा नोकरी बिकरी करण्यात इंटरेस्ट नाही हे त्यांना जाणवलं.  मग माझी अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट केली, त्यात मला स्पोर्ट्स आवडतात असंच आलं. मग पप्पांनी मला फुटबॉलमध्ये कसं फ्यूचर नाही, क्रिकेटमध्ये चांगलं करिअर करता येईल वगैरे सांगून माझं मन वळवलं आणि मी क्रिकेट अकॅडमी जॉईन केली. तरी मी तुझ्या मागे होतोच! मग शेवटी नववीत मॅथ्सच्या ट्यूशनमध्ये तुझ्या वहीत एक चिठ्ठी पाठवली. आठवतंय?"

तिच्या चेहऱ्यावर मोठ्ठं हसू पसरलं. "मला तर वेगळं आठवतंय!"

"तुला काय आठवतंय? सांग."

"एक दोन वर्षात आपण अगदी घट्ट फ्रेंड्स झालो होतो. घरी जाणं येणं, ट्यूशनमध्ये वगैरे भेटायचो शाळा वेगळ्या असल्या तरी. तू नाही म्हटल्यावर मी पण फुटबॉल सोडून दिला. मला तर त्यात काहीच स्कोप नव्हता. ती चिठ्ठी पण तुझ्या त्या बंट्याने वहीतून आणून दिली होती आणि वर म्हणे, काय रिस्पॉन्स देणार काय?" ती खो खो हसत सुटली.

"कसला येडच्याप होतो मी!" मी हसता हसता म्हणालो.

"आताच्या एकदम विरुद्ध. आता काय बाबा, तू तर त्या 'कसम से ' वाल्या कश्मीरा बर्वेला डेट करतोस! हो ना?"

"झालं? जरा चांगल्या काही आठवणी निघाल्या की तू स्टॉपर लावतेस. तू मला काहीही विचारू शकतेस पलो. नो सिक्रेटस्! आमच्या शर्माने माझी तिच्याशी ओळख करून दिली. त्याला वाटलं मराठी मराठी म्हणून आमचं चांगलं जमेल. आम्ही चार पाच वेळा भेटलो पण प्रेमबिम काही नाही. म्युच्यूअलीच आम्ही वेगळे झालो. काही इव्हेंटसना एकत्र गेलो. पण प्रेसवाल्यांनी भरपूर हाईप केला. लोकांनी आमचे फॅनक्लब काय काढले, काहीपण सुरू होतं. तिला ते भारी आवडतं इंस्टा वगैरे, तेवढाच तिचा फॅन बेस वाढतो. आमच्यात काहीही नाही, पण ती चांगली मैत्रीण झाली.  रिसेंटली, रायगडाला जेव्हा जाग येते मध्ये ती येसूबाईचा रोल करत होती. तेव्हा आईने तिला प्रॉपर नौवार नेसायला शिकवली, म्हणून दोन चारदा घरी आली होती. ह्या प्रश्नाचं कारण काय? तिच्यामुळे माझा गेम खराब होतो आहे असं का?" मी भुवया उंचावत विचारले.

तिचे गाल लाल झाले. "हो, म्हणजे तुझ्या आयुष्यात काय चाललंय ते सगळं मला डॉक्युमेंट करायचं आहे."

"कश्मीरामुळे मला काहीच फरक पडत नाही. ना आयुष्यात, ना गेममध्ये. ती फक्त मैत्रीण आहे."

"गुड टू नो!" तिच्या ओठांचे कोपरे वर उचलले गेले. मी काहीच रिॲक्ट न होण्याचा प्रयत्न केला. सध्या मी पलोमाबरोबर आधी होतो त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हतो, पण ती माझ्या आयुष्यात थोडी जरी सामिल झाली तर ते मला हवं होतं.

तिच्याबरोबर लाईफ खरंच मस्त होतं.

"आणि तुझं काय? कोणी सिरीयस बॉयफ्रेंड?" मी चिल् असल्यासारखं दाखवत विचारलं.

"सध्या तरी कोणी नाही. ऊन वाढतंय, निघूया का इथून?"

मी खुशीत मान हलवली.

थोड्या वेळात आम्ही शिवाजी स्टेडियमवर गेलो. तिथल्या मॅचेस, किस्से, तिथे मारलेली पहिली सेंच्युरी आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने आवडायला लागलेलं क्रिकेट. सगळं आठवून झालं.

उन्हात तळपत आम्ही गाडीत जाऊन बसलो. "सोळंकी?" दोघं एकदम म्हणलो. स्टेडियमवरून परत घरी जाताना आईस्क्रीम खायची आमची प्रथा होती. "पार्कात जाऊ." तिने मान हलवली. वीकडेची दुपार असल्यामुळे तुरळक लोक होते. तरीही आम्ही आत गेल्यावर सेल्फी साठी लाईन लागली. पलोमा हसत होती. काऊंटरवरचे काका येऊन विचारपूस करून गेले. भराभर कॉकटेल नि गडबड संपवून गर्दी जमायच्या आत आम्ही बाहेर पडलो.

