कविता

रे सावळ्या

रे सावळ्या,
बरसतोस असा घननीळ मेघ होऊनि
जोजविसी भूतला तवामॄत पाजुनि

रे सावळ्या,
भिववू पाहसी जरी निशापती होऊनि
आश्वस्त करते ही मज, श्रमपरिहाराची घडी

रे सावळ्या,
दैन्य, दु:ख, वेदना, उज्वल यशाची धुरा
सारं घेशी सामावुनि, होऊनि सावळा

रे सावळ्या,
उडी मारण्या सज्ज तू, ठेवूनि हात कटेवरी
मिठीत घेण्या लेकरा, एका सादेचीच दुरी

रे सावळ्या,
आस तुझीच रे केवळ, अन्य मागणे ते नसे
सावळ्या मिठीत तुझ्या, जगणे 'कांचन' होतसे

Keywords: 

कविता: 

विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल

विठ्ठल विठ्ठल
विकल जाहलो
विसावेल मन
चरणी या ***
जन्मा घातलेसी
जगजेठी तूचि
जगीन आनंदे
तुज पायी ***
यामिनी अंधारी
याची नाही भीति
यात दिसे तव
तेजबिंदू ***
केली उधळण
केशर अबीर
केवढा दर्वळ
गजबजे ***
लगबग चाले
लहान महान
लय या वाद्यांची
अनुभवे ***
करा स्नान दान
करा पुण्यवाचन
कर कटावरी
पाहूनीया ***
रचिले अभंग
रटविले वेद
रसामृत पाजे
रमाधव ***
विषय विकार
जड डोईभार
यातना विसरवी
पांडुरंग ( एकनाथ) ***
केली एकाग्रता
लक्ष्य एक आता
कमर कसून
रत मार्गी ***

कविता: 

आनंद सोहळा

रूप जाहले अरुप
रंगे सावळा सोहळा
जिवा लगे निज ओढ
भेटी श्रीरंग कानडा

कर ठेऊनिय कटी
मुख शाश्वत सुन्दर
दाटू येई माया खोल
भरे समाधानी उर

निराकार चैतन्याशी
जुळे नाते निराकार
आसावल्या दिठी दिसे
विठू माऊली साकार

लय जुळता सख्याशी
कोण मी कोण सावळा
विश्व सारेच माऊली
जीव आनंद सोहळा
.............आनंद सोहळा

Keywords: 

कविता: 

गाली गुलाब फुलले

या गोड प्राजक्ताशी उन्मुक्त वात वाहे
सोडून भान सारे ती त्याचीच वाट पाहे ||

गाली गुलाब फुलले ओठात गीत आहे
का लाजते रती गं , तू त्याची प्रियाच आहे ||

डोळ्यातल्या स्वप्नांचा मनीही गाज आहे
तुझीच साथ द्याया चंद्र-चंद्रिका आज आहे ||

या शितल चांदराती तेवती तू वात आहे
भरेल ओंजळी ज्याची प्रकाशे, तो त्याचाच हात आहे

शांत नदीचा किनारा का गं खळाळत आहे ?
कि तुझिया मनाची हुरहूर तो दाखवीत आहे?

सांभाळ मदनिके गं चाहूल त्याचीच आहे
स्वप्नांना रंग द्याया आजची ही रात आहे

कविता: 

यंदा भिजायचं नाही

आभाळ भरुन येईल
पण आता थांबायचं नाही,
मेघही बरसतील
पण यंदा भिजायचं नाही;

भेटतील वेडे पक्षी
गातील गाणी पावसाची,
आता मात्र
त्या गाण्यांनी हरखायचं नाही

बरसेल मग पाऊस माझ्या खिडकीशी,
थांबेन क्षणभर तेव्हा;
ऐकेन त्याची चाहूल,
आणि वाट पाहीन उघडीपीची..

आताशा दिसतो मला तो
पावसानंतरचा आसमंत,
नितळ निळा अन् शांत;
आणि खुणावती मला
डोंगर आणि त्यांची गर्द हिरवाई,
राखून ठेवायचे हे दिवसं
पाहण्या पाऊस लेऊन नटलेली हिरवी नवलाई

म्हणून आभाळ भरून येईलही
पण यंदा भिजायचं नाही,
मेघही बरसतील
पण आता थांबायचं नाही

विभावरी थिटे

Keywords: 

कविता: 

आयुष्याचे गाणे

खाऊन एक संतरा
गायला त्यानं अंतरा
मोजताना तालाच्या मात्रा
जाणवला त्याला खतरा

मग,

एकतालाच्या दीडपटीत
भेळ चापली चटपटीत
तान घेऊन येता समेवर
गाडी पकडली लटपटीत

धागीनती नक धीं, धागीनती नक धीं
तिरकीट धा, तिरकीट धा, धीं धीं

दरवाज्याचे कुलुप उघडता
बेसुरल्या ज्या बोल-ताना
फ्रीजचे पाणी पीता पीता
मनी गुंजला गोड अडाणा

सा रे म प, नि म प, सां
सां ध नि प, म प ग म, रे सा

बडा ख्याल मग रंगत जाई
सोबत व्हिस्की आणि चकना
अलंकार एकेक उतरले
होरी, धृपद, धमार, तराणा

नादिरदिरदा नी तदानी तोम, तनन तोम
नादिरदिरदा नी तदानी तोम, तनन तोम

तानपुर्‍याच्या जुळता तारा

कविता: 

लाँग ड्राईव्ह


सोन्याचा गोळा वितळतो काचेवरून
  पसरत हळूहळू डॅशबोर्डवर..
    आपण वळलेले असतो कायमचे दिशा हरवून

सुस्त वळणावरचा गुलमोहर मागे सोडून
  जाळलेल्या शेतांची काळी राख..
    उडत असते त्या गडद मखमली फुलांमागून

उन्हाचे कण उमटतात तुझ्या नाकापासून
  तांबूस सोनेरी केसांपर्यंत..
    माझ्या डोळ्यांचा मध जातो गालावर ओघळून 

कविता: 

पुन्हा एकदा

शब्द हरले, पुन्हा एकदा
सूर विरले, पुन्हा एकदा
सख्या तुझ्या मौनापुढे
नाते हरले, पुन्हा एकदा

शब्दाला धार, शब्दाचे वार
निष्प्रभ सारे, पुन्हा एकदा
संपले नाते, वरचढ ठरले
मौन विखारी, पुन्हा एकदा

नात्याच्या या शोकसभेची
चर्चा झाली, पुन्हा एकदा
मूक अश्रू मी ढाळून गेले
अबोल वणवा, पुन्हा एकदा

कविता: 

श्री गजानन जय गजानन

श्री गजानन जय गजानन

मन मंदिरी पाहतो तुजला
चिंता,व्याधी कशा छळतील मजला
जन मनात 'मंत्र' गाजला
अन् गावे सदैव गजानना -गजानना

कधीही न ठेवी मज उपाशी
तरी खावे खावे काय अहर्निशी
एकवेळ राहून पहावे उपवासी
अन् गावे सदैव गजानना- गजानना

अनावर दु:ख कैसे साहावे, कोणास सांगावे
जगभर पसरावे,हसेच व्हावे
देवा गुरुराया तुला तर सारेच ठावे
म्हणून गावे सदैव गजानना- गजानना

गाता गाता शेगावासी जावे
संत- सज्जनांचे दर्शन घ्यावे
आर्त प्रार्थना करता डोळे भरून यावे
अन् गावे सदैव गजानना -गजानना

कविता: 

साक्षात्कार

मळभ सरले दाटलेले, आभाळाच्या अंगणी
बरसून झड गेली, लुकलुकली शुक्राची चांदणी

कोलाहल भावबंधनांचा, दूर मागे राहिला
सुटला रेशमी गुंता, कल्लोळ हृदयीचा थांबला

डोहात शांततेच्या खोल, सावकाश उठले तरंग
साद कानी ओमकाराची, जसा राउळीचा घंटानाद

विराट अन अथांग मनाचा, शुद्ध झाला आरसा
साठले ब्रह्मांड हृदयी, साक्षात्कार हा चिरंतनाचा

कविता: 

पाने

Subscribe to कविता
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle