कविता

मराठी भाषा दिन २०१८ मध्ये स्पर्धकांनी केलेल्या कविता

मैत्रीण.कॉमने मराठी भाषा दिन २०१८ निमित्त घेतलेल्या स्पर्धेतील हा एक टप्पा होता.

स्पर्धेची रूपरेषा :

१. खाली एकूण १५ शब्द दिले आहेत.
२. या शब्दांमधून निदान ३ शब्द वापरून तुमच्या गटाला एक काव्य रचायचं आहे.
३. हे काव्य आरती, अभंग, भावगीत, मंगलाष्टक, श्लोक, ओवी यापैकी एका प्रकारात मोडणारं असावं. काव्य गंभीर, भावूक, विद्रोही, विडंबन अथवा विनोदी कसंही चालेल. यमक जुळेल असं हवं आणि काव्यातून काही अर्थ निघावा अशी अपेक्षा आहे.
४. काव्य किमान एक कडव्याचं असावं आणि बाकी कितीही मोठं असेल तरी चालेल.

कविता: 

भजन

भजन
उठा उठा सकलजन
आळवू या गजानन
गण गण गणात बोते
चला गाऊया भजन

जागवून जगताला
भास्कर आनंदी झाला
गण गण गणात बोते
रंग चढला भजनाला

जागता किलबिलती हे द्विजगण
कि करती नामस्मरण
गण गण गणात बोते
गाता जाईल द्वाडपण

सांगे हिरवागार तरुवर
शिष्यभार गुरूंवर
गण गण गणात बोते
मना आवर,धावा कर

संताचा लागला लळा
तोची पाठीराखा होई बाळा
गण गण गणात बोते
फुलवू भक्तीचा मळा

विजया केळकर ____

कविता: 

खारुताई

या फांदीवर त्या फांदीवर
उड्या मारते खारुताई

कुठले उंबर नक्की खाऊ
पेच पडोनी लागे धावू

त्या तिथले फळ रसाळ दिसते
दडून बसते तिथेच माऊ

इकडे येती लुच्चे पोपट
संपतील मग सारे पटपट

समोरचे तर खाऊन घेऊ
नंतर येवो पोपट माऊ

~कामिनी केंभावी

कविता: 

कुंचला

कुंचल्यातून रेखाटलेस तू मला जेव्हा
रंगही सजीव झाले खरे तेव्हा

कुंचल्यातून झरता ते ओघळते रंग
आकारलेस प्रत्यही तू अंग-अंग

आनंदालास पाहून तू , रेखिलेली कलाकृती
अभिमानी तुझ्या मनाला , शिवलीच नाही माझी प्रकृती

चित्र जाहले अनुपम मात्र छटा एक राहिली
अंतरंगी भेदून माझ्या जी अभंग वाहिली

अज्ञातच राहिलास तू कोरडा चित्रकार
तुला कसले कळणार अंतरंग नि कसला आकार

चित्र जमले खरे तुला , वेदना अस्पर्श राहिली
अंतरंगी उमळती ज्वाला , दिठीपार ना तू पाहिली

कसला धरतोस अभिमान निर्जीव कलाकृतीचा
कुंचल्यात नाहीच सामावणार हा पदर शतवृत्तींचा

धजू दिलास कुंचला अन रेखिले अवचित मला जरी

कविता: 

कवी

कवी

मुलात डोले, फुलांत फुले कवी
सृष्टी देवता सुचवी कल्पना नवी नवी

बोल बोबडे अंगणी क्रीडांगणी
दंगा म्हणून रागावती कोणी
कोणास वाटे ती संजीवनी
त्यात विश्वरूप पाहे कवी

फुले उमलता गंध दरवळे
त्यास दाही रस्ते मोकळे
अवखळास कसे अडवू न कळे
त्याच्या मागावर धावे कवी

तारांगणी चंद्र-सूर्य लपंडाव खेळती
तारका एकासाठी धावत येती
दुसरा येता पळून जाती
किरण स्पर्शे कवीतला जागा होई कवी

विजया केळकर _____
bandeejaidevee blogspot.com

कविता: 

आग

जुनाट समाधिस्थ
     निळसर सुस्त शिखरे
          तापून लालभडक झाली तेव्हा,

निरभ्र नभाचे किनारे
      हळूहळू पेट
           घेऊ लागले तेव्हा,

लोहाराचा भाता फुलून
       अग्निफुलांचा
            पाऊस पडू लागला तेव्हा,

करपट धुराचे लोळ
        स्वच्छ ढगांना खाऊन
             ढेकरा देऊ लागले तेव्हा,

हिरवे जिवंत रान
        भान विसरून
             राखेत उडून जाऊ लागले तेव्हा,

कपारींना जाग येऊन
         आवाजाचे कोलाहल
              उतू जाऊ लागले तेव्हा,

ओलसर शेवाळलेली जमीन
         रुसून एकेका भेगेत
              लुप्त होऊ लागली तेव्हा,

कविता: 

रातराणी

रातराणी

सुवास सांगे मी रातराणी
वाट पहाते येतील राजा नि राणी
नसतील आणिक कोणी
धुंदीत गाती मौन-गाणी
हलकेच दवबिंदू झेलुनी
गुलाब शिंपेल गुलाबपाणी
डवरला कुंद, कळ्या-फुलांनी
वर्षाव करील भरभरुनी
जळात जाळ्यात बंदिनी
एकटीच पण डोले कमळीणी
वदे सखी सुर्यमुखी उमलुनी
देव-वंदनेने सुरु व्हावी दैनंदिनी
विजया केळकर ______
badeejaidevee blogspot.com

कविता: 

असंच एकदा..

ती एकटीच न्याहाळते क्षितिजावरले
आठवणींचे मूक काचेरी पक्षी..

कधी होते हिरव्याजर्द पानी लपलेले इवले घरटे
कधी त्यातून दिसे वर मेघांची निळसर नक्षी

कधी चोच वासुनी उधळे भंडाऱ्यागत भूक
कधी भरपेट सुस्त गुलबक्षी निद्रा मूक

कधी हिंदकळणारे काळे-कबरे वादळ
कधी डुचमळणारे किर्र रातीचे काजळ

कधी उगवतीला पसरेे सोनसळी मोहळ
कधी झुळझुळले नीलमण्यांचे ओहळ

कधी मुलायम शुभ्र पंखी लाभले बळ
कधी मोकळ्या झेपेत असे थरारती पानगळ

ती एकटीच न्याहाळते क्षितिजावरले
आठवणींचे मूक काचेरी पक्षी..

कविता: 

दोघे

दोघे .....

वाट पाही वेलीवरील फुल
मन कसे राहील मलूल
एक येईल बुलबुल
आणिक एक येईल बुलबुल
दोघे करतील गुलगुल

पानोपान डवरला प्राजक्त
मन झाले आसक्त
केशरी साडीचा गाल आरक्त
पांढरा झब्बा कसा राहील विरक्त

नदीकाठावर एक पडकं देऊळ
घरंगळले एक ढेकूळ
कारण एक मस्त युगुल
लिप्त जसे लेणे वेरूळ

आता अंधुकला पहाड
शेजारी त्याच्या एक झाड
सावल्यांचा खेळ त्या आड
नव्हते कोणी करण्या चहाड

विजया केळकर _____

कविता: 

दिवाळी

दिवाळी

पणती जशी उजळवते दाही दिशा
धुंद होते मन अन् उमलते नवी अश्या

आनंद येतो दारी घेऊन जुनी नाती
घट्ट होते विण अन् होतात गाठी भेटी

चार दिवसांचे सुख येई पाहून केलेली पूर्व तयारी
गोंधळ गडबड हास्यविनोद घरात आनंद पसरी

उडून जातो अलगद दिवस सुखाचे
अन् दिसू लागतात आम्हास रस्ते ऑफिसचे

मनात साठवून सारे हासरे क्षण
देतो पुन्हा लवकरच भेटण्याचे वचन

प्लॅन बनतात get2 अन् 31st च्या ट्रीपचे
उरतात मागे आईबाबा आजीआजोबा अन रीते दरवाजे

केतकी पुरुषोत्तम गोरे.

कविता: 

पाने

Subscribe to कविता