पलोमा

"पले, कुठे फिरायला लागलीयास? सोळंकीमध्ये आहात ना? ये बेकरीत गपचीप!" गाडीत बसताच दिदीचा फोन आला, मग वळलो तिकडे.

दिदीने खूप मेहनतीने ही बेकरी शून्यातून उभी केली होती. दीदी माझ्याहून एकच वर्षाने मोठी आहे पण आमच्या फॅमिलीची जान आहे. आई गेल्यावर तिने कॉलेज बरोबर केक मेकिंगचे आणि काय काय कूकींगचे कोर्सेस केले. पप्पा, आजी, बहिणी सगळ्यांची काळजी घेतली. मला दिल्लीला जाण्यासाठी खूप सपोर्ट केला. माझ्यासाठी घरी थांबणं हा ऑप्शनच नव्हता. मी तर सुट्टीतही परत येणं टाळत होते, बहिणींनाच तिकडे बोलवून घ्यायचे.

आम्ही सगळ्यांनी आपापल्या दुःखाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हॅण्डल केलं. परिस्थितीशी झगडा नाहीतर पळ काढा.

ही जगण्याची बेसिक स्किल्स आहेत. दिदीला कळत नसलं तरी ती फायटर आहे.

आणि मी सगळ्यातून पळ काढते. नेहमी पळत असते. घरापासून, समरपासून, सगळ्या आवडत्या वस्तू आणि व्यक्तींपासून लांब पळून गेले. कौतुक करण्यासारखी गोष्ट नाहीये आणि मला ह्या गोष्टीची लाजसुद्धा वाटते पण प्रत्येकाच्या मेंदूचं वायरिंग वेगळं असतं. ही माझी माझ्या दुःखाशी डील करायची पद्धत होती. होती काय, ग्रीव्हींग प्रोसेस अजूनही चालूच आहे.

माझ्या कामातून, ॲथलीट लोकांना बरोबर मार्ग दाखवताना मला स्वतःच्या परिस्थितीचे चांगले इनसाईटस मिळाले. मी स्वतःला जास्त चांगली ओळखू शकले.

"समर!" त्याने 'Karmella's' चे दार उघडताच काऊंटरमागून दीदी पळत आली. "हे, लिट्ल ममा! मला बातमी कळली." त्याने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. ती त्याचा हात धरून बोलत असताना मी मागे उभी होते. समर सगळ्यांचा लाडका होता. पण मी ब्रेकअप केलं तेव्हा माझ्या बहिणी खंबीरपणे माझ्या पाठीशी होत्या. मी त्याबद्दल बोलायचं टाळलं तेव्हाही त्यांनी कधी मला पुश केलं नाही. माझ्यासाठी सगळं किती वेदनादायक होतं ते कळल्यासारख्या सगळ्या गप्प राहिल्या.

काउंटरवर दीदीची नणंद आणि आधीपासून मैत्रीण कम बेकरीमधली पार्टनर असणारी प्रमिला होती आणि अजून दोन मदतनीस मुली होत्या. समर तिकडे वळून त्यांच्याशी थोडं बोलला. विचारायला लाजणार्‍या पोरींना बोलवून सेल्फी काढू दिले.

मी म्हटलं तसा तो चार्मिंग होताच.

"पले, आपल्या तिघांचा सेल्फी काढू ये.." दिदीने मला धरून पुढे ओढलं. "त्यापेक्षा हे फोटो कसे आहेत, फ्रेम करायला?" त्याने दिदीला त्याचा फोन स्क्रोल करत फोटो दाखवले. मी वाकून पाहिले आणि जराशी लाजले. शाहू ग्राऊंडवर आम्ही थोडा वेळ मुलांच्यात फुटबॉल खेळलो तेव्हा त्याने माझे फोटो काढले होते!

"तुम्ही खेळलात?" दीदी थोडी इमोशनल झाली. आमची आईपण शाळेत कबड्डी प्लेयर होती. मला फुटबॉलसाठी तीच घेऊन जायची. तिची एक तरी मुलगी खेळते याचा तिला फार अभिमान होता.

मी दीला मिठी मारली. "ह्या छोट्याला ट्रेन करेन ना मी!" मी हसत तिच्या थोड्या दिसायला लागलेल्या पोटावरून हात फिरवला. "एवढ्या लवकरच किक माराय लागलाय ते पात्र!" दीदी हसली.

"हट, तो क्रिकेटर पण होऊ शकतो. मुली पण भारी खेळतात आता, आपली टीम बघितली ना?" तो काचेतून वेगवेगळ्या पेस्ट्री बघत म्हणाला.

"समर, आपल्या KSA लीगच्या मॅचेस बघितल्या की नाही? शिवाजी विरुध्द पिटीएम् काय धमाल मॅच झाली! निस्ता हान की बडीव!"

"काय राव दीदी, जखमेवर मीठ चोळू नको. मी शिवाजीकडून खेळायचो माहिताय ना? अजुनपण फुटबॉल काही डोक्यातून गेलेला नाही."

"अजय तुला अख्खी मॅच रंगवून सांगेल बघ. घरी जेवायला ये ना, रस्सामंडळ करू आपण!" ती उत्साहात म्हणाली. मग तिने हळूच माझ्याकडे बघितलं. मी समरबरोबर सावधपणे जास्त वेळ घालवणार नाही हे तिला माहीत होतं. पण आमच्या हातात दोनच महिने होते आणि मला त्याच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवून त्याला असेस करायचं होतं. मी होकारार्थी मान हलवली.

"बेश्ट काम! येणारच. रविवारी? तुमचे पप्पा, जाईजुई, दोनचार मित्र सगळेच येऊ देत, तेवढीच भेट होईल सगळ्यांची. पलोमाला गरज आहे थोड्या नळ्या फोडायची! उद्यापासून आम्ही राजाराम तलावाकडे रनिंग करणार आहोत, कदाचित स्विमिंग पण.. शाळेतल्यासारखं" तो माझ्याकडे बघत म्हणाला.

मी डोळे फिरवले. "फुटबॉल, रनिंग, स्विमिंग! एका जॉबसाठी कायकाय करावं लागतंय, देवाss"

"मग नाही जमणार काय? परत पळून जाणार?" तो माझ्या कानात कुजबुजला. माझ्या अंगावर शहारा आला. दीदी आमच्यासाठी तिच्या फेमस फजी चॉकलेट वॉलनट कुकीज पॅक करण्यात बिझी होती. मी त्याच्या घाऱ्या डोळ्यांत बघत राहिले. त्याने सुकलेल्या ओठांवरून जीभ फिरवली आणि मी जबरदस्तीने माझी नजर दुसरीकडे वळवली.

"नेव्हर! गेम ऑन सावंत!"

त्याने शिट्टी वाजवली. "मोठ्यामोठ्या बाता करतेय, किती पळते बघूच!" सगळ्याजणी हसल्या. दीदीने माझ्या डोळ्यात बघितलं. 'उगा अती विचार करू नको..' बहिणी ना बेस्ट असतात. आम्ही चौघीही न बोलता एकमेकींच्या मनातलं ओळखायचो. मी मान हलवली. निघता निघता दिदीने माझ्या हातात एक ब्राऊनी कोंबली.

आम्ही सगळ्यांना बाय करून बाहेर पडलो. त्याने माझ्या हातातल्या ब्राऊनीचा घास घेतला. "आह, तुझ्या बहिणीच्या हाताला काय चव आहे! अनबिलीव्हेबल!!"

"आता तू कोल्हापूर सोडताना रडशील!!" मी हसत म्हणाले.

"खरंच! मला मजा येतेय. इथे मी किती आनंदात असतो ते विसरलोच होतो. हल्ली आईपप्पा पण जास्त मुंबईत असतात, त्यामुळे येणं होत नाही. बट धिस इज एक्झॅक्टली व्हॉट आय नीडेड." गाडी सुरू करण्यापूर्वीच त्याने त्याचा बॉक्स उघडून दोन कुकीज खाल्ल्या.
अव्वा! खाण्याची काय कपॅसिटी आहे ह्या माणसाची!

"हम्म.. मी पण तीन वर्षात एकदाच इथे आले, तेही दिदीच्या लग्नाला."

त्याने थांबून माझं निरीक्षण केलं. "तुझी तर सगळी प्रेमाची माणसं इथे आहेत. तरी घरी का येत नाहीस?"

"माहीत नाही." मी खांदे उडवले.

"असं दिसतंय की आपण दोघेही स्लंपमध्ये आहोत..." त्याने गाडी सुरू केली.

क्रमश:

कोल्हापूरला फुटबॉलची long standing history आहे आणि कोल्हापुरात गल्लोगल्ली फुटबॉल कल्चर आहे. हे फारसं माहीत नसतं म्हणून हे एक न्युज आर्टिकल देते आहे. आता त्यांची लीग आहे आणि सिटी मधल्या विविध भागांच्या टीम त्यात भाग घेतात. गोल्ड कप ही फुटबॉल स्पर्धा आहे, आता नाव छत्रपती शाहू गोल्ड कप असं आहे.

वर शिवाजी विरुद्ध पीटीएम मॅचचा उल्लेख आहे ती इथे आहे.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle