नभ उतरू आलं - ८

पलोमा

मी घरी येऊन खरंच गरम पाण्याचा शॉवर घेतला आणि फॅनखाली केस वाळवत बसले. इतक्या वर्षानंतर फुटबॉल, रनिंग, स्विमिंग सगळं एकामागोमाग एक करून माझी तर हवाच गेली. पायांची जेली झालीय. समरला सांगायला पाहिजे, मी त्याची ट्रेनर नाहीय. रोज नाही करू शकत बाबा इतकं. लहानपणी ठीक होतं. आता तो ॲथलीट आहे, मी नाही.

मी चेहऱ्यावर वारा घेत डोळे मिटले. पाण्यात तो कसा दिसत होता ते आपोआप डोळ्यासमोर आलं. माझ्यात अडकलेले त्याचे डोळे आणि वरून आमच्यावर चमकणाऱ्या किरणांमधून उडणारे बारीक लाल सोनेरी कण. लहानश्या ठिणग्यांसरखे! समर... मी बघितलेला सगळ्यात गुड लुकिंग मुलगा होताच  पण आता तो जास्तच अट्रॅक्टिव झालाय. सहजपणे, कुठल्या ट्रीटमेंट्समुळे नाही. त्याच्या दाट केसांतून रुंद खांद्यावर टपकणारं पाणी... त्याला स्पर्श करण्याचा मोह मी कसाबसा आवरला होता.

मी दोन्ही हातांनी तोंड झाकून एक लांब श्वास सोडला. पलोमा, आवर स्वत:ला. डोकं ताळ्यावर आण.

मी उठून कपाट उघडलं आणि ड्रेसेस बघत बघत शेवटी पिवळा लखनवी कुर्ता आणि पांढरी सिगारेट पँट फायनल केली. केस विंचरून छोटा क्लचर लावला. सी सी क्रीम, कॉम्पॅक्ट आणि लायनर लावला. लिपस्टिक लावता लावता फोन वाजला.

हरीश चौहान नाव फ्लॅश होत होतं. मी दिल्लीत असताना स्पोर्ट्स सर्किटमधल्या काही मित्रांकडून त्याची ओळख झाली होती आणि आम्ही दोन चारवेळा एकत्र मुव्हीज, जेवायला वगैरे गेलो होतो. जस्ट कॅज्युअल डेटिंग. त्याचा बिझनेस होता आणि एका फुटबॉल टीमच्या चार ओनर्सपैकी तो एक होता. मला मुंबईत जॉब मिळाला आणि आम्ही जे काय सुरू होतं ते थांबवलं. पण तो अधेमध्ये फोन करून काँटॅक्टमध्ये राहिला होता. आश्चर्यच होतं कारण आमच्यात तेवढी घट्ट मैत्रीसुद्धा नव्हती. काही म्युच्युअल फ्रेंड्स होते. त्यामुळे त्याच्याबरोबर बाहेर फिरायला मजा आली होती एवढंच.

"हे हॅरी!" मी लिपस्टिक हातात फिरवत बेडवर बसले. केस अजूनही थोडे ओलसर होते. आज मी राजाराम तलावात पोहायला उतरेन असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण समर! त्याच्याबरोबर असताना काहीही होऊ शकतं!

"हाय पलोमा! हम कुछ दोस्त एक फ्रेंडकी बॅचलर पार्टी के लिये कोलापूर आ रहे है!"

"रियली? कोल्हापूर तो इतना पॉप्युलर पार्टी डेस्टिनेशन नही है!!" मला हसायलाच आलं.

"हां लेकीन दोस्त ने सब अरेंज करके रखा है और बोर हुआ तो हमने गोआका ऑप्शन भी ओपन रखा है."

"साउंडस् ग्रेट! तो प्लॅन क्या है?"

"कुछ नहीं, बस उसके फार्महाऊस पर दो दिन रहेंगे और पार्टीशार्टी करेंगे. कहीं ड्रिंक्स के लिये मिले?"

"अम्म, वैसे यहा कुछ नाईट लाईफ तो है नही, बट लेट्स ट्राय. कब आ रहे हो आप लोग?" मी जरा कंटाळून विचारलं.

"अभी टू वीक्स हैं, आनेसे पहले डिटेल्स भेजता हुं. फिर तुम बोलो कहां मिलना है. आय मिस यू,पलोमा!"

आं! हे कुठून आलं!! मी हसायला लागले. "सच में!?"

तोही हसला. "इतना सरप्राइज मत हों, लोग मिस करते है तुम्हे! तुम्हे शायद पता नहीं, क्यूंकी तुम्हारा एक पैर हमेशा दरवाजे के बाहर रहता है. तुम किसीको मिस करने जितना पास ही नहीं आने देती..."

"मुझे पता था, मुझे दिल्ली में नहीं रहना. जब बाहर ही जाना है, तो किसीसे क्लोज होने का कोई मतलब नही बनता. बट आयाम शुअर, यू आर डूईंग फाईन रोमिओ!" मी हसतच म्हणाले. मला पहिल्यापासून तो किती फ्लर्ट माणूस आहे ते माहिती होतं. पण मजेशीर होता, त्याचा काही त्रास नव्हता. मी सिरीयस नव्हतेच त्यामुळे त्याच्या वागण्याचा मला काहीच तोटा नव्हता.
"ओके देन, टेक्स्ट मी."

"लूकिंग फॉरवर्ड टू इट! मिलते है!" म्हणून त्याने कॉल कट केला. मी पटकन लिपस्टिक लावली. केसातून हात फिरवला. कानात छोटेसे चांदीचे झुमके अडकवले तोच डोरबेल वाजली. घाईत बाहेर जाऊन दार उघडलं तर समर!

त्याने चक्क लाईट ब्लू जीन्स आणि ब्लॅक शर्ट घातला होता. बाह्या कोपरापर्यंत फोल्ड केल्या होत्या. "गोड दिसतेयस! आपण पिझ्झा घेऊन जाऊ, पप्पांना आवडतो. तिथे बोलताना मध्येच डिलिव्हरीचा डिस्टर्बंस नको. मी त्यांना तू येतेय म्हणून सांगितलं नाही. मस्त सरप्राइज देऊ!"

माझ्या पोटात गोळा आला. त्याचे आईवडील मला आवडायचे पण माझ्यावर किती नाराज असतील या विचाराने मला कसंतरी झालं. मला माहिती आहे, मी अचानक समरला सोडून गेल्यामुळे त्यांना विचित्र वाटलं असेल, कारण माझ्याही घरी वाटलं होतं.

पण मी बरोबर गोष्ट केली होती. समरसाठी आणि माझ्यासाठीही.

"मस्तच!" मी जरा हसले आणि चपला घालून बाहेर पडले. जाताजाता रस्त्यात हेवनसमोर थांबून (हेवनवाला प्रचंड चीज घालतो, पण पप्पांना तेच आवडतं. काय करणार!) मी दोन लार्ज पिझा, चीज गार्लिक ब्रेड, पेरीपेरी फ्राईज वगैरे भलंमोठं पार्सल घेऊन स्कॉर्पिओमध्ये बसले. तो काळा गॉगल आणि कॅप घालून तोंड वळवून बसला होता. सेलिब्रिटी लाईफ!

आम्ही त्याच्या घराच्या गल्लीत वळलो आणि अचानक माझ्यावर आठवणींची लाट येऊन आदळली. कायम सायकलवर टांग मारुन इथे येणं. त्यांच्या डायनिंग टेबलवर बसून काहीतरी खात त्याच्या आईशी मारलेल्या गप्पा. बऱ्याचदा तर काकी माझे केस विंचरून सागरवेणी घालून द्यायच्या. नागपंचमीला त्यांच्यासारखी रेखीव मेंदी आमच्या गल्लीतल्या एकाही मुलीला जमायची नाही. मग मी माझी गडद लाल रंगलेली मेंदी दाखवत मिरवायचे. काका सुट्टीवर आलेले असतील तेव्हा खूप गप्पा मारायचे. जास्त करून फुटबॉल आणि क्रिकेट. आणि गाणी! त्यांचे माझे आवडीचे विषय. मॅराडोना आणि गावस्कर म्हणजे त्यांचे देवच! कोल्हापूरला येताना हमखास माझ्यासाठी पण काहीतरी गिफ्ट असायचं. नॉर्थला असतील तेव्हा कायम गोडगोड अंगूरी पेठा!

"पलो.. नर्व्हस होण्यासारखं काहीच नाहीये." तो वळून गाडी पार्क करताना म्हणाला.

मी मान हलवली. "आय नो. मी बहुतेक त्यांना खूप मिस केलं."

"मग हे सांगणं एवढं कठीण का आहे?"

"माहीत नाही." डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून मी पटापट पापण्यांची उघडझाप केली. मी रडूबाई नव्हते. आपल्या भावना कंट्रोल करायला मी कधीच शिकले होते. पण इथे येऊन, समरच्या आजूबाजूला राहून ते खूप चॅलेंजिंग होतं.

"मुंगी एका भल्यामोठ्या हत्तीला कसं खाते?" त्याने विचारल्यावर मी हसले. हत्तीमुंगी जोक! शाळेत असताना खेळून झाल्यावर घरी होमवर्क करायला, लिहायला त्याच्या जिवावर यायचं. तो जाम चिडचिड करायचा, त्याला बाहेर खेळायचं असायचं. बऱ्याचदा आम्ही एकत्र अभ्यास करायचो. मग त्या वह्यांच्या पसाऱ्याकडे बघून मी त्याला विचारत असे, हा हत्ती कसा संपवायचा?

"एका वेळी एक घास, सावंत!" हसून मी सीटबेल्ट काढला आणि खाली उतरले.

त्याने खांद्यावर हात ठेऊन मला जवळ घेतलं आणि आम्ही लिफ्टमध्ये शिरलो. "मी शेजारच्या पाटलांचा फ्लॅटपण विकत घेतला. आता पूर्ण फ्लोर आपलाच आहे." पाचव्या मजल्याचं बटन दाबताना त्याने सांगितलं. "भारी!"

दाराबाहेर काकींची नेहमीची रांगोळी आणि संध्याकाळी धूप कोन जाळल्याचा चंदनी सुगंध हलकासा दरवळत होता. दाराला खणाच्या पताकांचे तोरण होते. त्याने खिशातून किल्ली काढून लॅच उघडलं आणि माझ्या पाठीवर हात ठेऊन आत घेऊन गेला. तो राळ आणि धुपाचा वास मला लहानपणात घेऊन गेला. काकीना मैसूर सँडलचा धूप फार आवडायचा.

हॉलमधले उन्हाचे कवडसे, मोठ्या काचेच्या बोलमधले गोल्डफिश, हसण्याचे आवाज, मजा...

"हॅलो!! मी आलोय!" समर मोठ्याने म्हणाला.

तोंडासमोरचा पेपर खाली ठेवून, चष्मा डोक्यावर सरकावत काका हॉलला जोडलेल्या टेरेसमधून डोकावले. "पिझ्झाचा वास येतोय का गं ?" म्हणत ते पुढे आले. त्याचवेळी काकी हसत किचनकडून आल्या. समरशेजारी उभ्या मला बघून दोघेही एकदम चमकले. काकीनी आ वासला आणि त्यांच्या चेहऱ्यावर मला न कळणारे भाव चमकून गेले. त्या थोड्या पॅनिक झाल्यागत वाटल्या पण लगेच हसत पुढे आल्या. "आली ग बाई आली. आम्ही तुझी किती आठवण काढली पले.. किती वर्ष!!" येऊन त्यांनी एकदम मला मिठीच मारली आणि मी थांबवण्यापूर्वीच माझ्या डोळ्यातून पाणी वहायला लागलं. मी त्यांच्या पाठीवर थोपटलं आणि सुकसुक करत अजून रडायचे कढ आवरले. काकींचं वजन कमी झालं होतं आणि गाल अगदी ओघळले होते. आईबाप आपलं करता करता किती लवकर म्हातारे होतात... आपल्या विश्वात आपल्याला कळत देखील नाही.

"अग बाई त्या पोरीला श्वास तरी घिऊंदेत!" ऐकून त्या बाजूला झाल्यावर "ये ये पलोमा. वेलकम!" म्हणत काकांनी माझ्या पाठीवर थोपटलं. त्यांचं आता पूर्ण तुळतुळीत टक्कल झालं होतं आणि चष्मापण लागलेला दिसत होता. समरचे दाट केस आईकडून आलेले असावे. मी त्यांच्याशी बोलायला लागले आणि काकी समरजवळ सोफ्यावर बसून बोलू लागल्या. काहीतरी ऑकवर्ड वाटतं वगैरे शब्द माझ्या कानापर्यंत पोचले. त्यांनी आत्ताच मला ज्या प्रेमाने मिठी मारली, त्यावरून माझ्या येण्याने त्यांना ऑकवर्ड वाटलं असेल असं काही वाटत नव्हतं.

"हेय हँडसम!" मधात घोळवल्यासारखा गोड आवाज आला आणि मी काकांशी बोलताना वळून मागे पाहिलं. किचनच्या दारात स्किनी ब्लॅक जीन्स आणि एक सिल्की आकाशी टॉप घालून द कश्मिरा बर्वे उभी होती.

समरने पिझ्झाचे बॉक्स सेंटर टेबलवर ठेवत तिच्याकडे, आमच्याकडे, परत तिच्याकडे बघितलं आणि उठून तिच्याजवळ गेला. ती ऑल्मोस्ट त्याच्याएवढीच उंच आणि यमीपेक्षा दहापट गोरी होती, ब्लॉन्ड हायलाईटस् केलेले केस फॅशनेबल लेयर्समध्ये तिच्या कंबरेपर्यंत रुळत होते आणि ओठांवरची ब्राईट रुबी रेड लिपस्टिक लक्ष वेधून घेत होती.

"कॅश!" म्हणत समर जवळ येताच तिने त्याला मिठी मारली आणि स्टाईलमध्ये गालाला गाल लावून हवेत किसेस दिले. मी त्यांच्यावरून नजर हटवूच शकत नव्हते. ते एकमेकांशेजारी अगदी बॉलिवूड पॉवर कपल दिसत होते. कश्यामुळे माहीत नाही, माझं हृदय खूप काळापासून बंद पडलं होतं. पण आईशप्पत, या क्षणी त्याचा पूर्ण चक्काचूर झाला. एकदम विषय कट!! तेही ह्या किचनमध्ये जिथं मी अख्खं लहानपण घालवलं होतं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle