नभ उतरू आलं - ९

पलोमा

काकांना बहुतेक माझी अवस्था समजली. त्यांनी माझ्या खांद्यावर थोपटलं. काकींनी माझ्याकडे बघून काळजी करू नको अश्या अर्थाने मान हलवली. मी आत आल्यावर त्या का ऑकवर्ड होत्या त्याचं कारण आता कळलं.

"तू इथे कशी काय?" समरने गळ्यातून तिचे हात सोडवत विचारले. तो माझ्यासमोर नाटक करतोय का? त्यांच्यात काहीतरी चालू आहे आणि मला कळू द्यायचं नाही, असं आहे का? पण कशाला, मी त्याची कोणीच नाहीये. आमच्यात काहीच नाहीये त्याचं कारण मीच आहे. माझीच चूक आहे.

मग त्याला तिच्याबरोबर बघून मला इतका त्रास का होतोय? मी त्यांना कितीतरी वेळा एकत्र फोटो, व्हिडीओमध्ये पाहिलंय. इन्स्टावर फॅन्सनी एडिट केलेले रिल्स पाहिलेत. पण आत्ता समोर ती त्याच्या डोळ्यात डोळे घालून तो तिचाच असल्यासारखं बघतेय. कितीतरी वर्षात काळजात अशी कळ उठली नव्हती. कारण अशी वेळ न येऊ देण्याची काळजी मी घेत होते. समरबरोबर काम करायला हो म्हणणं ही माझी मोठी चूक होती.

मला नाही अडकायचं कुठल्या माणसात. हे सगळं मला अती होतंय. इथून पळ काढायची तीव्र इच्छा होते आहे. इतक्या वर्षात सगळ्यात तीव्र, पुन्हा त्यात काही अर्थच नाही.

"आय नो, तू इथे एकटा राहून स्वतःवर काम करायला आला आहेस." कश्मीराने पुन्हा त्याचा हात हातात घेतला. तिची लांब नखं ओठांना मॅचिंग होती. पुन्हा ती त्याच्यावर आपला हक्क दाखवत होती. "आपलं इतक्या दिवसात काही बोलणं झालं नाही, सो मी तुला थोडं मिस करत होते. आज इथे एका ज्यूलरी शोरूमच्या ओपनिंगसाठी आले होते तर म्हटलं काकूंना भेटून जाऊया. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, एक रेड कार्पेट इव्हेंट आहे त्यात तू सोबत येशील का म्हणून."

ओके. म्हणजे तो खोटं बोलत नव्हता. टेक्निकली ते एकत्र नाहीत पण तिचं वागणं असं दिसतंय की ते तिला असायला हवे आहेत. त्याने तिचा हात अजुनही सोडला नव्हता. माझ्या हाताच्या मुठी वळल्या गेल्या. काका माझ्याकडे बघून भुवया उंचावून हसले.

"कश्मीरापण अचानक मला सरप्राइज द्यायला आली. मी समरला फोनच करणार होते तेवढ्यात तुम्हीच आलात!" काकी माझ्याकडे कटाक्ष टाकून म्हणाल्या म्हणजे मला कळेल की ती ठरवून आली नव्हती. बरोबर आहे, तिलाही मी येतेय ते माहीत नव्हतं. आयदर वे, इट डझंट मॅटर. त्यांनी डेटिंग केलं होतं आणि तिच्याकडून ते अजूनही संपवायची ईच्छा दिसत नव्हती.

"कॅश, ही डॉ. पलोमा फुलसुंदर, माझ्याबरोबर काम करते आहे."

"हाय पलोमा, मी कश्मीरा! इट्स नाइस टू मीट यू!" कश्मीराने हात पुढे केला.

"नाइस टू मीट यू, टू!" मी खोटं हसत हात मिळवला. मी तरी काय कडू बेनं असल्यासारखं वागतेय! टोटल हीपोक्रिट!! ह्या बाईचा मला खूप राग येतोय आणि मी तिला ओळखतसुद्धा नाही. त्या रागालासुद्धा काही कारण नाही.

"मग? काय झालंय आमच्या समरला?" तिने लाडीकपणे विचारत वर समरकडे पाहिले आणि ओठांवरुन जीभ फिरवली.

आमच्या???

तिला तो हवाय. तिला हवा असलेला कोणीही माणूस मिळू शकतो. कदाचित त्याचं लग्न होईल, सुंदर मुलं होतील आणि ते प्रत्येक मॅगझिन कव्हरवर असतील. बॉलिवूड पॉवर कपल!

"अजून त्याच्यावर काम सुरू आहे." मी किंचित खाकरत म्हणाले. शिट, माझा घसा बंद होतोय. इथे सगळ्यांना पुरेसा श्वास घ्यायला येतोय का?

"पिझ्झा कोण कोण खाणार?" कश्मीराच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने आत जाऊन प्लेट्स आणल्या.

"अं, एस्क्युज मी.. मला वॉशरूमला जायचय." म्हणत मी काकांशेजारून निघाले. समरची नजर माझ्यावर खिळून होती.

इथे दुसरा दरवाजा असता तर मी नक्की पळून गेले असते. घरी जाऊन, बॅग भरून कोल्हापुरातून काढता पाय घेतला असता. इथे सगळंच हर्ट होतंय. म्हणूनच मी इथून लांब रहात होते.

पण परत आले आणि ते सगळं आता अंगावर येतंय. अवघड आहे एकूण.

समर

कश्मीराचा फोन वाजला आणि ती कॉल रिसिव्ह करायला काचेचं दार सरकवून टेरेसमध्ये गेली. आईने माझ्याकडे पाहिलं. मी पटकन प्लेट्स तिच्या हातात देऊन पलोमाला हुडकत निघालो.

तिच्या डोळ्यात तोच पूर्वीचा लूक होता, जो मला सांगत होता की ही आता पळणार.

तशीच पॅनिक, तशीच भीती, सगळं तिथेच होतं. हे सगळं कधी नाहीसं झालंच नव्हतं. दहा वर्षांपूर्वी तिने असंच सगळं संपवलं होतं. हेडलाईटसमोर आलेल्या सश्यासारखं, ज्याला बाकी काही ऐकू येत नाही फक्त पळायचं कळतं.

माझ्या बेडरूममध्ये जाऊन मी बाथरुमच्या दारावर अलगद नॉक केलं. "पलोमा."

"ओह, आलेच. एक मिनिट."

"दार उघड." मी शांतपणे बाहेर ऐकू न जाण्याची काळजी घेत म्हणालो.

तिने दार किलकीलं केलं. मी लगेच तिला ढकलत आत घुसलो आणि माझ्यामागे दार बंद केलं.

"काय करतोयस तू?" ती रागाने भिंतीच्या थंडगार टाईल्सना टेकून लांब श्वास घेत म्हणाली. तिची भीती लपवायला ती चिडून दाखवत होती. मी तिला चांगलाच ओळखतो.

"तुला पळून जायची गरज नाही. इथे तसं काहीही चाललेलं नाही." मी तिच्या जवळ पाऊल टाकत म्हणालो.

"मी कुठेही पळून जात नाहीय." ती बोलत असताना मी अजून तिच्यासमोर गेलो. "तू समजतोस काय स्वत:ला? तुला काय वाटतं, तू माझ्या मनातलं सगळं ओळखतोस?" तीही रागाने पुढे झाली आणि आम्ही एकमेकांवर धडकलो. तिने हनुवटी वर करून रागात माझ्याकडे पाहिलं. ओह, मी हिच्याहून सुंदर मुलगी कधी पाहिली होती का? नितळ त्वचा, नॅचरली टपोरे ओठ, सरळ नाक, हृदयाचा ठाव घेणारे मधाळ डोळे.

"हो. तू किती खुळ्या टाळक्याची आहेस ते मी चांगलं ओळखतो! आता बुक्का पाडून टाक. ती माझी फक्त मैत्रीण आहे, अजून काही नाही." मी ठामपणे म्हणालो. एव्हाना माझे दोन्ही हात तिच्या चेहऱ्याचा दोन्ही बाजूला भिंतीवर टेकले होते. आता ती पळून जाऊच शकत नाही.

"ती तुझी कोण लागते त्याची मी कशाला काळजी करू?" ती पुन्हा मागे सरकत भिंतीला टेकली. मी नकळत अजून पुढे झालो.

"मला माहित नाही पलो, तूच सांग." मी तिरकस हसलो.

काहीही उत्तर न देता अचानक तिने चवडे उंचावले आणि तिचे ओठ माझ्या ओठांवर आदळले. मऊ, ओलसर ओठ! तिच्या ओठांमध्ये मला माझीच भूक जाणवत होती. स्वतःला थांबवण्यापूर्वीच मी तिला उत्तर द्यायला लागलो. कानातले सगळे आवाज बंद पडले. तिला भिंतीशी दाबून ठेवून मला तिच्यावर पूर्णपणे माझा हक्क गाजवायचा होता.

पण मी तसं वागू शकत नाही. जोपर्यंत ती मोकळेपणाने मला सगळं सांगत नाही, तोपर्यंत नाहीच. न सांगता सवरता ती आधीच एकदा माझ्यापासून लांब गेली होती. आता नाही. ते तिलाही जाणवलं असावं कारण माझ्या छातीवर हात ठेवून ती मागे सरकली.

"हे चुकून झालं." ती खालमानेने म्हणाली.

मी डोळे फिरवले. "तुझ्या भंकसचा तुला कंटाळा  येत नाही का ग?" मी बेसिनकडे जाऊन तोंडावर पाणी मारलं. मला ह्या छोट्याश्या जागेत काहीतरी डिस्ट्रॅक्शन हवं होतं. हवा जरा जास्तच गरम झाली होती आणि माझा स्वतःवरचा कंट्रोल निघून जात होता.

"कसली भंकस?" तिने आरशात माझ्याकडे बघत विचारलं.

"तू बाथरूममध्ये पळून आलीस. बहुतेक इथून सटकायचा प्लॅन करायला. मग मला किस केलं आणि वरून ते चुकून केलं म्हणतेस! मला काय झ्यांग समजलईस काय!"

ती पुन्हा भिंतीला टेकली. " तूss तू मला किस केलंइस, बाद माणसा!"

"मला नाही वाटत तसं!" मी तिरकस हसत म्हणालो. नळ बंद करून, टॉवेलने हात तोंड पुसून मी टॉवेल जागेवर ठेवला. "आता तुझी टिवटिव बंद करून बाहेर ये. पिझ्झा खा, त्या हिरोइनीशी चार शब्द बोल, आईपप्पाना भेट. त्यांचं खूप प्रेम आहे तुझ्यावर." म्हणत मी दाराकडे गेलो.

"हे खूप होतंय समर. आत्तासा आपण भेटून एक आठवडाही झाला नाही. जुन्या खूप आठवणी वर येतायत." तिने मान हलवली. ॲटलीस्ट आता ती खरं बोलत होती.

"निवांत रहा. कसलाही अती विचार करू नको. तुला मला किस करायची इच्छा झाली, तू केलास. टाळ्या!" मी हसत तिच्यासाठी दार उघडायला हात पुढे केला.

"मी नाही, तू केलास किस. एवढा ॲरोगंट कधी झालास रे!" तिने माझ्या हाताला जोरात चिमटा काढला. मी ओरडलो आणि दाराबाहेर डोकं काढून कोणी जवळपास नाही ना ते चेक केलं.

मी मागे वळून तिच्या चेहऱ्यावर वाकून तिच्या डोळ्यात बघितलं. तिचे डोळे विस्फारले पण मी ओठांनी तिच्या ओठांना कळेनासा स्पर्श करत कुजबुजलो. "ॲरोगंट नाही, ऑनेस्ट." आणि तिच्या कानाच्या पाळीचा किंचित चावा घेऊन बाजूला झालो. ती बारीक आवाजात किंचाळली.

"समर ss सगळं ठीक आहे ना?" हॉलमधून आईने विचारलं. तेव्हाच कॉल संपवून कश्मीरा आईजवळ काहीतरी बोलत असल्याचा आवाज आला. "जा." मी तिला बाथरूमच्या दाराबाहेर काढलं.

"मी का आधी जाऊ? तू जा." ती फिस्कारून मला खांद्याने धक्का देत म्हणाली.

"कारण तू इथे पळून आलीस. इतका वेळ काय तू चिपळून - कोल्हापूर करतेय असं सांगू का बाहेर!" मी गालात हसत म्हणालो. शरमेने तिचे गाल तांबूस होताना बघून मला मजा वाटत होती.

"वांडर कुठलं!! जाते मी आधी." ती पटकन वळत माझ्या तोंडावर केसांचा सपकारा मारुन बेडरूमच्या दाराकडे गेली.

मी बाथरूममध्ये जाऊन पुन्हा तोंडावर पाणी मारलं. आमच्या रियूनियनमुळे एकटी पलोमाच अफेक्ट झाली नव्हती.

आमच्यातला बंध अजूनही तसाच होता, मध्ये इतकी वर्ष जाऊनसुद्धा. मी एकीकडे विचार करत होतो की ही फक्त मी तयार केलेली तिची इमेज असू दे. ती आता बदलली असेल. पण नाही. ती तीच माझी जुनी पलो आहे, जिच्या मी एवढी वर्ष प्रेमात होतो. मी असा माणूस नाहीय जो फक्त आम्ही एकत्र नाही म्हणून त्या व्यक्तीवर प्रेम करणे बंद करेल.

पण त्याचवेळी मी आता जुना, खुळा समर राहिलो नाही. फक्त मला हवी, म्हणून सगळं विश्व मला हवी असलेली गोष्ट पुढ्यात आणून ठेवेल असा आंधळा विश्वास मी ठेवत नाही. हृदयाचे दोन तुकडे होणं म्हणजे काय ते मी एकदा अनुभवलं होतं आणि ते मला आत्ता बाथरूममध्ये किस केलेल्या मुलीनेच केले होते. ते लक्षात ठेवण्याइतका शहाणा मी नक्कीच आहे.

मी बाहेर गेलो तर सगळे सोफ्यावर बसून गप्पा आणि खाण्यात गुंग होते. थ्री सिटर सोफ्याच्या एका बाजूला कश्मीरा आईला तिच्या कुठल्या तरी नव्या मुव्हीबद्दल सांगत होती. दुसरीकडे पप्पा त्यांच्या मोबाईलमध्ये असलेलं गजल आणि कोक स्टुडिओचं कलेक्शन सिंगल सोफ्यावर बसलेल्या पलोमाला दाखवत होते. मी येताच पलोमाचे डोळे माझ्यात गुंतले पण तिने लगेच नजर हटवून पप्पांशी बोलायला सुरुवात केली.

मी कश्मीराशेजारच्या सिंगल सोफ्यावर बसलो कारण तेवढीच जागा शिल्लक होती.

"अरे चॅम्प, आपण तू शेवटची इथे आल्यानंतर खेळलोच नाही. खेळणार का?" पप्पा जोरात म्हणाले.

"अहो! आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित ऐकू येतं, जरा हळू बोला." आईने फ्राईज खाता खाता त्यांच्याकडे बघत मान हलवली.

"ती कसली चॅम्प होती?" कश्मीराने मला विचारत तिच्या पिझ्झावरचं टॉपिंग काढून सगळा क्रस्ट माझ्या प्लेटमध्ये ठेवला. ह्या सगळ्या हालचालींवर पलोमाची नजर होतीच. खरं तर त्यात काही खोल अर्थ वगैरे नव्हता. कश्मीरा कार्बफ्री डाएट वर आहे आणि मी कार्बस किंग आहे. आम्ही डेटवर असताना असं करत होतो. आता ती इथे आज अचानक टपकली पण मी माझ्या सगळ्याच मित्रांना कधीही गरज लागली तर मदत करतो. तशी तिला करतोय. मी असाच आहे आणि शंभरातले नव्याण्णव कोल्हापुरी लोक असेच असतात.

"झब्बू! गड्डेरी झब्बू चॅम्प आहे मी!" पलोमा जरा शरमून हसत म्हणाली.

"ओह, मी हे कधीच खेळले नाही." कश्मीरा गार्लिक ब्रेडचा अगदी छोटा तुकडा उचलत म्हणाली.

"देवाss जग कुठे चाललय! एकजण दहा वर्षात खेळली नाही न दुसरी कधीच खेळली नाही!" पप्पा पत्ते पिसत म्हणाले.

"त्या बिझी आहेत. तुम्हाला काय, आता आयुष्यभर झब्बूच खेळायचाय." आई पलोमाला टाळी देत खळखळून हसल्यावर सगळेच हसले.

कश्मीरा त्यांच्याकडे बघून माझ्याकडे वळली. काही सेकंद बघत राहिली आणि पुन्हा तिने चीजचे चित्रविचित्र आकाराचे तुकडे शिल्लक असलेली तिची प्लेट हातात घेतली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle