नभ उतरू आलं - ७

पलोमा

दुसऱ्या दिवशी सकाळचा वर्कआऊट, माझं सेशन, जेवण वगैरे आवरल्यावर घरी येऊन थोडा वेळ डुलकी काढली तोच पाच वाजल्याचा अलार्म खणाणला. मी पटकन ब्लॅक टाईट्स आणि पर्पल रेसरबॅक क्रॉपटॉप कम स्पोर्ट्स ब्रा घालून वर एक पातळ पांढरा लूज टीशर्ट अडकवला. केसांची उंच पोनीटेल आणि रनिंग शूज घालून तयार व्हायला मला वट्ट दहा मिनिटे लागली. तरी तेवढ्यात त्याने येऊन एक हॉर्न वाजवलाच. मी घर लॉक करून नॅपकीन आणि थंड पाण्याची बाटली घेऊन बाहेर आले नि गाडीत बसले.

तो नेहमीच्या ब्लॅक शॉर्ट्स, स्काय ब्लू स्लीवलेस टँक टी आणि ग्रे नायकीज मध्ये होता. कपाळावरून कॅप थोडी वर करून तो हसला. "रस्त्यावर पळताना थोडं तोंड लपवायला कामी येईल!" स्टिअरिंगवरच्या त्याच्या हातांच्या तटतटलेल्या शिरा आणि मजबूत बायसेप्स न्याहाळून मी खिडकीबाहेर नजर वळवली. मी मध्येच पुढे होऊन म्युझिक ऑन केलं. फरहान अख्तर 'तुम हो तो, गाता है दिल ' म्हणत होता. मी पटकन बटन बंद केलं. नंतर बराच वेळ तो शांत होता.

"काय झालं?" शेवटी मी विचारलंच.

"मी विचार करतोय की तू सगळ्यांना इतकी वर्ष माझा जराही उल्लेख करू नका अशी तंबी का दिली होतीस?"

"वेल, इथे आपण मला सायको ॲनालाईज करत नाहीये तर तुला करतोय. आठवलं?"

त्याने मान हलवली पण काही क्षण माझ्याकडे बघत राहिला. "लेट्स सी. माझी गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे. तुला माझ्याबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर तुला तुझ्याही काही गोष्टी मला सांगाव्या लागतील." तो समोर रस्त्याकडे बघत म्हणाला.

"असं कुठे लिहिलंय? काहीही!" मी डोळे फिरवले.

"बघू. रनिंगसाठी तयार?"

"बॉर्न रेडी, समर सावंत!"

त्याने हसुन मान हलवली. "मी आता प्रो ॲथलिट आहे. लक्षात आहे ना? आता तुझ्यासाठी इतकं सोपं नाहीये."

"बेट लावणार?"

"का नाही? माझ्या स्किल्सवर बेट लावायला मी घाबरत नाही." तो गुरगुरला.

डॅम! कोणी विनासायास इतका सेक्सी कसा असू शकतो?

"किती पळायचं?" मी पोनीटेल घट्ट करत विचारलं.

"सुरुवात नेहमीसारखी पाच किमी ने करू." एव्हाना आम्ही राजाराम तलावाजवळ पोचलो होतो.

"परफेक्ट! तेवढं तर मी रोजच पळते. आपण त्या मोठ्या झाडापासून सुरू करू. युनिव्हर्सिटी गेटपर्यंत अडीच तीन किमी होतील बहुतेक, तिथून या झाडापाशी परत येऊ." आकाशात थोडेफार ढग होते पण पाऊस पडेलसा वाटत नव्हता. निदान ऊन तरी अजिबात नव्हतं.

"डन! माझा माझ्या एबिलीटीजवर पूर्ण विश्वास आहे." तो खडूसपणे हसला.

हम्म, नो डाऊट!

"रडायला तयार हो, समर!"
"रडणार तू आहेस, पलोमा! आधीसारखीच." त्याने डोळा मारला.

नो वे! माझे डोळे विस्फारले आणि लाल झालेले गाल न दिसण्याची काळजी घेत मी पटकन गाडीतून उतरले. कारण त्याचा रेफरन्स मला लगेच कळला होता. एका संध्याकाळी इथेच, याच गाडीत, गळ्यावरचा त्याचा लालभडक लव्ह बाईट लपवता येत नाही म्हणून मी वैतागून रडत होते.

"शब्द सुचत नाहीत?" त्याच्या ओठांचा किंचित स्पर्श कानाच्या पाळीला झाला. "तू हरलीस तर मला उत्तरं द्यावी लागतील."

मी एक शब्दही बोलले नाही. मला माझे श्वास काबूत आणायचे होते. ह्या सगळ्या सिच्युएशनवरचा माझा कंट्रोल जातोय, तो परत आणायला हवा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, त्याला हरवणे आणि बोलायला लावणे.

समर

मी शेवटच्या वळणावर पोचलो आणि दोन सेकंद ढोपरावर हात टेकून थांबलो. पुन्हा पळालो तरी ती माझ्या बरोबरीने धावत होती. मी धापा टाकत होतो, तीही खूप दमली होती. मला वाटलं होतं दोन किमीतच ती दमून जाईल पण तिचा स्टॅमीना सॉलिड होता. काही करून मला जिंकायचंच आहे. मी समोर झाडाकडे हात करून पुढे गेलो आणि एकाच वेळी आम्ही झाडाला टच केलं. मी मनगटावरच्या ॲपमध्ये बघितलं तर हे माझे फास्टेस्ट फाईव्ह किमी होते.
"व्हॉट द फ*! काय होतं हे पलो!"

पलोमा हळू श्वास घ्यायचा प्रयत्न करत झाडाला टेकून धपकन खाली बसली आणि हसायला लागली. "काय? मी मॅराथॉनची तयारी करतेय! सांगायला विसरले बहुतेक."

मी कपाळावरचे घामाने ओले केस मागे करत तिच्या शेजारी बसलो.

"तुला तर कोणी टीम ट्रेनर म्हणून पण हायर करेल." मी गालातल्या गालात हसलो.

"मग? आता काय हिरो? टाय झाली!" तिने समोर दगड फेकत विचारले.

"आपण दोघेही जिंकलो, म्हणजे आपण एकमेकांना एकेक प्रश्न विचारू शकतो."

तिने श्वास सोडला आणि तशीच पाठीवर आडवी झाली. वर चमकणाऱ्या उन्हापासून बचाव करायला तिने हात डोळ्यावर घेतला. मी झाडाला टेकून पाय लांब केले आणि शेजारी पडलेली एक डहाळी उचलून तिची साल सोलू लागलो. हा कायमच माझा आवडता तलाव होता, रंकाळ्यापेक्षाही. आज तलावाचं पाणी गर्द निळं दिसत होतं. वाऱ्यावर थोड्याशा लाटा खळखळत होत्या. तलावाचा तळ लागत नव्हता, कदाचित जास्त पाऊस झाल्यामुळे.

"मी आधी विचारते. जर तू पूर्ण खरं उत्तर दिलं तरच तू मला प्रश्न विचारायचा. ओके?"
ती उठून केसांत अडकलेली बारीक पानं झाडत म्हणाली.

"मी नेहमीच खरं बोलतो. लपवायला काही नाहीच माझ्याकडे."

तिने एक श्वास सोडला. "ओके मग सुरू करूया."

"येऊद्या." मी पुन्हा झाडाच्या बुंध्याला पाठ टेकून समोर पाण्याकडे पहिलं.

"तू आनंदी आहेस का? म्हणजे क्रिकेट खेळताना तू आनंदी असतोस का? तू जे आयुष्य जगतो आहेस त्यात तुला आनंद वाटतो का?"

"हे अगदी पलोमावालं काम केलंस. बोट दिलं की हात ओढणार! हा एक नाही, तीन प्रश्न आहेत." मी वैतागलो.

"एकच प्रश्न आहे, मी फक्त थोडा एक्सप्लेन केला" ती किंचीत हसली.

"आनंदी आहे, टू ॲन एक्स्टेंट..." मी पुन्हा ती डहाळी उचलली.

"असं नाही चालणार, नीट सांग."

"मला रोज मायक्रोस्कोप खाली जगायला आवडतं का? मी केलेल्या रन्स, घेतलेल्या विकेट्स यावर माझी वर्थ ठरेल का? दर वेळी मी मॅच हरल्यावर अख्खं शहर माझा तिरस्कार करेल का? मोस्टली नाही. कारण मी जेव्हा पॅड्स बांधतो, हेल्मेट घालतो तेव्हा मी हॅपी असतो. मी जे काम करतो त्यात खूष आहे. माझी टीम माझ्या फॅमिलीसारखी आहे. आम्ही भरपूर हार्ड वर्क करतो आणि पार्टी करतो. घोरपडे नालायक माणूस आहे, मी त्याच्यापासून शक्य तेवढं लांब राहायचा प्रयत्न करतो. तो मला कधीही काढून टाकू शकण्याची भीती असतेच. मी त्याचं पॉलिटिक्स गेले दहा वर्ष सहन करतोय, का? तर माझं कॉन्ट्रॅक्ट तुटू नये, म्हणून. मला नाही माहीत. पण हे सगळं सोडूनपण वेगळं चांगलं आयुष्य असू शकतं. रन्स आणि पैसा सोडून काऊंट करण्यासारखं आयुष्यात खूप काही आहे." मी मान वळवून तिच्याकडे पाहिलं. ती माझं निरीक्षण करत होती.

"काहीतरी मिसिंग वाटतंय का? काय असावं?" तिने गंभीर होत विचारले.

"हा महत्वाचा प्रश्न आहे. काहीतरी मीसिंग तरी आहे किंवा जे आहे ते पुरेसं नाहीय."

"फेअर इनफ. तू खरं बोललास. आय अप्रिशिएट इट."

"ओके. मग माझा प्रश्न. तू तुझ्या घरी, फ्रेंड्समध्ये गेले दहा बारा वर्ष कोणालाही माझा उल्लेख करायची मनाई का का करून ठेवली होती? माझे आईवडील इथून परत मुंबईत येतात तेव्हा मी कायम चौकशी करतो. पलो आली होती का, दिसली होती का... तू का माझ्याबद्दल बोलत नाहीस?" मी तिच्या डोळ्यात खोलवर बघत विचारलं.

तिने ओठ घट्ट मिटून घेतले आणि दुसरीकडे बघितलं. गहन विचारात गेल्यावर ती नेहमीच करायची. तिने घसा साफ केला. "आपण माझ्याबद्दल का बोलतोय? इथे मला तुला बोलतं करण्यासाठी अपॉइंट केलेलं आहे."

"झाली टाळाटाळ सुरू! आन्सर द क्वेश्चन पलो. तू बेट कायम पाळली आहेस अजूनतरी."

तिने लांब श्वास सोडला. " कारण तुझ्याबद्दल बोलून मला खूप हर्ट होतं, समर. झालं? खूष आता?"

ती चटकन उभी राहिली आणि पाण्याजवळ गेली. मी मागोमाग गेलो. धिस इज नॉट डन!
तिने वाकून एक दगड उचलून पाण्यावर भिरकावला. तो परफेक्ट बाऊन्स होत लांब जाऊन नाहीसा झाला. मी तिच्या खांद्यावर हात ठेवून शेजारी उभा राहिलो.

"प्रत्येक वेळी बोलणं अनकंफर्टेबल झालं की पळून जाऊ नको. अश्याने आपण कुठेच पोचणार नाही."

"मी पळत नाहीये. मला कळत नाही आपण भूतकाळाबद्दल का बोलतोय. मी इथे तुला सुधारायला आले आहे. आठवलं?" तिने खांदे उडवले. तिची नजर अजून पाण्यावरच होती पण तिचा चेहरा माझ्या हाताकडे झुकला होता. त्यातली ऊब हवी असल्यासारखा.

मी हात काढून घेतला. मी काय वायझेडपणा करतोय. ती बरोबर म्हणते आहे. भूतकाळ खणत बसायची गरज नाही. ती मला का सोडून गेली याचं उत्तर मला कशाला हवं आहे? मी मूव्ह ऑन झालो, आम्ही दोघेही झालोय.

"आता तोंड बंद करायला पाण्यात उडी मारायची का?" मी तिला खांद्याने धक्का दिला. ती पालथ्या हाताने गाल पुसून हसली.

"एवढं पळून झाल्यावर लगेच पोहणार? मी तुला थांबून धापा टाकताना बघितलाय!" तिने भुवई उचलून माझ्याकडे बघितलं.

"व्हॉटेवर! मी दिवसभर उन्हातान्हात रना काढत असतो. हे तर काहीच नाही." मी खोटं बोललो. आजच्या इतका फास्ट मी कधीच पळालो नव्हतो. "आय थिंक तुलाच स्विमिंग झेपणार नाही."

"असं काही नाही. माझ्याकडे कपडे नाहीत तसे."

"एक काम करू, आपले कपडे आणि शूज गाडीत ठेऊ. पोहत पलीकडे जाऊ, तू दमशील तर तिथेच थांब मी परत येऊन गाडी घेऊन पलीकडे येतो."

"हुं!! ह्यो बगा शाहू महाराज! उगा शायनिंग नको करू!" तिने हात वर करून टीशर्ट काढला. आत पर्पल क्रॉप टॉप होता. उफ्फ! दोज कर्व्हज! तिच्या सपाट पोटाची नाजूक त्वचा संधीप्रकाशात तांबूस चमकत होती. तिने शूज काढून बाजूला ठेवले. "रेडी!" ती माझ्याकडे वळली.

आईच्या गावात!

मी गेल्या दहा वर्षात बऱ्याच सुंदर मुलींना भेटतोय, काहीना डेट केलंय. पण कोणीही पलोमाची बरोबरी करू शकत नाही. तिला आत्ता अशी समोर बघून... ॲब्सल्यूट परफेक्शन!

टोन्ड, टॅन्ड अँड ब्यूटीफुल!

"हेलो!" तिने माझ्या डोळ्यासमोर टिचकी वाजवली. "तू काही मला पहिल्यांदा बघत नाहीयेस. आता तर तुझ्या अवतीभवती हिरोईनी आणि मॉडेल्स असतात. एवढे मोठे डोळे करून बघायची काय गरज नाहीये." ती हसत म्हणाली.

"मी असं काही बघत नाहीये. स्वत: ला लै भारी समजू नको." मी माझा टी शर्ट डोक्यावरून काढला. माझ्या शरीरावरून, सगळ्या कट्स आणि ॲब्जवरून नजर फिरवताना तिचे डोळे विस्फारून दुप्पट झाले.

"खूप दिवस झाले इथे स्विमिंग करून." मी शूज काढून पटापट पाण्याच्या दिशेने गेलो. मला तिच्याकडे पुन्हा बघायचं नव्हतं नाहीतर मी स्वतःला कंट्रोल करू शकलो नसतो.

"अरे, थांब थांब.." म्हणत ती माझ्यामागे पळत आली.

मी काठावरून पाण्यात उडी मारली. गार पाण्याने माझी सिच्युएशन जरा बरी होत होती. ती हळूच थंडगार पाण्यात पाय बुडवून आत पूर्ण पाण्यात येताना थरथरून जरा किंचाळली. मी वळलो. "मोठ्या मोठ्या गप्पा करत होतीस, आता काय झालं?"

तिने खाली बघून स्वतःला लपवत हातांची घडी घातली. "पाणी खूपच थंड आहे."

"ते तर असतंच!" मी हसलो. "सो, मी जिंकलो तर आपण घरी जाऊन कपडे बदलायचे, काहीतरी पार्सल घ्यायचं आणि ताराबाई पार्क गाठायचा."

"आणि मी जिंकले तर?" तिने बारीक आवाजात विचारलं.

"आपण पार्सल घ्यायचं आणि माझ्या घरी जायचं. कमॉन यार पलो, आईपप्पाना भेटायचंय तुला!"

तिने मान हलवली आणि भरकन चालत खोल पाण्यातच गेली. तिचं लवचिक शरीर मासोळीसारखं पाण्यावर वरखाली होताना दिसत होतं. मी पटापट हात पसरून पाण्यात मुसंडी मारली आणि तिच्या शेजारी पोचलो. मी कायमच तिच्यापेक्षा स्ट्राँग स्विमर होतो त्यामुळे तिला गाठणं सोपं होतं. आम्ही स्ट्रोक टू स्ट्रोक बरोबरीने पोहत पलीकडच्या काठाजवळ पोचलो.

अजूनही सूर्य अस्ताला गेला नव्हता. आकाशात थोडे रंग शिल्लक होते. कितीतरी वर्षांमध्ये पहिल्यांदाच मला पूर्णपणे इतकं शांत, ॲट पीस वाटलं... नो कॅमेरा, नो कोचेस, नो फॅन्स, नो एकस्पेक्टेशन्स...

फक्त मी, पलोमा आणि आजूबाजूला पसरलेले राजाराम तलावाचे थंडगार पाणी. मी सिमेंटने बांधलेल्या कठड्याला धरून स्वत:ला वर खेचले. पलोमा काठापाशी थोडी धडपडली, मी तिचे दंड धरून तिला वर खेचून सरळ बसायला मदत केली.

"टाय?" तिने चेहऱ्यावरचे ओले केस बाजूला सरकवत विचारले.

ही कुठल्याही बाजूने टाय नव्हती पण तिला न्याहाळत मी मान हलवली. ओलेत्या मुली एवढ्या सेक्सी का दिसतात राव?

"मग मी थांबते इथेच, तू प्लीज गाडी घेऊन येतोस?" माझ्या पेरेंट्स ना भेटायच्या विचाराने ती नर्व्हस दिसत होती.

"सांगितलं होतं आधीच! येतो चटदिशी." म्हणून मी डोकं हलवून केसांतलं पाणी उडवलं. तिने माझ्याकडे हळूच नजर टाकली. तरी तिचे लालसर गाल आणि गडद झालेल्या डोळ्यांमधून तिला काय वाटतंय ते समजत होतं.

"मी पोहोचेपर्यंत तू थोडी वाळलेली असशील. घरी जाऊन गरम पाण्याचा शॉवर घे म्हणजे जरा सेटल होशील!" मी जीभ दाखवली. तिने पाण्यात जोरात हात आपटून माझ्या अंगावर सपकारा मारला आणि हसत बसली.

मी पाण्यात उतरून चालताचालता दोन्ही हातानी ओले केस डोक्यावर मागे घेतले आणि मागे वळून डोळा मारला. मला माहिती होतं, ती बघत असणार. हेल! आम्ही अजूनही एकमेकांवरून नजर हटवू शकत नाही. काही गोष्टी कधीच बदलत नाहीत हेच खरं.

क्रमशः

राजाराम तलाव
images_1_1.jpeg

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle